– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Movie Review Antim The Final Truth; तीन वर्षांपूर्वी आयुष शर्मा या बहीण अर्पिताच्या नवऱ्याला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च करण्याचा निर्माता सलमान खानचा पहिला प्रयत्न म्हणजेच ‘लव्हयात्री’ बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला त्याच्या बरोबर एक महिन्यानंतर ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता ३ वर्षे होऊनही आयुषला कुठल्या सिनेमाची ऑफर येईना म्हणून सलमान भाईला अपनी बहेन के वास्ते पुन्हा निर्माता व्हावे लागले आणि एवढेच नाहीतर स्वतः त्या सिनेमात काम करावे लागले आणि अखेरीस बरोबर तीन वर्षांनी काल म्हणजे २६ नोव्हेंबरला अंतिम प्रदर्शित झाला.  सलमान नुसताच पाहुणा कलाकार म्हणून भागणार नाही असे लक्षात आल्यावर मग मूळ मुळशी पॅटर्न मध्ये उपेंद्र लिमये यांनी रंगविलेली इन्स्पेक्टर विठ्ठल गोडबोलेची व्यक्तिरेखा (अंतिम मध्ये सरदार पोलीस इन्स्पेक्टर राजवीर सिंग) लांबवली गेली. भाईगिरी, अंडरवर्ल्ड अशा चित्रपटांचा दांडगा अनुभव व आवड असलेले व सलमान भाईचे खास महेश मांजरेकर यांच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली गेली. खरंतर जुलै २०२१ मध्ये अंतिम चे शूटिंग संपलं होतं तरी भाईच्या उपस्थितीचा बॉक्स ऑफिसवर अजून फायदा व्हावा व ‘आयुषचे फिल्मी आयुष्य वाढावे’ म्हणून सलमान भाईने अगदी गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये पुन्हा काही शॉट्स दिले. आज अंतिम पाहिल्यावर या सर्व प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळेल असे प्रथमदर्शनी तरी वाटतेय. 

मुळशी पॅटर्न हा मराठी सिनेमात रॉ ऍक्शन चा नवीन ट्रेंड सेट करणारा सिनेमा होता असे मला वाटते. वाढत्या शहरीकरणामुळे गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात नाममात्र दरात गेल्याने भिकेला लागलेल्या शेतकरी कुटुंबाची व्यथा आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गुन्हेगारी जगताकडे ओढली जाणारी शेतकऱ्याची आजची पिढी हे मुळशी पॅटर्नचे कथासार होते. अंतिम हा त्याचा अधिकृत रिमेक असल्याने हिंदी सिनेमाचा प्रेक्षकवर्ग समोर ठेऊन यात थोडेफार बदल करून बाकी सर्व तसेच ठेवण्यात आले आहे. प्रवीण तरडे यांच्या जागी उपेंद्र लिमये यांनी यात नन्या भाई साकारला आहे, सलमान उपेंद्र यांनी साकारलेल्या पोलीस इन्स्पेक्टर च्या जागी आहे तर ओम भुतकर ने रंगविलेला राहुल्या यात आयुष शर्मा ने साकारला आहे. राहुल्याच्या शेतकरी वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी यांच्या ऐवजी सचिन खेडेकर आहेत. हिंदी सिनेमा असूनही कथेचे केंद्रबिंदू असलेले शहर सुद्धा पुणे हेच ठेवण्यात आले आहे. मुळशी पॅटर्न बहुतांश रसिकांनी पाहिलेला असल्याने इथे पटकथेबद्दल सविस्तर लिहिणे व्यर्थ ठरेल. 

मला अंतिम बद्दल सर्वात जास्त आवडलेली बाब म्हणजे मुळशी प्रमाणेच हा सिनेमाही प्रचंड वेगाने पुढे सरकतो. सिनेमात हिंसाचाराचा ओव्हरडोस आहे, नावीन्य असे काहीही नाही, (मुळशी पॅटर्न पाहिलेल्यांसाठी तर अजिबातच नाही), अशा प्रकारचे गॅंगवॉर दाखविणारे (अंडरवर्ल्ड च्या ऐवजी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अनाधिकृत अधिग्रहण ही पार्श्वभूमी एवढाच काय तो फरक) शेकडो हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या माथी मारण्यात आलेले आहेत. असे असूनही अंतिम तुम्हाला बऱ्यापैकी गुंतवून ठेवतो हे विशेष. हो म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईजच होते. महेश मांजरेकर, अभिजीत देशपांडे आणि सिद्धार्थ साळवी या त्रयीने लिहिलेली पटकथा एअर-टाईट आहे जी अजिबातच विचार करायलाही वेळ न देणारी आहे. पुणे शहरात घडत असलेला बेसुमार हिंसाचार आणि त्यावर मख्खपणे काहीही न करू शकणारी पोलीस यंत्रणा हा अगदीच न पटणारा प्रकार आहे. म्हणजे चित्रपटात मध्यंतरानंतर तर कोणीही-कोणाला, दिसेल तिथे नुसताच ठोकत असतो आणि एवढे सर्व असूनही त्याठिकाणी कायद्याचे अस्तित्व अजिबातच दिसत नाही हे सर्व खूपच फिल्मी वाटतं. वेगवान पटकथेला साजेसे रॉकिंग पार्श्वसंगीत हा सुद्धा सिनेमाचा मोठा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. दक्षिणेतील प्रख्यात संगीतकार रवी बसरूर (केजीएफ फेम) यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. करण रावत यांचे छायांकन सुद्धा प्रभावी आहे. 

अभिनयाच्या बाबतीत आयुष शर्मा ने रंगविलेला राहुल्या अतिरंजित असला तरी प्रभाव पाडतो. बऱ्याच प्रसंगात मात्र तो आवश्यकतेपेक्षा खूप जास्त लाऊड वाटतो. अर्थात ही कथेची मागणी असल्याने त्याच्या जागी इतर कुठलाही कलाकार असाच वाटला असता. सलमान ला बऱ्याच  सीन्स मध्ये शहरात चालू असलेल्या हिंसाचारावर काहीही न करू शकणारा व नुसती बघ्याची भूमिका घेणारा इन्स्पेक्टर म्हणून बघणे हे त्याच्या फॅन्सला न आवडणारे ठरेल पण त्याच्या वाट्याला आलेली ऍक्शन दृश्ये याची भरपाई करणारी ठरतील अशीही शक्यता आहे. उपेंद्र लिमये ने रंगविलेला नन्या भाई, सचिन खेडेकरांचा शेतकरी बाप, महिमा मकवाना हिने रंगविलेली नायिका मंदा, सयाजी शिंदे यांचा हेड कॉन्स्टेबल उदय, भारत गणेशपुरे यांचा वकील व महेश मांजरेकर यांनी मुळशी प्रमाणेच इथेही रंगविलेला दारुडा सत्या या काही व्यक्तिरेखा लक्षात राहण्यासारख्या आहेत. 

नावीन्याची अपेक्षा ठेऊन आत जाणार असाल (असेही सलमान च्या चित्रपटांकडून ती कुणी करत नाही) तर निराशा हाती येईल पण काहीही अपेक्षा न ठेवता थिएटरात पाऊल ठेवले तर २ तास २२ मिनिटांचा अत्यंत वेगवान असा हिंसाचाराचा ओव्हरडोस, कथेला दिलेल्या इमोशन्स च्या तडक्यामुळे सहन होतो इतकेच. अबोव्ह ऍव्हरेज. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment