– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Selfiee Movie Review

कथानक थोडक्यात – विजय कुमार (अक्षय कुमार) या सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्याच्या लाखो डाय हार्ड फॅन्स पैकी एक आहे भोपाळ येथील आरटीओ इन्स्पेक्टर ओम प्रकाश अग्रवाल ( इम्रान हाश्मी). ओमप्रकाश ची एकच इच्छा असते ती म्हणजे एकदा विजय कुमार यास भेटून त्यासोबत सेल्फी घेण्याची. योगायोगाने विजय कुमार भोपाळ ला शुटींगच्या निमित्ताने एकदा येतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्स शॉटच्या चित्रीकरणासाठी म्हणून विजय कुमार यांचा ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे जो आता काही कारणाने हरवला आहे. साहजिकच ती जबाबदारी येऊन पडते ओमप्रकाश वर. लायसन्स च्या निमित्ताने सेल्फी घेण्याची इच्छा ओमप्रकाश बोलून दाखवतो ज्यासाठी विजय कुमारने स्वतः आरटीओ ऑफिस वर येणे अपेक्षित आहे. आपल्या मोठ्या फॅनच्या प्रेमाखातर विजय यासाठी तयार सुद्धा होतो पण विजय च्या येण्याआधीच तिथे मीडिया च्या मंडळींची मोठी गर्दी होते. विजय चा गैरसमज होतो की या सर्व प्रेस च्या मंडळींना ओमप्रकाशने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बोलावले आहे आणि प्रकरण इथून पुढे एक विचित्र वळण घेते. विजय ओमप्रकाशला त्याच्या लहान मुलासमोर खूप सुनावतो ज्यामुळे ओमप्रकाश सुद्धा जिद्दीला पेटतो आणि पुढे सुरु होते विजय आणि ओमप्रकाश ची एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा. याचा शेवट कसा होतो आणि दोघांमधील गैरसमज असे दूर होतात हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- मल्याळम सिनेमाचा आघाडीचा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आणि सुरज वेंजारामूडू अभिनित सुपरहिट मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या २०१९ साली प्रदर्शित चित्रपटाचा ‘सेल्फी’ हा अधिकृत रिमेक आहे. साधारणतः मूळ सिनेमा पाहिल्यावर आपल्याकडील म्हणजे बॉलिवूडचे सिनेमे तितकेशे न जमल्याचा फील आपल्याला बहुतांश वेळेला येतो. परंतु ‘सेल्फी’ याला अपवाद म्हणावा लागेल. मुळात एक खूप साधे-सरळ कथानक जे एखाद्या टीव्ही सिरीयल किंवा वेब सिरीज ला जास्त शोभले असते पण त्यावर मल्याळम सिनेमाचे नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक ‘साची’ यांनी सिनेमाला साजेशी पटकथा लिहिली जी मल्याळम प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडली. त्याचे हिंदी कथानकात रूपांतर केले ऋषभ शर्मा यांनी व दिग्दर्शन केले राज मेहता यांनी. ‘गुड न्यूज’, ‘अजीब दास्तान्स’ आणि ‘जुग जुग जियो’ नंतर राज मेहता दिग्दर्शित ‘सेल्फी’ हा चौथा चित्रपट. लेखक ऋषभ आणि दिग्दर्शक राज या जोडीने मूळ सिनेमाचा गाभा बऱ्यापैकी जसाच्या तसाच ठेवत हिंदी प्रेक्षकांना समोर ठेऊन काही किरकोळ बदल केले आहेत जे की स्तुत्य असेच आहेत.

कथा सांगण्याची शैली सुद्धा अगदी सरळ धोपट मार्गाने जाणारी किंवा काहीशी जुन्या नव्वदच्या दशकातील सिनेमांसारखी आहे त्यामुळे प्रेक्षक म्हणून तुम्हाला खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आणि आजच्या ट्रेंडी स्टाईल ने स्टोरी नॅरेशन अपेक्षित असेल तर निराशा होईल. पण असे असूनही पटकथेला वेग असल्याने चित्रपट कुठेच फारसा रेंगाळत नाही. कथेत विजय कुमार आणि ओमप्रकाश ही दोन्ही पात्रे विवाहित दाखवली असल्याने रोमान्स मात्र मिसिंग आहे. अर्थातच त्यामुळे गीत-संगीत याही बाबतीत चित्रपट कमी पडतो. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी दोघांनी छान कामे केली आहेत. डायना पेंटी आणि नुसरत या दोघींच्या पदरी मात्र फारसे काही पडलेलं नाही. छायांकन आणि पार्श्वसंगीत या बाबतीत आणि इतर तांत्रिक बाबतीत चित्रपट ठीकठाक आहे. अक्षय आणि इम्रान चा काही दृश्यांमधील टकराव बघतांना मजा येते.

नावीन्य काय?- अधिकृत रिमेक असल्याने कथेत, दिग्दर्शनात नावीन्य आहे असे म्हणता येणार नाही.

कुठे कमी पडतो?- आधी सांगितल्याप्रमाणे कथानक सांगण्याची पद्धत काहीशी आऊटडेटेड वाटण्याची शक्यता आहे. खासकरून आजच्या तरुण पिढीला. नव्वदचे दशक ज्यांनी एन्जॉय केले आहे अशांना हा प्रॉब्लेम नाही जाणवणार. शिवाय टोटल एंटरटेनर म्हणून गीत-संगीत याही बाबतीत चित्रपट फिका आहे. अक्षय आणि इम्रान मधील टकराव असणारे सीन्स अजून इंटेन्स व उत्कंठावर्धक असायला हवे होते असे वाटते.

पहावा का?- बघितला तर हरकत नाही. पण अगदी थिएटरमध्येच बघावा असे काही नाही. प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध (सब-टायटल्स सह) मूळ सिनेमा ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’ बघितला असेल तरीही ‘सेल्फी’ तुम्हाला त्यापेक्षा किंचित भर जास्त आवडेल कारण तुम्ही पृथ्वीराज या अभिनेत्यापेक्षा अक्षय कुमार च्या जास्त जवळचे आहात. त्यामुळे ओटीटी वर येण्याची वाट बघण्यास हरकत नाही.

स्टार रेटींग – २.५ स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment