आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
The final round of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad’s one act competition will be held on October 19
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या ‘शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले असून या स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल,माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या ‘शाखांतर्गत एकांकिका स्पर्धे’ची प्राथमिक फेरी दिनांक २ ऑक्टोबर रोजी अमरावती, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूर तसेच दिनांक १० ऑक्टोबर रोजी मुंबई या केंद्रांवर संपन्न झाली. या स्पर्धेत अमरावती, अकोला, नागपूर, नागपूर उपनगर -१, कारंजा लाड, पिंपरी चिंचवड, कोथरुड, पुणे, अहमदनगर, शिरुर, कोल्हापूर, सांगली, सातारा, इस्लामपूर, इचलकरंजी, बीड, सोलापूर, सोलापूर उपनगर -१, मंगळवेढा, बीड, नाशिक, बोरिवली, मुलुंड, कल्याण आणि मध्यवर्ती शाखेने सहभाग घेतला होता.
सहभागी शाखेमधून प्रत्येक केंद्रातून सर्वोत्कृष्ट एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडली असून त्यात अमरावती शाखेची ‘मधुमोह’, अहमदनगर शाखेची ‘जाहला सोहळा अनुपम’, सोलापूर शाखेची ‘जन्म जन्मांतर’ , इचलकरंजीची ‘हा वास कुठून येतोय’, तर नाशिक शाखेची ‘अ डील’. एकांकिका या अंतिम फेरीत सादर होणार आहेत.
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या या एकांकिका स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. पात्रता फेरीतून अंतिम फेरीसाठी ५ एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी व सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले व स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी केले आहे.