– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Jugjugg Jeeyo Movie Review. घटस्फोट या अंतिम निर्णयापर्यंत येऊन ठेपलेली दोन विवाहित जोडपी आहेत. त्यातले एक जोडपे “अरेंज्ड मॅरेज” श्रेणीतले आहे तर दुसरे “लव्ह मॅरेज”. ‘अरेंज्ड’ इतके टोकाचे की लग्न झाल्यावर ४ दिवसांनी एकमेकांशी संवाद साधायला मिळालाय आणि दुसरे ‘लव्ह’ पण तितके टोकाचे की किशोरवयीन तर सोडाच पण लहानपणापासून एकमेकांवर प्रेम. ‘लव्ह’ मॅरेज वाले जोडपे लग्नाच्या केवळ ५ वर्षानंतर घटस्फोटापर्यंत आले आहे आणि ‘अरेंज्ड’ वाल्या जोडप्याला हा निर्णय लग्नाच्या ३५ वर्षांनी घ्यावा वाटतोय. का घ्यावा वाटतोय? नेमके कारण काय आहे? तेवढं सोडून बोला .. कारण ते नेमकं कारण अजिबात दाखवण्यात आलेलं नाहीए. ते तुम्ही पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादांमधून समजून घ्यायचे. असो. आता हे लव्ह मॅरेज वालं जोडपं घटस्फोटाचा निर्णय आई-वडिलांना सांगायला जातात तेंव्हा ते सांगायच्या आधीच समोरून मुलाचे वडील मुलाला सांगतात की ‘मी लवकरच तुझ्या आईला घटस्फोट देणार आहे!’. वर उल्लेख केलेले अरेंज्ड मॅरेज वाले जोडपे म्हणजे त्यांचे आई-वडील व लव्ह वाले म्हणजे त्यांचा मुलगा आणि सून. वडिलांच्या या धक्कादायक निर्णयाने हादरलेला मुलगा मग यातून कसा मार्ग काढतो आणि आई-वडिलांचे आणि स्वतःचे वैवाहिक आयुष्य कसे पूर्वपदावर आणतो त्याची कथा म्हणजे राज मेहता दिग्दर्शित नुकताच प्रदर्शित चित्रपट ‘जुगजुग जियो’. 

आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत भीम सैनी (अनिल कपूर) आणि गीता सैनी (नीतू सिंग) तर त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भूमिकेत आहेत कुकू (वरुण धवन) आणि नैना (कियारा अडवाणी). कुकू आणि नैना यांचे सध्या वास्तव्य कॅनडा मध्ये आहे. कुकू चे करिअर लग्नाच्या ५ वर्षांनंतरही अजूनही ट्रॅक वर आलेले नाही पण दुसरीकडे नैनाचा करिअरचा ग्राफ सातत्याने चढता. दोघांमध्ये वादाची ठिणगी पडण्याचे हे एक प्रमुख कारण असते. दरम्यान भीम आणि गीताची मुलगी आणि कुकूची लहान बहीण गिनी (प्राजक्ता कोळी) हिच्या लग्नाची तयारी सैनी कुटुंबात चालू असते. गिनी आपल्या प्रियकराला सोडून एका वेलसेटल्ड मुलासोबत लग्न करणार असते. पण घरातील व्यक्तींच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या या वादळाने गिनी चक्रावून जाते आणि अरेंज्ड आणि लव्ह असे दोन्ही मॅरेजेस एकाच वेळी फेल होतांना बघून आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर हा प्रश्न तिला पडतो. यातून कथानक पुढे कसे सरकते हा कथाभाग पडद्यावर पाहणे उचित. 

चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन्स ची असल्याने अपेक्षेप्रमाणे चित्रपटाची प्रत्येक फ्रेम चकचकीत आणि आकर्षक आहे. निर्मिती मूल्ये लॅव्हिश आहेत. टिपिकल पंजाबी फॅमिली (जी करणच्या आणि यशराज फिल्म्स च्या जवळपास प्रत्येक चित्रपटात असते) इथेही आहे. सोबतीला टिपिकल पंजाबी फ्लेवर्ड म्युझीक, भरजरी डिझायनर्स कॉस्च्युम्स, आलिशान घर-गाड्या इत्यादी इत्यादी गुडी-गुडी वाटणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरेपूर वापर करण्यात आलाय. अनुराग सिंग यांनी लिहिलेल्या कथानकात नावीन्य आहे पण असे असले तरी अनुराग सिंग यांच्या सोबतीला ऋषभ शर्मा, सुमित बठेजा आणि नीरज उधवानी यांनी लिहिलेल्या पटकथा लेखनात एक मोठ्ठी घोडचूक झाली आहे. ती एक चूक चित्रपटात असलेल्या शंभर चांगल्या गोष्टींवर पांघरून घालणारी आहे. कुकू आणि नैना व सोबत भीम आणि गीता यांचे वैवाहिक आयुष्य घटस्फोटापर्यंत येण्यामागे नेमके आणि ठळक असे कोणते कारण आहे याबाबत खुलासा न करणे. निदान त्याला पूरक असे काही प्रसंग जरी दाखवले असते तरी चालले असते पण हा निर्णय दोन जोडप्यांनी का घेतला हे कथेच्या अंतिम काही प्रसंगांमध्ये व तेही केवळ संवादांमधून एस्टॅब्लिश होते.

पटकथेतल्या या मोठ्ठ्या घोडचुकीमुळे प्रेक्षक कुठेही दोन्ही जोडप्यांच्या वेगळ्या होण्याच्या दुःखात शेवटपर्यंत सामीलच होत नाही. ऋषभ शर्मा यांनी लिहिलेले संवाद प्रभावी आहेत पण तकलादू पटकथेमुळे त्यांचाही फारसा परिणाम होत नाही. असे असले तरी आणि या मोठ्ठ्या घोडचुकीकडे दुर्लक्ष केले तर चित्रपट बऱ्यापैकी पकडून ठेवतो हेही तितकेच खरे. त्याला कारण म्हणजे नाविन्यपूर्ण कथानक आणि प्रमुख पात्रांचा सुंदर अभिनय. अनिल कपूर झक्कास, नीतू कपूर छान, वरुण आणि कियारा दोघेही उत्तम. लोकप्रिय यु-ट्युबर प्राजक्ता कोळी आणि टिस्का चोप्रा यांचा अभिनय ठीकठाक. मनीष पॉल चे पात्र (कियारा चा भाऊ गुरप्रीत म्हणून) रंगतदार झाले आहे. पटकथेला फारसे गंभीर न होऊ देता लाईट कॉमेडी अँगलने दिग्दर्शक राज मेहता यांनी हाताळले आहे. यापूर्वी धर्मा प्रोडक्शनच्याच ‘गुड न्यूज’ या पहिल्याच चित्रपटातून राज मेहता यांनी आपल्या प्रगल्भ दिग्दर्शनाचे संकेत दिले होते. गीत संगीतात मात्र चित्रपट निराश करतो. एकही गाणे हिट या सदरात ना मोडणारे.

एकंदरीत तुमच्यासमोर करमणुकीचे दुसरे काहीच ऑप्शन नाही म्हणून जर तुम्ही ‘जुगजुग जियो’ साठी चित्रपटगृहात दाखल झालाच तर तुम्ही अतिशय काही तरी वाईट पहिले म्हणून पश्चाताप करीत चित्रपट गृहाबाहेर पडाल असे अजिबात होणार नाही. खूप काही जगावेगळे पहिले असेही होणार नाही. हां एक मात्र नक्की वाटेल एक वेगळ्या धाटणीची कथा, सोबतीला उत्तम कलाकार असतांना याहीपेक्षा छान बनू शकली असती. जस्ट ऍव्हरेज. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment