– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

OMG 2 Movie Review

मी कुठल्याही सामान्य सिनेमाचे परीक्षण करतांना, एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने त्याची समीक्षा करत असतो. म्हणजे आधी कथानक काय? त्यात काय विशेष आहे? नावीन्य आहे का? कुठे कमी पडतो आणि शेवटी बघावा की नाही यावर माझे मत असते. पण.. हे मी लागू करतो कुठल्याही सामान्य चित्रपटासाठी. फार कमी वेळा असे होते की ही चौकट मोडून मी एखाद्या सिनेमाचे परीक्षण केले आहे. नुकताच सुपरहिट ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा रिव्युह करतांना मी ही चौकट मोडली होती आणि आज मला सांगतांना आनंद होतोय की आज प्रदर्शित ‘ओएमजी २’ या सिनेमाबद्दल बोलतांना सुद्धा मी ही चौकट मोडणार आहे.

सुरुवातीला एक कबुली देणे आवश्यक आहे. ‘ओएमजी २’ चे टिझर आल्यानंतर काही दिवस हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्यावर आणि सेन्सॉरने २७ कट्स करून वयोवृद्ध म्हणजे अडल्ट सर्टिफिकेट दिल्यावर मला हमखास असे वाटत होते की अक्षय कुमार जो या सिनेमाचा निर्माता आहे याला नक्की प्रेक्षक शिव्या घालणार, सिनेमा वादात अडकणार आणि अक्षय ची फॅन फॉलोविंग सुद्धा कमी होणार. माझ्या कट्टर सिनेमा प्रेमी मित्रांचा सिनेमानिएक्स नावाचा एक व्हॉट्स अप ग्रुप आहे ज्यात मी हे सर्व लिहिले पण होते. पण आज सिनेमा संपवून रिव्युह करण्याआधी मी त्याच ग्रुपवर माझा अंदाज चुकला होता याबद्दल खेद सुद्धा व्यक्त केला. काही गोष्टी तुम्हाला इतक्या आनंद देतात की त्यावर आपले मत चुकले हे आपल्याला जाहीरपणे कबुली द्यायला काहीही चुकीचे वाटत नाही. कारण हा आनंद मला आज ‘ओमजी २’ बघतांना झाला. ओएमजी हा एक नुसताच बोल्ड, संवेदनशील विषयाला हाताळणारा सिनेमा नाहीये तर तो आपल्या सर्वांच्या आसपास रोज घडणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांचे खरे कारण काय आहे हे मोठ्या ठळकपणे, प्रॅक्टिकली सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारा आणि तितक्याच नग्नतेने मांडणारा सिनेमा आहे. चित्रपटात एक संवाद आहे ‘हर सत्य कहीं ना कहीं नंगा होता है और सत्य ही शिव है.’

ही कथा कांती शरण मुदगल नावाच्या एका कट्टर शिवभक्ताची आहे. कांतीचा हायस्कुल मध्ये शिकणारा मुलगा आहे विवेक. एके दिवशी कांतीलाल ला विवेकबद्दल एक धक्कादायक सत्य कळते. नंतर विवेकचा एक आक्षेपार्ह कृती करीत असतानाचा व्हिडीओ त्याचे शाळेतील मित्र सोशल मीडियात व्हायरल करतात आणि त्यामुळे विवेकवर शाळा सोडून देण्याची पाळी येते आणि कांतीवर तोंड लपवून फिरण्याची. कांतीच्या या संकटकाळी त्याला मदत करण्यासाठी म्हणून भगवान महादेव त्याच्या एका शिवगणास पाठवतात. त्याच्या सल्ल्याने कांती विवेकाच्या शाळेवर कोर्ट केस करतो आणि कुणी वकील न मिळाल्याने ती स्वतः लढतो. ती कशी जिंकतो हा पुढील कथाभाग. मी इथे मुद्दाम कथेवर सविस्ताराने सांगण्याचे टाळतोय कारण हे सर्व नाट्य चित्रपटगृहात जाऊन बघण्याची तुमची मजा कमी करण्यात मला रस नाही. कारण सिनेमा तर तुम्ही बघणार आहातच याची मला खात्री आहे.

शाळेतून लैंगिक शिक्षण दिले जावे हे मोठ्या धाडसाने, धैर्याने, मुद्देसूदपणे, सोप्या भाषेत, खात्री पटेल अशा भाषेत व अखेरीस तितक्याच प्रभावीपणे सांगणारी कथा-पटकथा म्हणजे ओएमजी २ ची खरी विनर आहे. म्हणजेच खरे विनर आहेत अमित राय. अमित राय. आणि हीच प्रमुख चार करणे आहेत जी ओएमजी २ ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. कथेचा विषय बोल्ड आहे, तुम्ही घरच्या लहान मुलांना घेऊन हा बघू शकत नाहीत किंवा त्याला ए सर्टिफिकेट असल्याने नेताही येणार नाही हे जरी खरे असले तरी हा विषय कुठेही चीप न होऊ देता अत्यंत मॅच्युरिटीने आणि जबाबदारीने, खबरदारीने अमित राय यांनी हाताळलाय याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ. जस्ट हॅट्स ऑफ.

अमित राय नंतर सिनेमाचा दुसरा विनर आहे पंकज त्रिपाठी हा अभिनेता. कांतीची ही भूमिका पंकज याच्या करिअरमधील एक माईलस्टोन भूमिका ठरेल ही काळ्या दगडावरची रेष आहे मित्रानो इतक्या अप्रतिम रीतीने, मेहनतीने आणि तितक्याच सहजतेने त्याने साकारली आहे. अख्खा चित्रपट केवळ आणि केवळ पंकज च्या खांद्यावर आहे. कोर्टातील सीन्स पंकजने इतक्या सफाईने पेश केले आहेत की क्या कहने. अमित राय प्रमाणेच पंकज त्रिपाठी या महान अभिनेत्यास सुद्धा हॅट्स ऑफ. इतर कलाकारांमध्ये अक्षय कुमार ने त्याच्या वाट्याला आलेली छोटीशी पण अत्यंत सुंदर अशी भूमिका तितक्याच सुंदरतेने साकारली आहे. यामी गौतम … ही अभिनेत्री कधीच निराश करत नाही.  पंकज च्या विरुद्ध कोर्टात केस लढणाऱ्या वकिलाच्या भूमिकेत यामीने लाजवाब काम केले आहे. जज साहेबांच्या भूमिकेत आहे अभिनेता पवन मल्होत्रा लाजवाब. खूपच सुंदर आणि सहज. इतर सर्वच कलाकारांची कामे छान आहेत. मुळात सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही इतके दमदार आहे त्यामुळे पार्श्वसंगीत, गाणी, छायांकन या सर्व बाबींकडे फारसे लक्षही जात नाही. माझे तरी नाही गेले. नुसताच पंकज च्या अप्रतिम अभिनयाकडे आ वासून बघत होतो मी चित्रपटभर. इतर काही बाबी बघाव्यात असे काही सुचलेच नाही.

असे धाडसी विषय इतक्या सफाईने पेश करणाऱ्या कलाकृती फार क्वचित येतात. मी इथे कलाकृती हा शब्द मुद्दाम वापरतोय. ओएमजी २ याला सिनेमा म्हण्या ऐवजी मी कलाकृती म्हणेल. आणि कलाकृती ही बघायची नसते. ती अनुभवायची असते. तितक्याच संवेदनशीलतेने. तितक्याच प्रगल्भतेने. तितक्याच गांभीर्याने. आय रेस्ट माय केस हियर मिलॉर्ड.

स्टार रेटिंग- ४ स्टार आउट ऑफ ५. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment