– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

GoodBye Movie Review. ज्येष्ठ चरित्र अभिनेते अरुण बाली यांच्या दुःखद निधनाच्या दिवशीच त्यांची भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा सिनेमा प्रदर्शित होणे हा खरंतर दुर्दैवी योग. २०१४ सालचा कंगना राणावत चा ‘क्वीन’ आणि २०१९ चा ह्रितिक रोशन चा ‘सुपर ३०’ या दोन चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या विकास बहेल याने ‘गुडबाय’ च्या लेखन आणि दिग्दर्शनाची दुहेरी कमान सांभाळली आहे. एकता कपूर च्या बालाजी टेलिफिल्म्स ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात बीग बी अमिताभ व दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंदाना प्रमुख भूमिकेत आहेत.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या ‘राम प्रसाद की तेहरवी’ या चित्रपटाने चरित्र अभिनेत्री सीमा पाहावा यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. कोवीड च्या गोंधळानंतर आलेला हा चित्रपट उत्तम दर्जाचे लेखन असूनही काहीसा दुर्लक्षिला गेला. एकत्र व मोठ्या कुटुंबातील एका प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी आणि तेराव्या पर्यंतच्या विधींसाठी जेंव्हा हे कुटुंब एकमेकांसोबत राहते तेंव्हा त्यांच्या नातेसंबंधामध्ये असलेला दुरावा ठळकपणे समोर येतो अशा आशयाचे कथानक ‘रामप्रसाद की तेहरवी’ चे होते. अंत्यविधी ते तेरावा या काळात करावे लागणारे विधी यातून ब्लॅक ह्युमर पद्धतीने दिग्दर्शक सीमा पाहावा यांनी नात्यांवर अत्यंत मार्मिक टिप्पणी केली होती. हा सिनेमा आठवायचे कारण म्हणजे विकास बहेल यांच्या ‘गुडबाय’ ची कथा सुद्धा अशाच प्रकारे लिहिण्यात आली आहे.

कथानक थोडक्यात. चंदिगढ स्थित हरीश भल्ला (अमिताभ बच्चन) आणि गायत्री भल्ला (नीना गुप्ता) यांचे मोठे कुटुंब आहे. नकुल (अभिषेक खान), करण (पवेल गुलाटी), अंगद (साहिल मेहता) हे तीन मुले आणि तारा (रश्मीका मंदाना) ही मुलगी. तारा ने नुकताच आपला वकिली व्यवसाय सुरु केलाय व तिचे मुदस्सर सिंग (शिवीन नारंग) वर प्रेम आहे ज्याबद्दल तिचे कुटुंबीय अनभिज्ञ आहेत. तारा ही लहानपणापासून अत्यंत स्वतंत्र/विद्रोही विचाराची, स्पष्ट बोलणारी, कुठल्याही रूढी परंपरा न मानणारी. तिच्या या स्वभावामुळे तिचे वडिलांसोबत कधीच जमलेले नसते. या कुटुंबाला एकत्र जोडणारा दुवा असते गायत्री. एके दिवशी अचानक गायत्री चे निधन होते. निधनाच्या दिवशी सर्व मुले आणि तारा सुद्धा काहीना काही कारणाने घरात अथवा शहरात  नसतात. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कारापर्यंत सर्वजण पोहोचतात खरे पण त्यायोगे हरीश ची चिडचिड वाढते. सर्व मुले आणि तारा आल्यावरही त्यांचे विचित्र वाटणारे वागणे बघून हरीश आणि यांच्या नात्यांमधील दुरावा स्पष्टपणे समोर येतो. तेराव्यापर्यंतच्या विधीपर्यंत मग या नात्यातील उडणारे खटके कसे कमी होतात आणि गायत्री च्या आठवणीत हे कुटुंबीय कसे जवळ येते हा पुढील कथाभाग. यात हरीश चा एक मित्र सुद्धा दाखवलाय, ज्याची अंत्यसंस्काराच्या विधींवर मास्टरकी आहे, जी भूमिका आशिष विद्यार्थी यांनी साकारली आहे. काशी येथील पंडितजींची भूमिका सुनील ग्रोव्हर यांनी रंगविली आहे.

