– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Jaggu Ani Juliet Marathi Movie Review

कथानक थोडक्यात – मुंबईच्या वर्सोवा कोळीवाड्याचा जग्गू ( अमेय वाघ). दिलखूलास आणि आयुष्यावर मनापासून प्रेम करणारा. जग्गूचे तितकेच प्रेम आहे त्याच्या वडिलांवर म्हणजे तात्या (उपेंद्र लिमये) वर आणि तात्याचा सुद्धा जग्गू हा जीव की प्राण. जग्गू आलाय उत्तराखंड फिरायला एका ग्रुप टूरसोबत आणि जमलंच तर आपल्या स्वप्नातील राजकुमारीचा पण शोध जग्गू ला घ्यायचा असतो. पण ग्रुपमध्ये असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी पाहून जग्गू टूर मॅनेजर पॅट्रिक (ह्रिषीकेश जोशी) च्या परवानगीने एकटाच उत्तराखंड फिरायला निघतो. हातात वेळ असतो केवळ ५ दिवसांचा. पहिल्याच दिवशी त्याची भेट होते अमेरिकेहून आलेल्या ज्युलिएट (वैदेही परशुरामी) सोबत. जग्गू जितका मोकळा तितकीच ज्युलिएट राखीव. दोघांमध्ये एक समानता म्हणजे दोघांची आई त्यांच्या लहानपणीच वारली असते. पण जग्गू च्या अगदी विरुद्ध असलेली ज्युलिएट स्वतःच्या वडिलांचा तिरस्कार करीत असते. उत्तराखंड मध्ये जुलिएटची आई ज्या ज्या ठिकाणी येऊन गेलेली असते ती सगळी स्थळे ज्युलिएटला बघायची असतात आणि त्यासाठी ती जग्गू ची मदत घेते. जग्गूचे पहिल्याच भेटीत ज्युलिएट वर प्रेम बसते आणि तो ज्युलिएटसमोर स्वतःच्या प्रेमाची कबुलीसुद्धा देतो. मला येत्या ४ दिवसात तू इम्प्रेस करू शकलास तर मी तुझा विचार करेन असे आवाहन ज्युलिएट जग्गूला देते आणि जग्गू ते स्वीकारतो. ज्युलिएट ने दिलेले हे आवाहन जग्गू कसे पूर्ण करतो हा पुढील कथाभाग.

 

काय विशेष?- एखाद्या उत्तम निर्मिती मूल्ये असलेल्या हिंदी सिनेमाप्रमाणे सिनेमाची निर्मिती केली गेली आहे. अगदी कथानकातील प्रसंग, त्यातले संवाद सुद्धा बऱ्याच हिंदी सिनेमात आपण पाहिलेले आणि ऐकलेले आहेत असे सिनेमा बघतांना पदोपदी जाणवते. परंतु तरीही पटकथा तुम्हाला बऱ्यापैकी बांधून ठेवते. कथानक केवळ जग्गू आणि ज्युलिएट च्या प्रेमापुरते मर्यादित न राहता एकंदरीत नातेसंबंधांवर भाष्य करते. त्यात प्रामुख्याने लहानपणीच आई चे छत्र हरवल्यानंतर अशा मुलांचे वडिलांसोबतचे नाते यावर कथेत जास्त भर दिला गेलाय. हे नाते दाखविणारी दृश्ये भावस्पर्शी झाली आहेत. खासकरून जग्गू जेंव्हा ज्युलिएट आणि तिच्या वडिलांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करतो ती दृश्ये हमखास डोळ्यात पाणी आणतात. महेश लिमये सोबत अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी कथा-पटकथा लिहिली असून अंबर आणि गणेश यांनीच संवाद लिहिले आहेत जे खूपच दमदार आहेत. नातेसंबंधांवर भाष्य करणारे संवाद अत्यंत परिपक्वतेने आणि प्रगल्भतेने लिहिले गेले आहेत.

हे गांभीर्य कायम ठेवत जेंव्हा जग्गू या पात्राचा वावर पडद्यावर असतो तेंव्हा त्याच्या हलक्याफुलक्या पात्राला अनुसरून या संवादांमध्ये विनोद आणि खरपूसतेची फोडणी सुद्धा व्यवस्थित मारली आहे. महेश लिमये यांचे दिग्दर्शन सुद्धा उत्तम आहे. कथानकाला एखाद्या हिंदी चित्रपटाच्या स्टाईलने महेश यांनी सादर केले आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईला तो अगदी जवळचा आणि समकालीन वाटेल हे नक्की. त्यात व्हॅलेंटाईन वीक मध्ये प्रदर्शित झाल्याने अधिकच जवळचा वाटेल. अमेय वाघ हा चित्रपटाचा प्राण आहे.. एक खांबी तंबू आहे ज्यावर हा सिनेमा शेवटपर्यंत टिकून राहतो. कमाल काम केलंय पोरानं. कोळीवाड्यातील मस्त धमाल हॅप्पी गो लकी तरुण या पात्रास अमेयने पूर्ण न्याय दिला आहे. वैदेही ने सुद्धा ज्युलिएट छान रंगवली आहे. वैदेही चा पडद्यावरील वावर सुंदर आहे. इतर कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये, ह्रिषीकेश जोशी, मनोज जोशी आणि समीर धर्माधिकारी यांनीही आपापल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. महेश लिमये यांची मूळ ओळखच हिंदी आणि मराठी सिनेमातील प्रख्यात छायाचित्रकार ही आहे मग ते स्वतः दिग्दर्शन करीत असलेल्या चित्रपटाचे छायांकन नेत्रदीपक असणारच ना! एक ना एक फ्रेम खूपच सुंदरतेने टिपली आहे महेश यांनी. संवाद आणि छायांकन यानंतर विशेष नोंद घेण्यासारखी चित्रपटातील बाब म्हणजे पार्श्वसंगीत. विजय गावंडे यांचे यासाठी विशेष कौतुक. २ तास १५ मिनिटांची माफक लांबी हा पण एक मोठा प्लस पॉईंट आहे.

नावीन्य काय?- कथानकात आणि पटकथेत तसे पाहता काहीच नावीन्य नाही. अशा प्रकारच्या कथा याहीपुर्वी खासकरून हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. पण विषयाची हाताळणी, दिग्दर्शक महेश यांनी मराठी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेऊन केली आहे.

कुठे कमी पडतो? – अजय अतुल यांच्या संगीतात. आहेत ती गाणी काही टाकाऊ आहेत किंवा अजिबातच जमली नाहीत असे अजिबात नाही. पण अजय-अतुल या नावाकडून असलेल्या अपेक्षांवर निश्चितपणे कमी पडणारी आहेत. भावस्पर्शी अशा या प्रेमकथेत निदान दोन गाणी तरी इन्स्टंट हिट या सदरात मोडणारी असती तर चार चांद लागले असते. पटकथेत अजून नाट्यमय अशा ट्विस्ट आणि टर्न्स ची आवश्यकता होती. काही अनावश्यक ठिकाणी घुसवलेली गाणी टाळता आली असती.

पहावा का?- हो. थिएटरमध्ये नाही जमलं तर ओटीटी वर. खासकरून तरुणाईने.

स्टार रेटींग – ३ स्टार. 

इतर मराठी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment