आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Veteran actress Seema Deo passed away

मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते.

गेल्या जवळपास वर्षभर त्या आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीम त्यांचा मुलगा अभिनव देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत.

इ.स. १९५७ सालच्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. सीमा यांनी रमेश देव यांची नायिका म्हणून सर्वप्रथम ग्यानबा तुकाराम (१९५८) या चित्रपटात काम केले. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, पडछाया, अपराध, पाहू रे किती वाट, हा माझा मार्ग एकला, दोन घडीचा डाव, पैशांचा पाऊस, चिमण्यांची शाळा, प्रपंच, रंगल्या रात्री अशा, नंदिनी, सुखी संसार, जानकी, सर्जा, जिवा सखा, कुंकू  हे चित्रपट विशेष गाजले.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी परंतु संस्मरणीय आहे. ‘पाहू रे किती वाट’ या  चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता.  हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री म्हणून आनंद, भाभी की चुडियाँ, आंचल, प्रेमपत्र, तकदीर, मर्द हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. 

सीमा यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतल्या गिरगावात त्यांचे बालपण गेले. अभिनेत्री सीमा देव आणि त्यांचे पती अभिनेते रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय नावाजलेले कलाकार होते.  त्यांचा मुलगा अजिंक्य देवही प्रसिध्द अभिनेता आहे. सीमा देव यांना राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात २०१७ साली जीवनगौरव पुरास्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment