– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Gadar 2 Movie Review

१५ जून २००१ ही तारीख आपल्यापैकी बहुतांश रसिकांना लक्षात असेलच. निदान ९० च्या दशकातील प्रेक्षकांना तर हमखास लक्षात असेल. कारण हीच ती तारीख होती ज्या दिवशी लगान आणि गदर एक प्रेम कथा हे दोन्ही सिनेमे एकमेकांसमोर एखाद्या कुस्तीमधील पहेलवानासारखे उभे राहिले होते. आज २२ वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. गदर-२ समोर उभा असलेला पहेलवान फक्त बदललाय. यावेळी हा पहेलवान आहे ओमजी-२ म्हणजेच ओह माय गॉड २. 

थोडक्यात कथानक- कथानक आता १७ वर्षांनी पुढे सरकले आहे. ७० च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ आहे. आणि १९६५ च्या युद्धानंतर परत एकवार भारत-पाकिस्तान च्या बॉर्डर्स वर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानी मेजर जनरल हमीद इकबाल (मनीष वाधवा) ला १९४७ पासून हवा आहे तारा सिंग म्हणजे सन्नी पाजी जो त्याची पत्नी सकीना म्हणजेच अमिषा पटेल आणि मुलगा जिते (उत्कर्ष शर्मा) सोबत पंजाब मध्ये राहतोय. गदर-१ च्या अखेरीस सन्नी पाजीने जो गोंधळ घातलेला असतो त्याचा बदला घेण्यासाठी हमीद ला तो हवा असतो शिवाय गझवा-ए-हिंद चे स्वप्न बाळगणारा हमीद भारताला कट्टर शत्रू मानत असतो. बॉर्डर वर एकदा दोन्ही सैन्यात चकमक होते आणि त्या चकमकीत भारतीय सैन्याला मदत करणारा तारा ला पाकिस्तानी सैन्याने पकडून कैदेत ठेवले आहे अशी बातमी तारा च्या कुटुंबियांना कळते. मग काय? जिते शेवटी तारा चाच मुलगा. निघतो घरातून आणि बनावट पासपोर्ट घेऊन गाठतो लाहोर. इथे जिते ची भेट होते मुस्कान (सिमरत कौर) शी. जिते स्वतःची ओळख मुस्कान पासून लपवतो आणि तिच्या मदतीने तारा ज्या जेल मध्ये बंद आहे तिथपर्यंत पोहोचण्याचे ठरवतो. जीते त्याच्या योजनेत यशस्वी होतो देखील पण … पण… जेलमध्ये पोहोचल्यावर जीतेला धक्का बसणारे सत्य कळते. काय असते ते सत्य? तारा तिथे असतो का? जीते तारा आला कसा शोधतो? दोघे एकमेकांपर्यंत कसे पोहोचतात आणि अखेरीस पाकिस्तानात काय होते असा प्रवास करीत कथा पुढे सरकते. 

काय विशेष? – विशेष बाब गदर-२ ची सांगायची झाल्यास मी म्हणेल ज्या प्रेक्षकांनी गदर चा पहिला भाग आपल्या तारुण्यात एन्जॉय केला आहे त्यांच्यासाठी सिनेमाचा फ्लेवर मेंटेन ठेवण्यात दिग्दर्शक अनिल शर्मा बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहेत. पूर्ण नाही. बऱ्यापैकी. आधीच सांगतो आधीच्या गदर सारखीच इथे पण कहाणी पुरी फिल्मी है..त्यामुळे उगाच लॉजिकच्या शोधात थिएटरमध्ये प्रवेश करू नका. त्याहून पुढे जाऊन सांगतो, ज्यांना आधीचा गदर आवडला नव्हता त्यांनी याच्या नादी अजिबात लागू नये.  मध्यंतरापर्यंत आधीच्या सिनेमातील दोन गाणी म्हणजे घर आजा परदेसी आणि मै निकला गड्डी लेके चे रिप्राईज व्हर्जन बघतांना ९० च्या प्रेक्षकांना आवडेल. मध्यंतरापर्यंत कथानकात तारा, सकीना आणि त्यांचा मुलगा जीते यांच्या इमोशनल प्रसंगांची रेलचेल आहे. संगीतकार मिथुन यांनी या दुसऱ्या भागाकरिता दिलेले संगीत श्रवणीय आहे. अर्जित सिंग चे मध्यंतरानंतर लगेच येणारे खैरीयत, आणि खासकरून सिमरत कौर या अभिनेत्रीवर चित्रित केलेले ईदच्या प्रसंगाचे गाणे चल तेरे इष्क में हे गाणे छान जमले आहे. सन्नी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि मनीष वाधवा या चारही मुख्य पात्रांचा अभिनय छान झालाय. सन्नी पाजी ऍक्शन सीन्स मध्ये २२ वर्षांनंतरही धम्माल करतात. सन्नी च्या वाट्याला आलेले रॉ असे ऍक्शन सीन्स बघायला मजा येते. अमिषा आणि उत्कर्ष यांची कामे सुद्धा ठीक झाली आहेत. पटकथेला साजेसे असे अनिल शर्मा यांचे दिग्दर्शन आहे. पण.. पण काय ते नंतर सांगतो… सिनेमा कुठे कमी पडतो या पार्टमध्ये. छायांकन, पार्श्वसंगीत याबतीत चित्रपट ठीकठाक आहे. 

नावीन्य काय?- शून्य. काही एक नावीन्य नाहीये आणि असेही काही असेल अशी अपेक्षा मला तरी नव्हती आणि हो जे सन्नी पाजी आणि गदर या ब्रँडचे फॅन्स आहेत, खासकरून मास पब्लिक यांना यात नाविन्याची अशीही अपेक्षा नव्हती. म्हणजे ज्या स्टाईलचा कन्टेन्ट गदर मध्ये अपेक्षित आहे म्हणजे सन्नी पाजीचे ऍक्शन सीन्स, पाकिस्तान्यांना शिव्या देणे, हॅन्ड पम्प उखडणे वैगरे वैगरे अगदी तसाच कन्टेन्ट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी याहीवेळी दिलाय. 

कुठे कमी पडतो?- दमदार खलनायक, तीक्ष्ण आणि धारदार संवाद आणि इंटेन्स सीन्स याबतीत जर आधीच्या गदर शी तुलना केल्यास निश्चितपणे गदर-२ कमी पडला आहे. पाकिस्तानी जनरल हामिद इकबाल हे पात्र लाऊड जास्त आणि भीतीदायक अथवा खतरनाक कमी वाटते. म्हणजे सन्नी पाजींसमोर अमरीश पुरी सारखाच खलनायक हवा जरी मनीष वाधवा ने त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी. मुळात पटकथाकार शक्तिमान यांनी हे पात्र केवळ ऍक्शन सीनपुरते लिमिटेड ठेऊन मोठी चूक केली आहे. मनीष वाधवा आणि सन्नी देओल यांचे एकमेकांसमोर आल्यानंतर अपेक्षित धारदार संवाद इथे मिसिंग आहेत. नुसताच आरडाओरडा केला गेलाय अशी मला तरी फिलिंग आली. पटकथा मध्यंतरानंतर भरकटत जाते. तारा आणि जीते चे हामिद इकबाल च्या तावडीतून निसटल्यानंतर कल्यायमॅक्स पर्यंत चा भाग उगाच ताणल्यासारखा वाटतो आणि या दोघांना उगाच बळजबरीने इकडून तिकडे पळवले आहे अशी भावना निर्माण होते. ज्यामुळे सिनेमाची लांबी सुद्धा २ तास ४५-५० मिनिटांची झाली आहे.  आधीच्या गदर मध्ये भारत-पाकिस्तान अँगल सोबतच हिंदू-मुस्लिम हा सुद्धा इंटेन्स असा अँगल होता जो इथे कम्प्लीट मिसिंग आहे. संवादानंतर ऍक्शन मध्ये सुद्धा सिनेमा अमॅच्युर वाटतो. अर्थात ७० च्या दशकातील कथेला अनुसरून ऍक्शन दाखवतांना काही बंधने पण असतात हे विसरून नाही चालणार. पण त्यामुळे आजची व्हीएफएक्स मधील कमाल बघणारी तरुण पिढी यासोबत तितकी कनेक्ट होणार नाही. 

पाहावा का? – जर तुम्ही नव्वदचे दशक अनुभवले आहे किंवा त्या पिरियड मधील मसाला मुव्ही बघण्याची आवड असेल, गदर चा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर गदर-२ बघण्यास हरकत नाही पण हो असे सर्व जरी असेल तरी हा गदर आधीच्या गदर पेक्षा अधिक पावरफुल काही तरी देईल अशी अपेक्षा असेल तर काहीशी निराशा होऊ शकते. खास करून मध्यंतरानंतर. कोणाची फॅमिली ऑडियन्स ची. मास ऑडियन्स ला थोडासा उन्नीस बीस असला तरी फार फरक पडेल असे वाटत नाही  आणि  हो सिनेमाला लागलेली जोरदार ओपनिंग, आणि १५ ऑगस्ट चा देशभक्तीचा माहोल बघता सिनेमा ऍव्हरेज जरी असला तरी धंदा जोरदार करेल अशी शक्यता दाट आहे. 

स्टार रेटिंग- ३ स्टार आउट ऑफ ५. इट्स वन टाइम वॉच. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment