– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Sharmaji Namkeen Movie Review ‘बाय वन अँड गेट वन फ्री’ म्हणजे ‘एक पे एक फ्री’ ही ऑफर आपल्या अतिशय आवडत्या वस्तूवर कोणी देत असेल…  तेही अचानक म्हणजे आपल्याला अजिबात अपेक्षित नसतांना तर साहजिकच आपल्याला आनंद होणारच ना? आपल्या अतिशय आवडत्या वस्तूंची लिस्ट तशी आपल्या डोक्यात असतेच. माझ्यासाठी सध्याच्या कमालीच्या तापत्या वातावरणात एखाद्या आईस्क्रीम पार्लरमध्ये बटरस्कॉच फ्लेवर वर वर डार्क चॉकलेट चा कोन फ्री मिळाला तर माझ्यासाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल. मल्टिप्लेक्स सिनेमा संस्कृतीत सिनेमा तिकिटांच्या पैशात नको असतांनाही एखादा फूड कॉम्बो बळजबरी फ्री सांगून प्रेक्षकांच्या माथी मारण्यात येतो. तसा तो फ्री नसतोच हे आपण जाणतो. असो. मला हे सुचण्याचे कारण म्हणजे हिंदी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदा एक अशी धमाल एक वर एक फ्री ऑफर आली आहे. या ऑफर मध्ये एकाच चित्रपटातील एकाच भूमिकेसाठी एका प्रतिभावान कलाकारावर चक्क दुसरा तितकाच प्रतिभासंपन्न कलाकार फ्री आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर आज प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे नाव आहे ‘शर्माजी नमकीन’ आणि शर्माजींच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणारे हे ग्रेट कलावंत आहेत ऋषी कपूर आणि परेश रावल. 

सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ऋषी कपूर यांचे दुःखद निधन झाले. सिनेमा इंडस्ट्रीत साधारणपणे अशा परिस्थितीत निधन झालेल्या कलाकाराचा शूटिंग झालेला भाग वगळून त्या जागी दुसऱ्या कलाकाराची वर्णी लागते आणि सर्व शूटिंग परत नव्याने करण्यात येते अथवा तो सिनेमा नेहमी साठी डब्यात जातो. परंतु असं पहिल्यांदाच घडले आहे की सिनेमाच्या निर्मात्यांनी त्या निधन झालेल्या कलाकाराचा पार्ट तसाच ठेऊन उर्वरित भूमिका एखाद्या दुसऱ्या कलाकाराकडून पूर्ण करून घेणे आणि दोन्ही कलाकारांच्या भूमिकेत तो सिनेमा प्रदर्शित करणे. हे एक प्रकारचे धाडस आहे आणि हे धाडस केल्याबद्दल शर्माजी नमकीन चे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट चे फरहान अख्तर, रितेश सिधवानी हे अभिनंदनास पात्र आहेत. एक तर अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग ज्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील याची खात्री नाही दुसरे  एकाच भूमिकेत दोन कलाकारांना बघतांना दोन पैकी एक कलाकार थोडाफार जरी कमी पडला तर सिनेमाचा एकत्रित परिणाम कमी होण्याची भीती… म्हणूनच की काय ही रिस्क यापूर्वी कोणी घेतलेली नाही. या धाडसाबद्दल शर्माजी नमकीन च्या सुरुवातीलाच ऋषी कपूर यांचे चिरंजीव रणबीर प्रेक्षकांशी संवाद साधतात आणि ऋषी यांच्यासाठी हा सिनेमा किती महत्वाचा होता आणि परेश रावल यांनी दाखविलेल्या सौजन्यामुळे, सहकार्यामुळे अखेरीस ऋषी कपूर यांचा अभिनेता म्हणून शेवटचा प्रोजेक्ट कसा पूर्ण होऊ शकला हे रणबीरने सांगितले आहे. शर्माजी नमकीन चे दिग्दर्शन केलेले हितेश भाटीया यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. 

कथानक अत्यंत साधे आहे. दिल्ली स्थित मध्यमवर्गीय शर्माजी आयुष्यभर नौकरी केल्यानंतर आता निवृत्त झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले आहे आणि आता त्यांच्यासोबत आहेत त्यांची दोन मुले. कुकिंग हा शर्माजींचा छंद. रिटायर्ड लाईफ मध्ये  स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा या मताचे शर्माजी असतात. मग हा व्यवसाय कुकिंगचा असावा म्हणजे एखादे छोटेसे हॉटेल असावे या त्यांच्या प्रपोजल ला त्यांच्या मोठ्या मुलाचा संदीपचा (सुहेल नय्यर) चा साफ नकार असतो. एकाहून एक लज्जतदार डिशेस बनविणारे शर्माजी रिटायर्ड लाईफ मध्ये वेळ कसा काढायचा या प्रश्नाचे उत्तर शोधत असतात. या प्रश्नाचे उत्तर शर्माजींना मिळते त्यांचे मित्र कम शेजारी चड्ढा (सतीश कौशिक) यांच्याकडून. उत्तर काहीसे विचित्र असल्याने सुरुवातीला शर्माजी नाही म्हणतात पण नंतर स्विकारतात. दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतीत चालणाऱ्या महिला वर्गाच्या किटी पार्टीज मध्ये शर्माजी एकदा कुक म्हणून जातात. सहज म्हणून करून बघू यात या विचाराने शर्माजी हे काम करतात. त्यांच्या यम्मी डिशेस खाऊन किटी पार्टीज च्या महिलांचा ग्रुप शर्माजींवर फिदा होतो आणि त्यांना सातत्याने कुक म्हणून तुम्हीच हवेत हा आग्रह सुरु होतो. महिलांच्या या किटी पार्टीज च्या ग्रुपमध्ये एक जण आहेत मिसेस मनचंदा (जुही चावला) ज्यांच्या आग्रहाला शर्माजी नाही म्हणू शकत नसतात. मुलांपासून लपवून शर्माजी या पार्टीज मध्ये कुक म्हणून जातात खरे पण एके दिवशी हे सत्य संदीप आणि इतर लोकांसमोर येतेच. पुढे काय होते हा कथासार. 

कथानकाचे सादरीकरणही शर्माजींप्रमाणे सरळ आहे आणि ते बनवत असलेल्या डिशेस प्रमाणे बऱ्याच ठिकाणी नमकीन पण आहे. मध्यंतरापर्यंत बऱ्यापैकी गुंतवून ठेवणारी ठेवणाऱ्या कथानकाचा वेग नंतर मात्र मंदावतो. पटकथेत फारशा त्रुटी जरी नसल्या तरी नाट्यमय घटनांची रेलचेल कमी असल्याने पकड ढिली पडते. त्यामुळे प्रि-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स चा परिणाम सुद्धा अपेक्षेपेक्षा कमी आहे. या ठिकाणी दिग्दर्शक नवखा असल्याचा परिणाम जाणवतो. ही पडती बाजू सांभाळून नेली आहे ती ऋषी कपूर आणि परेश रावल या चरित्र भूमिकांच्या दोन हुकुमी एक्क्यांनी. दोन्ही कलाकारांच्या अभिनय प्रतिभेबद्दल तर काही बोलायलाच नको. शर्माजी या एकाच भूमिकेत दोघांना बघणे म्हणजे ट्रीट आहे. सोने पे सुहागा म्हणतात तसे काहीतरी. आपण एकाच भूमिकेत दोन वेगळ्या कलाकारांना एकाच चित्रपटात बघत आहोत यात काही ऑड वाटण्याऐवजी रंगतदार वाटते. काही सीन्स मध्ये ऋषी बाजी मारतात तर काहींमध्ये परेश. दोघेही लाजवाब. ऋषी कपूर यांच्या तब्बल ४५ वर्षांच्या अभिनय प्रवासाचा त्यांच्या निधनानंतर झालेला हा नमकीन क्लायमॅक्स नेहमी लक्षात राहील. इतर कलावंतांमध्ये सुहेल नय्यर, जुही चावला, सतीश कौशिक, परमीत सेठी, इशा तलवार यांच्या भूमिका छान झाल्या आहेत. संगीत/पार्श्वसंगीत याबाबतीत सुद्धा चित्रपट नमकीन आहे. संगीतकार स्नेहा खानवलकर चे यासाठी विशेष कौतुक. संवादात मात्र मीठ थोडं कमी पडलं आहे . 

गणेशोत्सवात नेहमीच पेण च्या मूर्तींची एक वेगळी लोकप्रियता आहे आणि नेहमीच असते. मूर्तीमधील सुबकता आणि चेहऱ्यावरील भावांमध्ये असलेली सात्विकता ही त्यांची विशेषता असते. कधी कधी तर तेथील एकाच साच्यात बनलेल्या दोन वेगवेगळ्या मूर्तींमध्ये काय फरक आहे हे लक्षातच येत नाही. कितीही डोके खाजवले तरी यातील जास्त सुंदर कोणती हे ठरवताच येत नाही आणि शेवटी आपण कुठली तरी एक घरी आणतो. अगदी त्याचप्रमाणे चरित्र भूमिकांच्या साच्यांमध्ये घडलेल्या ऋषी आणि परेश या दोन महान मूर्तींमध्ये कोण उजवा कोण डावा हे ठरवणे अशक्य आहे. त्या फंदात न पडता एकाच दामात आपल्याला दोन्ही मूर्ती घरी आणायला मिळत आहेत ना याचा जास्त आनंद मानावा आणि शर्माजी नमकीन जरी असले तरी गोड मानावे असे मला वाटते. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment