– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

RRR Movie Review आजच्या मल्टिप्लेक्स च्या काळात साधारणपणे फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणजे सकाळी १० च्या आसपास असतो.  सिंगल स्क्रीनच्या काळात ही वेळ ११-११:३० ची फिक्स असायची. सिनेमाची लांबी मोठी असेल किंवा क्रेज खूप असेल तर ९ वाजता पण शो हल्ली असतो. पण ‘आरआरआर’ साठी सकाळी ८ वाजून १० मिनिटांचा फर्स्ट शो बघून मला नवल वाटले. मनात म्हटलं इतक्या सकाळी येऊन येऊन आपल्या महाराष्ट्रातील अशी किती पब्लिक येणार? तेही दाक्षिणात्य नायकांना बघायला! हे काय हैदराबाद किंवा चेन्नई थोडी आहे! सिनेमागृहात शिरल्यावर मी जवळपास तोंडावर आपटलो होतो. आतील अंधारामुळे नाही हो तर चक्क इतक्या सकाळचा शो सुद्धा फुल्ल बघून! बाहुबली च्या दोन भागांवर दिग्दर्शक एस.एस. राजामौली ने कमावलेली पुण्याई होती ही. ८० किंवा ९० च्या दशकात ज्यांनी निदान आपले बालपण तरी जगले आहे असे आजचे वयाच्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेले प्रेक्षक, (कारण २००० च्या नंतर जन्म झालेला व आज वयाच्या २२ व्या वर्षात असलेला तरुण प्रेक्षक त्याच्या जन्मापासून बहुतांश प्रमाणात वास्तववादी सिनेमाच बघत आलाय) ज्यांना तद्दन फिल्मी सिनेमा सिनेमागृहात बघण्याची सवय आहे, आवड आहे अशा सर्वांना बाहुबली नामक ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभवाने राजामौली च्या प्रेमात पाडले आहे. ‘आरआरआर’ च्या इतक्या सकाळच्या शोला असलेली गर्दी हेच सिद्ध करीत होती. 

सिनेमा सुरु झाल्यावर साधारण सुरुवातीच्या १५-२० मिनिटात राजामौली ‘आरआरआर’ या नावामधील मधील तीन आर ची ओळख प्रेक्षकांना त्यांच्या खास स्टाईलने करून देतात. एक आर आहे ‘STORY’ मधील ‘R’ ज्यात आपल्याला कथानकाचा साधारण अंदाज येतो, दुसरा आहे ‘FIRE’ मधील ‘R’ आणि तिसरा आहे ‘WATER’ मधील ‘R’. आता तुम्ही म्हणाल हे फायर आणि वॉटर चे ‘R काय भानगड आहे? कथेच्या दोन नायकांच्या व्यक्तिरेखांना डिफाईन करीत, त्यांना एस्टॅब्लिश करीत व त्यांचे आग आणि पाण्याशी साधर्म्य जोडीत, पुढच्या ३ तास ५ मिनिटांच्या प्रवासात तुमच्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची एक झलक राजामौली देतात. तीनही ‘R प्रेक्षकांना कळल्यावर जेंव्हा  ‘आरआरआर’ चे टायटल पडद्यावर झळकते तेंव्हा सिनेमागृहात शिट्ट्यांचा आणि दोन नायकांसोबत प्रेक्षकांच्या ओरडण्याचा एकच आवाज घुमत असतो. 

‘आरआरआर’ चे कथानक काय विचाराल तर अगदी एका वाक्यात सांगता येणारे. दोन क्रांतिकार्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात दिलेला सशस्त्र लढा. कालखंड साधारण १९०० ते १९२० च्या आसपास. कथानक पूर्णतः काल्पनिक आहे. पण काल्पनिक असले तरी दिग्दर्शक राजामौली यांना कथेची कल्पना सुचली ती खऱ्याखुऱ्या क्रांतिकार्यांच्या आयुष्यावरून. त्यात एक होते अल्लुरी सीताराम राजू..  तेलुगू क्रांतिकारक होते ज्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध सशस्त्र मोहीम चालवली होती. दुसरे होते कोमाराम भीम … गोंड जमातीतील क्रांतिकारक नेते, ज्यांनी कम्युनिस्ट क्रांतिकारकांच्या सहकार्याने हैदराबादच्या सरंजामशाही निजामांविरुद्ध आणि संस्थानाच्या पूर्वेकडील ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रदीर्घ बंड केले. सिनेमाचे दोन नायक रामचरण आणि एनटीआर ज्युनियर हे अनुक्रमे अल्लुरी सीताराम राजू व  कोमाराम भीम यांच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शक राजामौली यांनी दोन क्रांतिकार्यांचे आयुष्याचा अभ्यास केल्यानंतर एक काल्पनिक कथानक रचले. हे दोन क्रांतिकारी मित्र असले असते आणि त्यांनी सोबत लढा दिला असता तर काय झाले असते या कल्पनेला पटकथेत रुपांतरीत करण्यात आले आणि ‘आरआरआर’ नामक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला एकमेकांच्या बाबतीत असलेल्या गैरसमजाने एकमेकांच्या विरोधात उभे असलेले हे क्रांतिकारी सिनेमाचा प्रवास मध्यंतरानंतर जेंव्हा सुरु होतो तेंव्हा आपला लढा एकत्र कसा लढतात ही साधारण पटकथा. ती इथे विस्तारात सांगणे योग्य ठरणार नाही. 

बाहुबली च्या दोनही भागांची पारायणे एव्हाना प्रेक्षकांची झाली आहेत त्यामुळे आणि ट्रेलर बघून ‘आरआरआर’ कडून तशाच लार्जर दॅन लाईफ आणि तद्दन फिल्मी अंदाजाची अपेक्षा ठेऊनच प्रेक्षक सिनेमागृहात शिरतो. सिनेमा पहिल्या दृश्याच्या पहिल्या फ्रेमपासून तुमच्या अपेक्षा नुसत्या पूर्ण करीत नाही तर त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद तुम्हाला देत जातो. सिनेमाचा प्रत्येक सीन हा भव्यदिव्य आहे. सिनेमातील प्रत्येक दृश्य हे नयनरम्य आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व तंत्रज्ञांचा पुरेपूर, मनसोक्त आणि धमाल वापर करीत  राजामौली तुम्हाला एका काल्पनिक जॉयराईड वर घेऊन जातात. जे घडतंय, जे दिसतंय ते सर्व काल्पनिक आहे, फिल्मी आहे, व्यावसायिक आहे व सत्यतेच्या/वास्तविकतेच्या कुठल्याच चौकटीत बसणारे नाही हे पुरते कळत असूनही केवळ आ वासून बघत बसण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही.

३ तास ५ मिनिटांच्या एकूण लांबीत मोजून ५ मिनिटे सुद्धा तुम्हाला कुठेही कंटाळवाणी न होऊ देता, उलट या सीन नंतर आता पुढचा सीन काय असेल आणि त्याहीपेक्षा ‘तो कसा दिसेल’ याची उत्सुकता वाढवणारा बनविणे याकरिता दिग्दर्शक राजामौली यांना ‘जस्ट हॅट्स ऑफ’. दिसतंय ते लॉजिकला फाट्यावर मारणारे आहे हे सर्व समजूनही आपण त्याचा आनंद घेत बसतो. राजामौली म्हणजे एक अशक्य माणूस आहे असं आता वाटायला लागलंय. मी तर म्हणेन हा माणूस भारतीय सिनेमाचा आजचा मनमोहन देसाई आहे. मी राजामौली आणि मनमोहन देसाई यांच्या प्रतिभांची तुलना करत नाहीए .. तशी होऊच शकत नाही पण ७०/८० च्या दशकात हिंदी सिनेमांमध्ये ज्या कुठल्या अशक्य वाटतील अशा गोष्टी ज्यांनी प्रेक्षकांना यशस्वीरीत्या दाखविल्या तशाच प्रकारच्या आजच्या काळात राजामौली दाखवीत आहेत. उदाहरण द्यायचेच झाल्यास असाच ब्रिटिश कालीन कथेची पार्श्वभूमी असलेला मनमोहन देसाई यांचा अमिताभ अभिनीत ‘मर्द’ सिनेमा होता. या सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यात दारा सिंग दोरी आपल्या हाताने मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने  उडण्यास तयार असलेले विमान रोखून धरतात. अशा अशक्यप्राय दृश्यांवर त्याकाळी सिंगल स्क्रीनचा प्रेक्षक फुल्ल शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायचा. आज ‘बाहुबली’ असो की आता ‘आरआरआर’, राजामौली अशाच अशक्यप्राय ऍक्शन दृश्ये त्यांच्या सिनेमांमध्ये दाखवत आहेत. ज्याला आजचा प्रेक्षक तुफान प्रतिसाद देतोय. ‘आरआरआर’ मध्ये अशा ऍक्शन दृश्यांची लयलूट आहे ज्याला चोखंदळ प्रेक्षक नावे ठेवील, नाके मुरडतील पण त्याने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील पराक्रमावर काहीही परिणाम होणार नाही. 

सिनेमाची खरी यूएसपी आहे त्याची ऍक्शन दृश्ये आणि सिनेमाचे व्हिज्युअल इफेक्टस ने भरगच्च असे छायांकन. एकदम जागतिक दर्जाची. जिथे सिनेमाचे निर्मिती मूल्य ४००-५०० कोटीच्या जवळपास गेले आहे अशा वेळी दिग्दर्शक राजामौली व निर्माते डी.व्ही.व्ही. दानय्या यांनी कुठलीच कसर बाकी ठेवलेली नाही हे पदोपदी सिनेमा बघतांना जाणवते. जागतिक दर्जाच्या छायांकनाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे संगीत व खासकरून पार्श्वसंगीत. एम एम क्रीम या दक्षिणेतील बापमाणसाने दिलेले. सिनेमातील गाणी बाहुबली च्या तुलनेत जरा कमी पडल्यासारखी वाटतात पण त्याने कथानकावर फारसा प्रभाव पडत नाही. त्यात नाचो नाचो या गाण्याने तर प्रदर्शापूर्वीच सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहेच. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन अफलातून झालंय. रिया मुखर्जी यांचे संवादही प्रभावी आहेत. 

दाक्षिणात्य सुपरस्टार्स रामचरण आणि एनटीआर ज्युनियर यांनी आपापल्या भूमिकांसाठी घेतलेली प्रचंड मेहनत स्पष्टपणे दिसून येते. दोघांचा अभिनय व त्यांचे ऍक्शन्स सीन्स पाहून हिंदी सिनेमाचा प्रेक्षकही दोघांच्या प्रेमात पडेल. अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या भूमिकांची लांबी तशी खूपच कमी आहे पण तरीही पटकथेत त्यांचे महत्व असल्याने लक्षात राहणाऱ्या आहेत. ब्रिटिश गव्हर्नर स्कॉट च्या भूमिकेत हॉलिवूड अभिनेता रे स्टीव्हन्सन यांचे कामही छान झाले आहे. 

तुम्हाला हास्यास्पद वाटेल … का कुणास ठाऊक पण मला ‘आरआरआर’ च्या सुरुवातीला नायकांच्या व्यक्तिरेखांची तुलना आग आणि पाण्यासोबत होत असतांना आणि नंतर एकंदरीत राजामौली ने चित्रपटभर आग आणि पाण्याचा जो खेळ दाखवला आहे तो बघून तीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९२ साली ज्या सिनेमाने सुनील शेट्टी चे पदार्पण झाले होते तो ‘बलवान’ हा चित्रपट आठवला. त्या सिनेमातील खलनायक असलेल्या भाईजी डॅनी च्या तोंडी एक संवाद होता जो तेंव्हा खूप लोकप्रिय झाला होता. तो होता “आग, पानी और भाईजी के साथ नहीं खेलना… आग जलाता है, पानी डुबोता है और भाईजी तड़पाता है” हिंदी सिनेमाच्या टिपिकल बॉलिवूड च्या प्रस्थापित मंडळींच्या अस्तित्वाला शह देत, आज दाक्षिणात्य सिनेमाला जागतिक दर्जावर नेण्यात ज्या  दिग्दर्शकांचा सहभाग आहे त्यात सिंहाचा वाटा राजामौली यांचा आहे. भारतीय सिनेमाचा आजचा बडा भाईजी. 

‘आरआरआर’ २डी आणि ३डी दोन्हीत आहे. दृश्यकलेचा केलेला सर्वोत्तम वापर असे ज्याबद्दल म्हणता येईल असा ‘आरआरआर’ मी आज तरी २डी मध्ये पाहून चूक केली … तुम्ही ती चूक करू नका. पहावा की नाही हा प्रश्नच नाहीए… ३डी मध्येच पहा हा सल्ला आहे. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Aashish deode
    On March 25, 2022 9:03 pm 0Likes

    Best review… Seems to be a great & must watch movie.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.