– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Shehzada Movie Review

कथानक थोडक्यात – वाल्मिकी (परेश रावल) आणि रणदीप नंदा ( रोनित रॉय) या दोन मित्रांनी तरुणपणी जिंदल उद्योगसमूहात आपल्या करिअर सोबतच सुरु केलेले असते. पण पुढे जाऊन रणदीप चा प्रेमविवाह जिंदल समूहाचे प्रमुख आदित्य जिंदल (सचिन खेडेकर) यांची मुलगी यशु (मनीषा कोईराला) सोबत होतो आणि जिंदल समूहाची जबाबदारी रणदीप कडे येते. रणदीप च्या नशिबात आलेले हे सुख वाल्मिकी ला मात्र खटकत असते. पुढे वाल्मिकी आणि रणदीप दोघांच्याही घरी मुलाचा जन्म होतो. एकाच रात्री आणि एकाच दवाखान्यात. घटनाक्रम असा घडतो कि वाल्मिकी स्वतःच्या आणि रणदीप च्या मुलांची जन्माच्या रात्रीच दवाखान्यात अदलाबदल करतो. जी श्रीमंती आपल्या नशिबात नाही आली तिचा उपभोग आपल्या मुलाला तरी घेता यावा या हेतूने वाल्मिकी हे कृत्य करतो ज्याबद्दल फक्त त्या दवाखान्यातील नर्स लाच माहिती असते. रणदीपचा मुलगा जो वाल्मिकी ने आपल्या घरी आणला आहे त्याचे नाव सुद्धा वाल्मिकी अगदी शुल्लक वाटावे असे ठेवतो, ते म्हणजे बंटू (कार्तिक आर्यन). रणदीप च्या घरी गेलेल्या वाल्मिकी च्या मुलाचे नामकरण होते राज (अंकुर राठी). बंटूचे प्रेम आणि त्याची ऑफिसमधील बॉस असते समरा (क्रिती सॅनॉन). घटनाक्रम पुढे असा काही घडत जातो ज्यायोगे एके दिवशी बंटू ला सत्य समजते. यानंतर बंटू आपल्या शाही घराण्यात परतण्यासाठी काय करतो हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- जानेवारी २०२० मध्ये तेलगू भाषेत सुपरहिट ठरलेल्या, अल्लू अर्जुन अभिनीत ‘आला वैकुंठापुररामुलू’ या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. त्रिविक्रम श्रीनिवास यांनी लिहिलेल्या मूळ कथानकात, हिंदी रिमेक करतांना पटकथाकार आणि दिग्दर्शक रोहित धवन यांनी फारसे बदल केलेले नाहीत. मूळ तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा त्रिविक्रम यांनीच केले होते. बहुतांश सीन्स आणि त्याचे संवाद सुद्धा अगदी सेम टू सेम ठेवले आहेत. छायांकन आणि ऍक्शन या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चित्रपट उजवा आहे. कार्तिक चा उत्स्फूर्त अभिनय, खासकरून त्याच्या डाय-हार्ड फॅन्सना आवडेल असा आहे. क्रिती च्या पात्राला नाच गाण्यांशिवाय कथानकात विशेष असे महत्व नाही.

नावीन्य काय?- कथानकात नावीन्य आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. अशा धाटणीचे कथानक भारतीय सिनेमासाठी नवीन नाही. सादरीकरण मात्र बऱ्यापैकी वेगवान आहे. पटकथेत बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आहेत जे तुम्हाला खिळवून ठेवतात.

कुठे कमी पडतो? – जिथे जिथे मूळ तेलगू सिनेमा, ‘आला वैकुंठापुररामुलू’ भाव खाऊन जातो त्यातील बहुतांश बाबतीत मात्र शहजादा कमी पडतो. अर्थात ज्या प्रेक्षकांनी मूळ तेलगू सिनेमा पाहिलेला नाही त्यांना ही बाब खटकणारी नाही. पण असे असले तरी, जे प्रेक्षक थेट शहजादा बघत आहेत अशांना सुद्धा शहजादा मूळ तेलगू सिनेमासारखी परिपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट चा आनंद देण्यात कमी पडतो. चित्रपट आधी कास्टिंग मध्ये अंडी नंतर दिग्दर्शनात गंडलाय असे माझे स्पष्ट मत आहे. दोन्ही चित्रपटात (म्हणजे मूळ आणि रिमेक) आजोबांच्या भूमिकेत दिसणारा सचिन खेडेकर वगळता या रिमेक मधील प्रत्येक कास्टिंग चुकली आहे असे माझे मत आहे. कार्तिक ची इमेज एका चॉकलेट हिरो ची आहे, त्यामुळे कथानकाच्या एका मास अथवा ऍक्शन हिरोच्या मागणीत तो फिट्ट बसत नाही. कार्तिक च्या खऱ्या आईच्या भूमिकेत मनीषा कोईराला (मूळ तेलगू सिनेमात तब्बू) ची कामगिरी यथातथाच आहे. वडिलांच्या भूमिकेत रोनित रॉय (मूळ चित्रपटात जयराम) सुद्धा निष्प्रभ ठरलाय. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे परेश रावल सारख्या दिग्गज कलाकाराच्या तुलनेत सुद्धा तेलगू मध्ये वाल्मिकी ची भूमिका साकारणारा मुरली शर्मा खूपच उजवा वाटतो. भावनिक आणि विनोदी दोन्ही प्रकारच्या दृश्यात परिणामकता आणण्यात दिग्दर्शक रोहित धवन कमी पडलाय. संगीताच्या बाबतीत प्रीतम यांची कामगिरी सुमार आहे. तेलगू भाषा कळत नसली तरी तुम्ही ‘आला वैकुंठापुररामुलू’ च्या गाण्यांमध्ये जो गोडवा आहे तो इथे अजिबात नाही.

पहावा का?- बघितला तर हरकत नाही. फार निराशा नाही होणार पण बघावाच अशी शिफारस नाही करणार. त्यापेक्षा शक्य असल्यास नेटफ्लिक्स वर सब-टायटल्स सह असलेला मूळ तेलगू सिनेमा अवश्य पहा.

स्टार रेटींग – २.५ स्टार.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment