– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Raksha Bandhan Movie Review. ‘तनू वेड्स मनू-१/२’ आणि ‘रांझना’ च्या यशानंतर दिग्दर्शक आनंद एल राय साठी २०१८ चा शाहरुख खान चा ‘झिरो’ एक बिग झिरो ठरला आणि गेल्या वर्षी ओटीटी वर आलेला ‘अतरंगी रे’ अगदीच बेरंग करणारा ठरला होता. अभिनेता अक्षय कुमार साठी सुद्धा ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या सततच्या अपयशानंतर यादीत एका हिट चित्रपटांची नितांत आवश्यकता असतांना काल दिग्दर्शक आनंद एल राय आणि अक्षय कुमार जोडीचा ‘रक्षा बंधन’ प्रदर्शित झाला. तोही रक्षाबंधनाचाच मुहूर्त साधत. अशात बॉलिवूडमध्ये स्वच्छ कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या चित्रपटांची संख्या जवळपास नगण्य आहे. त्यात गेल्या काही वर्षात भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित एखाद्या हिंदी सिनेमाची कथा असल्याचे सुद्धा उदाहरण आठवत नाही. त्यामुळे नेहमीच काहीतरी डार्क/हिंसा आणि सेक्स ने बरबटलेले ऑफबीट विषय बघण्याची सवय लागलेल्या आजच्या प्रेक्षकांना नावीन्य नसलेले, जुन्याच रूढी परंपरेवर आधारित असलेले आणि अत्यंत साधारण हाताळणी असलेले स्वच्छ कथानक सुद्धा आवडण्याची शक्यता अशावेळी निर्माण होते. ‘रक्षा बंधन’ हा अशीच शक्यता निर्माण करणारा चित्रपट आहे. 

‘रक्षा बंधन’ च्या कथानकाविषयी. दिल्ली च्या गजबजलेल्या चांदनी चौक परिसरात तेजीने चालणारा  वडिलोपार्जित चाट चा व्यवसाय सांभाळणाऱ्या लाला केदारनाथ (अक्षय कुमार) वर त्याच्या ४ बहिणींची जबाबदारी आहे. लाला ने त्याच्या आईला मृत्यूसमयी वचन दिलेले असते की या चौघींच्या लग्नानंतर च तो स्वतः बोहल्यावर चढेल. त्याच्या या वचनामुळे लाला ची प्रेयसी सपना (भूमी पेडणेकर) चे वडील (नीरज सूद) सातत्याने ‘माझ्या मुलीशी लग्न कधी करणार?’ म्हणत लाला च्या मागावर असतात. लाला च्या चारही बहिणींचे लग्न ठरण्यात कॉमन अडचण असते ती म्हणजे मुलाकडच्या मंडळींकडून मागण्यात येणारा हुंडा. लाला कसेबसे आर्थिक गणित जुळविण्याचा प्रयत्न करीत असतो पण त्याला यश मात्र येत नसते. एका विवाह संस्थेच्या मार्फत गायत्री चे लग्न पारही पडते. पण इतर तिघींच्या लग्नाला लागणाऱ्या रकमेसाठी लाला ला स्वतःची एक किडनी विकायची वेळ येते. दुर्दैवाने त्याच वेळी आणखी एका दुर्दैवी घटनेने लाला ला मोठा धक्का बसतो. ती घटना कोणती आणि पुढे या सर्व बहिणींचे लग्न कसे होते? लाला आणि सपना एकमेकांसाठी किती वर्षे वाट बघतात? हा सारा कथाभाग.

हुंडा प्रथा आणि त्यामुळे उध्वस्त होणारे मुलींचे आयुष्य यावर भाष्य करणारे रक्षा बंधन चे कथानक आहे. चित्रपटातून या कुप्रथेवर जळजळीत भाष्य करणारा सामाजिक संदेश देण्याचा स्तुत्य प्रयत्न सुद्धा लेखक-दिग्दर्शक जोडीने केला आहे. हिमांशू शर्मा आणि कनिका धिल्लो यांनी लिहिलेली रक्षा बंधन ची ही कथा आजच्या पिढीला काहीशी आऊटडेटेड वाटण्याची शक्यता आहे. लग्नात मागितल्या जाणाऱ्या हुंड्याचे प्रमाण आजच्या काळात कमी झालेले असले तरी ही प्रथा संपलेली कदापि नाही. चित्रपटात दाखविल्या गेलेल्या दिल्ली सारख्या शहरी भागात याचे प्रमाण निश्चित कमी असले तरी देशाच्या बहुतांश ग्रामीण भागात ही कुप्रथा अजूनही जोरात चालू आहे. दिल्लीतही चांदनी चौक सारख्या वस्तीत राहणाऱ्या लोअर मिडल क्लास कुटुंबात आजही या प्रथेने अनेक आयुष्य संपवले आहेत. मुळात आजच्या तरुण प्रेक्षकांना अशा आशयाचे विषय बघण्याची सवय अथवा आवड नसल्याने रक्षा बंधन चा प्रेक्षक लिमिटेड आहे हे नक्की. 

पटकथा अत्यंत वेगाने पुढे सरकविण्यात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात लेखक आणि दिग्दर्शक दोघेही यात यशस्वी झाले आहेत. कथानकात विनोदी आणि भावनिक प्रसंगांची समसमान पेरणी करण्यात आली आहे. कथानक मध्यंतरापर्यंत तुम्हाला जेवढे हसवते तेवढेच मध्यंतराच्या पॉइंटला आणि त्यानंतर रडवतेही. चित्रपट बघतांना एकाच वेळी गालावर हसू आणि डोळ्यात अश्रू आणणारे अनेक प्रसंग आहेत. खासकरून महिला वर्गास जवळचे वाटणारे अनेक प्रसंग रक्षा बंधन च्या कथानकात आहेत. 

मात्र प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स म्हणजे शेवट आणि शेवटच्या आधीचा काही भाग काहीही कारण नसतांना इतका गडबडीत आणि अचानकपणे संपविला आहे जे खूपच अनाकलनीय आणि खटकणारे आहे. त्यामुळे चित्रपटाचा एकंदरीत चांगला असलेला परिणाम काही कारण नसतांना कमी होतो. एरवी चित्रपटाची वाढलेली लांबी हा चिंतेचा विषय असतो, इथे मात्र १ तास ५० मिनिटांची अत्यल्प लांबी हा प्रॉब्लेम वाटतो. अजून एक खटकणारी बाब म्हणजे अक्षयच्या ४ बहिणींच्या भूमिकांना कथानकात काहीच महत्व दिले गेलेले नाही. अक्षय आणि त्यांच्यात असलेला भावा-बहिणीच्या नात्याचा स्ट्रॉंग बॉण्ड दाखविणारे प्रसंगही पटकथेत फारसे नाहीत. चित्रपटाचे कथानक आऊटडेटेड अथवा जुनाट वाटत असले तरी मनोरंजन करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होते. हिमेश रेशमिया चे संगीत सुद्धा सुपरहिट नसले तरी श्रवणीय कॅटेगिरी मध्ये मोडणारे आहे. इर्शाद कामील यांनी लिहिलेली गीते खूपच छान. त्यातल्या त्यात ‘तेरे साथ हूँ मैं’ या गाण्याचे बोल, संगीत आणि चित्रण सर्वच मस्त जमले आहे. कथानकात असलेल्या जवळपास प्रत्येक प्रसंगांची रंगत वाढविणारे खरपूस, विनोदी आणि प्रसंगी भावनिक अशा संवादांचे विशेष कौतुक करावेच लागेल. 

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अक्षय कुमार यात फुल्ल फॉर्म मध्ये दिसून आलाय. लाला केदारनाथ च्या भूमिकेत अक्षयने अक्षरशः जीव ओतून काम केले आहे. वरवर बघता अत्यंत साधी आणि उथळ वाटणारी ही भूमिका असली तरी अक्षयने ती इतकी सहजतेने आणि प्रसंगी तितक्याच प्रगल्भतेने साकारली आहे की क्या कहने! अक्षय चा लाला हा रक्षा बंधन चा प्राण आहे. अक्षय नंतर लक्षात राहणारी भूमिका आहे सपना म्हणजे भूमी पेडणेकर च्या वडिलांच्या भूमिकेत असलेले नीरज सूद. धमाल केली आहे या अभिनेत्याने. भूमी पेडणेकरने सुद्धा त्या मानाने कमी लांबीची भूमिका असूनही स्वतःचा प्रभाव पडेल याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. चार बहिणींच्या भूमिकांपैकी सादिया खतीब ची गायत्री लक्षात राहते तर दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहेजमीन कौर यांच्या भूमिकांना कथानकात फारसे महत्व न दिल्याने अगदीच ठीकठाक वाटतात. छायांकन, पार्श्वसंगीत, संकलन आणि इतर तांत्रिक बाबतीत चित्रपट साधारण आहे. 

या वीक-एन्ड ला अथवा १५ ऑगस्ट रोजी चित्रपट बघण्याचा प्लॅन असेलच ‘लाल सिंग चड्ढा’ मधील ‘लाल’ पेक्षा ‘रक्षा बंधन’ मधील कौटुंबिक ‘लाला’ हा केंव्हाही चांगला ऑप्शन आहे. गुड ऍव्हरेज. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.