– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kantara Movie Review. ‘केजीफ’ बघण्यासाठी म्हणून सिनेमागृहात प्रवेश घेण्यापूर्वी यश नावाचा कोणी कन्नड अभिनेता आहे याबद्दल नुसते पुसटसे ऐकून होतो.. त्याचा कुठला सिनेमा बघण्याचा योग येण्याचा तर प्रश्नच नव्हता. साधारणपणे आपल्याला दक्षिणेतील सिनेमा म्हटले की तामिळ किंवा तेलगू एवढेच आठवते आणि म्हणून आपली मजल केवळ या दोन फिल्म इंडस्ट्रीतील काही अभिनेते-अभिनेत्री माहीत असण्यापर्यंत असते. पण केजीफ च्या दोन्ही भागांनी भारतभरातीलच नव्हे तर जगभरातील सिने रसिकांना कन्नड सिनेमांना सुद्धा गांभीर्याने घेण्यास भाग पाडले. काही दिवसांपूर्वी आलेला ‘७७७ चार्ली’ नावाचा कन्नड सिनेमा सुद्धा अत्यंत आवडला होता. तो बघण्याआधी रक्षित शेट्टी या अभिनेत्याची ओळख नव्हती. ३० सप्टेंबर रोजी असंच एक नवीन वादळ कन्नड सिनेमात येऊन धडकलंय. नाव आहे ‘कांतारा’.’कांतारा’ चा पहिल्या १२ दिवसांचा कमाईचा अधिकृत आकडा ६० कोटींचा आहे. केवळ कन्नड भाषेचा. आज १५ दिवसानंतर हा सिनेमा हिंदी सह तामिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झालाय. माझी परिस्थिती जशी केजीएफ च्या वेळेला होती तशीच आजही होती. सिनेमागृहाच्या अंधारात प्रवेश घेण्याआधी ‘कोण हा ऋषभ शेट्टी?’ हा प्रश्न घेऊन मी आत शिरलो आणि एक्झिट घेतांना ‘काय कमाल आहे हा ऋषभ शेट्टी!’ असे म्हणत बाहेर आलोय.

कथानक थोडक्यात. कर्नाटकाच्या एका राजाने साधारण १८०० च्या शतकाच्या मध्यात, जंगलातील एका दैवी शक्तीला शरण जात, त्याच्या राज्यातील जंगलाची जमीन तेथे राहणाऱ्या आदिवासी लोकांना दिलेली असते. बदल्यात ती दैवी शक्ती राजाला आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना सुखाने आणि शांततेने नांदता येईल असा आशीर्वाद देते. जर ही जमीन कधी परत मागितली तर त्याच्या कुळाचा नाश होईल याचा सुद्धा इशारा दिलेला असतो. काळ लोटतो. शतक लोटते. साधारण १९७० या वर्षात राजाच्या घराण्यातील वारसदार ज्याला ही जमीन परत हवी आहे, तो सुद्धा यशस्वी होत नाही आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. आता वर्ष आहे १९९० चे. मृत्यु झालेल्या वारसदाराची पुढची पिढी म्हणजेच जमीनदार देवेंद्र (अच्युत कुमार) चे आता या जंगलावर अप्रत्यक्ष आणि अनधिकृत हुकूम चालत असतो. गरीब-भोळ्या आदिवासी लोकांना व्यसनाधीन बनवून त्यांची जमीन आपल्या नावावर करून घेण्याचा उद्योग देवेंद्र करत असतो. त्याच्यासाठी काम करणाऱ्या शिवा (ऋषभ शेट्टी) ला मात्र त्याचा हा डाव माहीत नसतो. जंगलातील दैवी शक्तीच्या आराधनेसाठी म्हणून एका उत्सवाची परंपरा तिथे वर्षानुवर्षे चालू असते. यात नृत्य करणाऱ्या नर्तकाच्या अंगात येऊन ही दैवी शक्ती गावकऱ्यांशी संवाद साधते अशी मान्यता असते. दरम्यान जंगलात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून रुजू झालेल्या मुरली (किशोर) सोबत सुद्धा शिवा चे खटके उडत असतात ज्याला कारणीभूत सुद्धा देवेंद्रच असतो. पुढे जाऊन मुरली एका प्रकरणात शिवाला तुरुंगाची हवा खाऊ घालण्यात यशस्वी होतो तेंव्हा देवेंद्र शिवाच्या चुलत भावाची हत्या करतो. ती का करतो? शिवाला देवेंद्रचे सत्य रूप कसे कळते? यातून शिवा आणि मुरली मधील गैरसमज कसे दूर होतात? आणि मुख्य म्हणजे दैवी शक्ती शी संवाद साधणाऱ्या नर्तिकेशी आणि या उत्सवाशी शिवाचा काय संबंध असतो या सर्व प्रश्नांनाची उत्तरे पुढे प्रेक्षकांना मिळतात.

कथानक १००% नावीन्यपूर्ण आणि एकदम फ्रेश असे आहे. ढोबळमानाने बघितल्यास हा नेहमीचाच चांगला विरुद्ध वाईट, सत्य विरुद्ध असत्य असाच संघर्ष आहे पण लेखक-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने विषयाला दिलेली पार्श्वभूमी आणि केलेले सादरीकरण अगदी हटके आहे. चित्रपट बघतांना जंगलातील कथानक असल्यामुळे म्हणा पण ‘पुष्पा’ या सिनेमाची सातत्याने आठवण येते.  काहींना ‘पुष्पा’ पेक्षा यात कमी फिल्मी मसाला असल्याने कदाचित डावा पण वाटेल पण तशी तुलना करणे खरेतर अयोग्य ठरते. ऋषभ शेट्टी ने इथे जंगलातील दैवी शक्ती आणि तिच्या प्रभावाने घडणाऱ्या घटना या कथेच्या केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. इथे अप्रत्यक्षपणे निसर्ग विरुद्ध मनुष्य असा संघर्ष लेखकाला अभिप्रेत आहे, ज्या संघर्षाला मानवी भावनांची झालर आहे. निसर्गाला आणि त्याच्या आडोशाखाली असणाऱ्या मानवी संस्कृतीला, त्यांच्या आस्थांना  जपा नाहीतर देव मनुष्याला माफ करणार नाहीत असा संदेश लेखकाला द्यायचा आहे हे चित्रपट बघतांना जाणवते. बरं हा संदेश ऋषभने मोठ्या प्रभावीपणे व करमणूक करत दिलाय हे विशेष.

पटकथा मध्यंतरापर्यंत काहीशी धीम्या गतीने पुढे सरकते परंतु मध्यंतरानंतर ते अगदी शेवटपर्यंत तिची गती प्रचंड आहे. शेवटची २० मिनिटे व खासकरून क्लायमॅक्स तर चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. एडिटिंग अर्थात संकलन कमाल आहे. वेगळ्या धाटणीच्या कथेचे सादरीकरण सुद्धा तितकेच हटके आहे. छायांकन, ऍक्शन दृश्ये आणि पार्श्वसंगीत या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये कांतारा उत्तम आहे. खासकरून अरविंद कश्यप यांचे सुंदर असे छायांकन. एक ना एक फ्रेम जबरदस्त. बी अजनीश लोकनाथ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत या दोन्हीत उत्तम काम केले आहे. केजीएफ आणि अवाने श्रीमानारायण या दोन चित्रपटांच्या ऍक्शन दृश्यांसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम मॉर यांनी दिग्दर्शित केलेली ऍक्शन दृश्ये अत्यंत परिणामकारक आहेत. वेगवान पटकथेला शोभतील असे खुसखुशीत संवाद ऋषभ शेट्टीने लिहिले आहेत.

लेखन आणि दिग्दर्शनासोबतच अभिनयातही ऋषभने दमदार कामगिरी केली आहे. देवेंद्रच्या भूमिकेत अच्युत कुमार आणि फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत अभिनेता किशोर यांचे काम चांगले आहे. कथेची नायिका लीला च्या भूमिकेत अत्यंत साधारण दिसणारी सप्तमी गौडा हिने आपल्या छोट्याशा भूमिकेला न्याय दिला आहे.

कांतारा बघावा की नाही हा प्रश्नच नाहीये. छायांकन, पार्श्वसंगीत आणि ऍक्शन दृश्ये यासाठी जमल्यास तो केवळ सिनेमागृहातच बघावा हा सल्ला आहे. बाकी कुठे बघावा.. तुमचा निर्णय. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Pramod
    On October 16, 2022 10:55 pm 0Likes

    लई भारी..

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.