-अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

प्रियदर्शन यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट (मल्याळम भाषेतील) प्रदर्शित होण्यास आता ३७ वर्षे लोटली आहेत. ‘मुस्कुराहट’ (रेवती, जय मेहता आणि अमरीश पुरी च्या प्रमुख भूमिका असलेला) नावाचा पहिला हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला ते वर्ष होतं १९९२, म्हणजे त्यालाही आता जवळपास ३० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मल्याळम, हिंदी, तामिळ आणि तेलगू असे सर्व भाषांचे मिळून प्रियदर्शन दिग्दर्शित चित्रपटांच्या यादीत सध्या साधारण ९० चित्रपटांचा समावेश आहे. ‘रंगरेज’ या २०१३ सालच्या त्यांच्या अखेरच्या हिंदी चित्रपटानंतर आता ८ वर्षांनंतर ‘हंगामा-२’ या चित्रपटाने परत एकवार प्रियदर्शन यांनी हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हातात घेतली आहे. २००३ साली ज्या ‘हंगामा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला अशा सिनेमाच्या नुसत्या नावाचा हा सिक्वेल. नुसत्या नावाचा म्हणजे आधीच्या आणि या ‘हंगामा’ च्या कथानकात काहीही साधर्म्य अथवा संबंध नाही असा. विशेष म्हणजे आधीचा ‘हंगामा’ (Hungama Film) हा प्रियदर्शन यांनी ज्या सिनेमाने चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले अशा त्यांच्याच मल्याळम सिनेमाचा (पुचाकुरू मुक्कुठी) रिमेक होता आणि नुकताच प्रदर्शित हंगामा-२ सुद्धा त्यांच्याच १९९४ सालच्या एका मल्याळम सिनेमाचा (मिन्नरम) हिंदी रिमेक आहे. दोन्ही मल्याळम सिनेमांनी मोठे यश प्राप्त केले होते परंतु पहिल्या हंगामाच्या तुलनेत १०% हंगामा करण्याइतकी सुद्धा हंगामा-२ ची पात्रता नाही. (Movie Review Hungama-2)

कर्नल गोबिंद कपूर (आशुतोष राणा) यांची दोन मुले आहेत, अमन (रमण त्रिखा) आणि आकाश ( मिझान जाफरी). एके दिवशी वाणी (प्राणिथा सुभाष) नावाची तरुण मुलगी एका छोट्या मुली गहेना ला घेऊन कर्नल गोबिंद कपूर यांच्या घरी येते व मोठा गौप्यस्फोट करते की आकाश हा माझा कॉलेज मधील प्रियकर आहे आणि गहेना ही तिला आकाशपासून झालेली मुलगी आहे. कर्नल साहेबांनी त्याच दरम्यान त्यांचा जवळचा मित्र व शहरातील मोठा उद्योगपती बजाज (मनोज जोशी) च्या मुलीसोबत आकाश चे लग्न ठरविलेले असते. हे ठरवलेले लग्न मोडू नये व स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून मग ते या प्रकरणातील सत्य बाहेर येईपर्यँत वाणी ला स्वतःच्या घरी ठेऊन घेतात. आकाश या सर्व प्रकरणाची माहिती सांगतो अंजली तिवारी ला, (शिल्पा शेट्टी) जिला तो बहिणीप्रमाणे मानत असतो. अंजली या प्रकरणात आकाश ला मदत करण्याचे ठरवते. अंजली चा वयस्क नवरा आहे राधेश्याम तिवारी (परेश रावल).  अंजली आकाशला मदत करीत असतांना राधेश्याम चा असा गैरसमज होतो अंजली हीच गर्भवती आहे आणि होणाऱ्या बाळाचा बाप आकाश आहे. त्यामुळे अजूनच गोंधळ उडतो आणि गुंतागुंत वाढतच जाते. या सर्व गोंधळातून अखेरीस सत्य बाहेर येते.

कथा-पटकथेला दोष द्यावा असे काही नाही परंतु ज्या ९४ सालच्या प्रियदर्शन यांच्याच ‘मिन्नरम’ ची ही कथा आहे त्यात प्रियदर्शन यांनी आजच्या प्रेक्षकास समोर ठेऊन काही बदल करणे अथवा सादरीकरणाची स्टाईल बदलणे आवश्यक होते, अपेक्षित होते, जे इथे अजिबात झालेले नाही. त्यामुळे नाहक आधीच्या ‘हंगामा’ शी तुलना झाल्यावर हा हंगामा अगदीच फिका वाटतो. याला हंगामा-२ हे नाव न देता इतर नावाने चित्रपट प्रदर्शित केला असता तर उलट कमी नुकसान झाले असते असे वाटते. २ तास ३५ मिनिटांची लांबी आणि अतिशय निराशाजनक संगीत (अनु मलिक) यामुळे प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतल्यासारखी वाटते. त्यामुळे कथेतील काही चांगले विनोदी सीन्स सुद्धा प्रभावहीन ठरतात. अभिनयाच्या बाबतीत परेश रावल, आशुतोष राणा या ज्येष्ठांनी अपेक्षेप्रमाणे आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. शिल्पा शेट्टी, अभिनेता मिझान जाफरी (अभिनेता जावेद जाफरी चा मुलगा), प्राणिथा सुभाष, मनोज जोशी यांनीही स्वतःच्या भूमिकांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे परंतु नावीन्य नसलेले कथानक व सादरीकरण व रटाळ दिग्दर्शन यामुळे या पात्रांसोबत प्रेक्षक कुठेही कनेक्ट होत नाही. एन.के. एकंबरम यांचे छायाचित्रण मात्र सुरेख आहे. 

२००७ सालच्या अपने या चित्रपटानंतर गायब झालेली शिल्पा शेट्टी तब्बल १४ वर्षानंतर हंगामा-२ द्वारे परतली आहे. सध्या राज कुंद्रा या तिच्या नवऱ्याने केलेला पॉर्न चित्रपटांचा हंगामा मिडीयात गाजतोय. शिल्पाच्या कमबॅक सिनेमासाठी म्हणून ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या तिच्या चित्रपटातील “चुराके दिल मेरा” या सुपरहिट गाण्याचे चे २.० व्हर्जन अनु मलिक ने या चित्रपटासाठी वापरले आहे. गाणे बरे जमले असले तरी एकंदरीत हंगामा चे हे २.० व्हर्जन मात्र प्रेक्षकांचे ‘दिल चोरी’ करण्यात मात्र खूपच कमी पडले आहे. 

हेही वाचा – MOVIE REVIEW TOOFAAN; तुफान

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.