ज्यांनी ‘रामप्रसाद की तेहरवी’ पाहिलाय त्यांना गुडबाय नक्कीच डावा वाटेल. दिग्दर्शक म्हणून विकास बहेल यांनी आपले काम व्यवस्थित सांभाळले असले तरी लेखक म्हणून विकास यांनी हातात असलेली एक सुवर्ण संधी वाया घालवली आहे. पटकथेत खूपच ठळकपणे दिसून येतील अशा चुका आहेत. आई गायत्री आणि त्यांची मुले यांच्या नात्यात असलेला जिव्हाळा दाखवणारे प्रसंग अत्यंत मोजके असल्याने प्रेक्षक गायत्रीच्या अचानक जाण्याने कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगांशी म्हणावा तसा कनेक्ट होत नाही. आई गायत्री आणि मुलांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावा ठळकपणे समोर येत नाही शिवाय वडील हरीश आणि मुलांना जोडणारी दुवा असलेली गायत्री होती हे सुद्धा लेखकाने व्यवस्थितपणे मांडलेले नाही त्यामुळे आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत कुटुंबीयांचे परत जवळ येणारे प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जात नाहीत. अगदी मोजकेच प्रसंग आहेत ज्यात तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. काही प्रसंग तर खूपच ऑड  व याची काय गरज होती असे वाटणारे आहेत. उदाहरणार्थ आईच्या अंत्यसंस्काराच्या नंतर रात्री वडील हरीश यांचे मुलगा करण यास नको त्या विषयावर दिलेले ज्ञान. तारा हे प्रमुख पात्र विचित्र पद्धतीने लिहिण्यात आलंय त्यामुळे तिच्या पुरोगामी विचारांशी सहमत व्हावे की तिच्या उद्धट आणि उर्मट  वागण्याबद्दल तिच्याबद्दल चीड निर्माण व्हावी हेच कळत नाही. अमिताभ यांनी साकारलेले हरीश हे वडिलांचे पात्र सुद्धा लेखकाने व्यवस्थितपणे एस्टॅब्लिश केलेले नाही. कथा फारशी रेंगाळत नाही ही जमेची बाजू आहे आणि त्याचे श्रेय दिग्दर्शक म्हणून विकास यांना द्यावे लागेल.

‘जय काल महाकाल’ हे अमित त्रिवेदी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली चित्रपटातील एकमेव जमलेले गीत आहे. ‘केदारनाथ’ मधील त्यांच्याच ‘नमो नमो जी शंकरा’ या गाण्याची आठवण करून देणारे. इतर गाण्यांचे संगीत मात्र निराश करते. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली सर्वच गाणी अर्थपूर्ण आहेत आणि प्रसंगानुरूप आहेत. सुधाकर रेड्डी यांचे छायांकन, अमित्र त्रिवेदी चे पार्श्वसंगीत आणि श्रीकर प्रसाद यांचे संकलन या इतर तांत्रिक बाजू जमेच्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांचा अभिनय अर्थातच दमदार आहे पण त्यांच्या वाट्याला, त्यांच्या पात्राला न्याय न देणारी भूमिका आली आहे याचे वाईट वाटते. रश्मीका चा अभिनय छान पण तिचा संवादफेकीत जाणवणारा दाक्षिणात्य टोन टाळता आला असता तर बरे झाले असते. नीना गुप्ता नेहमीप्रमाणेच अगदी सहज आणि सुंदर पण त्यांच्या भूमिकेची लांबी अजून वाढविण्याची नितांत गरज होती. इतर कलाकारांमध्ये पवेल गुलाटी, आशिष विद्यार्थी, सुनील ग्रोव्हर लक्षात राहतात.

अतिशय भावस्पर्शी अशा आशयाचे कथानक, पटकथा लिहिण्यात कसे गडबडू शकते आणि मग त्याला चांगले दिग्दर्शन, संकलन सुद्धा कसे वाचवू शकत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुडबाय. एक हुकलेली सुवर्णसंधी.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment