– अजिंक्य उजळंबकर

२००२ साली आलेल्या एका सिनेमाने बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध नायकाला पहिल्यांदा खलनायक बनवले आणि त्या भूमिकेसाठी त्या अभिनेत्याने ‘बेस्ट व्हिलन’ चा ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही जिंकला. या सिनेमाच्या यशाने बॉलिवूडच्या लेखक व दिग्दर्शक मंडळींच्या हाती एक नवा विषय सुद्धा हाती लागला. स्प्लिट पर्सनॅलिटी/ड्युअल पर्सनॅलिटी अथवा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा तो विषय. त्या सिनेमाचा पुरस्कार जिंकणारा व पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका करणारा अभिनेता होता अजय देवगण व सिनेमा होता ‘दिवानगी’. याच्याच एक वर्ष आधी आलेल्या ‘प्यार तुने क्या किया’ या सिनेमात उर्मिला मातोंडकरने साकारलेली अशाच प्रकारची निगेटिव्ह नायिका रसिकांनी अनुभवली होती पण ‘दिवानगी’ सारखे यश त्याला मिळाले नव्हते. यानंतर गेल्या १८ वर्षात या विषयवार अनेक चित्रपट आले. गजनी, अपरिचीत, कहानी, भुलभुलैय्या अशी ही यादी मोठी आहे. झी5 वर काल प्रदर्शित झालेला व यावर्षीचा पहिला सिनेमा असलेला ‘नेल पॉलिश’ हे यादीतलं लेटेस्ट ऍडिशन. 

बग्ज भार्गव कृष्णा यांच्या लेखणी व दिग्दर्शनाचा साक्षात्कार असलेला ‘नेल पॉलिश’ हा तुम्हाला खिळवून ठेवणारा अनुभव आहे. २ तासांचा हा अनुभव, पर्यायी कलाकार व अनुभवी दिग्दर्शक असले असते, तर अधिक उत्कंठावर्धक करता आला असता यात दुमत नाही. परंतु जे आहे तेही चांगले जमले आहे हेही तितकेच खरे. वीर सिंग (मानव कौल) या सुप्रसिद्ध स्पोर्ट्स कोचला एके दिवशी अचानकपणे देशभरात गाजत असलेल्या बालहत्याकांडाचा मुख्य आरोपी म्हणून अटक झाल्यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होते. सीड जयसिंग (अर्जुन रामपाल) हा एक सुप्रसिद्ध वकील आहे जो राजकीय लोकांच्या अमिषामुळे वीर सिंग ची केस लढण्यास तयार होतो. फॉरेन्सिक अहवालानंतर वीर सिंगच्या विरोधात असलेले सबळ पुरावे सरकारी वकिलांकडे असतात जे कोर्टासमोर सादर केले जातात. त्याचदरम्यान जेलमध्ये इतर कैद्यांसोबत झालेल्या वादात वीर सिंग ला गंभीर इजा होतात व त्याला इस्पितळात हलविले जाते. शारीरिक जखमा तर भरून निघतात मात्र मानसिक जखम बरी न होता तिचे रूपांतर स्प्लिट पर्सनॅलिटीच्या आजारात होते. आता वीर सिंग स्वतःला विसरलेला आहे व ‘मी चारू रैना नावाची स्त्री आहे’ असे तो सर्वांनां सांगतोय. सरकारी वकील अमित कुमार (आनंद तिवारी) व जज राकेश भूषण (रजत कपूर) सहीत जयसिंग व इतर सर्वच वीर सिंगला या नव्या रूपात बघून हैराण होतात. इथून पुढे हा वीर सिंग अचानकपणे चारू रैना कसा काय झाला याचा शोध सुरु होतो. या कहाणीचा सस्पेन्स इथे ना उलगडता तो छोट्या पडद्यावर पाहिलेलाच उत्तम. 

Arjun Rampla, Manav kaul and Aanand Tiwari in Nail Polish
Arjun Rampla, Manav kaul and Aanand Tiwari in Nail Polish. Courtesy- Zee5

कथानकाचा केंद्रबिंदू लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण व त्यानंतर होणारे त्यांचे हत्याकांड हा असल्याने व दिग्दर्शकाने त्यातील काही दृष्यांचे दाहक चित्रण केल्याने ती बघतांना खूप त्रास होतो. दिग्दर्शक बग्ज भार्गव कृष्णा यांनी पटकथा बऱ्यापैकी गतिमान ठेवली आहे परंतु काही दृष्ये जशी लहान मुलांच्या हत्याकांडात त्यांना जाळतांनाचे घेतलेले क्लोज-अप शॉट्स टाळता येऊ शकले असते. कथानक सत्य घटनांवर आधारित आहे असे सुरुवातीलाच जाहीर केले आहे , शिवाय चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रेक्षक बघणार आहे या बाबी ध्यानात ठेऊन काही दृश्यांमध्ये हिंसेचा केलेला नाहक अतिरेक टाळता आला असता. सत्यतेच्या अतिजवळ जाण्याच्या नादात एका चांगल्या चित्रपटापासून अशावेळी कौटुंबिक प्रेक्षक अथवा महिलावर्ग दूर होतो हे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बऱ्याच चित्रपटांच्या व वेबसिरीजच्या बाबतीत घडते आहे.

Nail Polish Movie Zee5

अभिनयाच्या बाबतीत मानव कौलने सुंदर काम केले आहे. वीर सिंग व चारू रैना या दोन्ही व्यक्तिरेखा त्याने उत्तम साकारल्या आहेत. अर्जुन रामपाल ने सुद्धा सीड जयसिंग हा वकील उत्तम साकारलाय. पण आधी सांगितल्याप्रमाणे या दोघांऐवजी अजून प्रतिभाशाली नावांचा विचार इथे दिग्दर्शकालाकरता येऊ शकला असता. तसे झाले असते तर हे नाट्य अजून प्रभावी वाटले असते. आनंद तिवारीने साकारलेला सरकारी वकील सुद्धा अर्जुन व मानव च्या समोर लक्षात राहतो हे विशेष. जज राकेश भूषण (रजत कपूर) व त्याच्या दारूच्या आहारी गेलेल्या बायकोचा (मधू) चा पण कथानकात ठराविक अंतराने प्रवेश होत असतो. याचा कथेशी काय संबंध याचा उलगडा शेवटी खटल्याचा निकाल देतांना केला गेलाय जोकी समर्पक वाटतो पण तितकासा नाही. मधुने व रजत कपूरने काम बऱ्यापैकी केले आहे. 

पटकथेतील काही सुधारणांसह अनुभवी टीमने हे नेल पॉलिश लावले असते तर ते जास्त चमकले असते… टिकले असते. असे असले तरी कुटुंबाशिवाय एकट्याने का होईना हे नेल पॉलिश किमान एकदा तरी लावण्यासारखे .. आय मीन बघण्यासारखे नक्कीच आहे. 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment