-अजिंक्य उजळंबकर
सस्पेन्स अथवा मिस्ट्री क्राईम थ्रिलर हा सिनेमावाल्यांचा अत्यंत आवडीचा विषय असतो. त्यात सायकॉलॉजिकल थ्रिलर ची दुनिया अशात दिग्दर्शक मंडळींना अधिक आकर्षित करत आहेत. या विषयावरील एखाद्या पुस्तकाने जर आंतरराष्ट्रीय बाजारात जर धूम केली असेल तर त्याकडे निर्माता-दिग्दर्शक मंडळींचं लक्ष गेलं नाही तर नवल. ब्रिटिश लेखिका पॉला हॉकिन्स यांच्या २०१५ सालच्या ‘दि गर्ल ऑन दि ट्रेन’ या पुस्तकाने प्रकाशित झाल्यावर अशीच धूम केली होती. ‘टेट टेलर’ या सुप्रसिद्ध अमेरिकन दिग्दर्शकाला घेऊन मग निर्मात्या मंडळींनी याच कथेला घेऊन याच नावाचा इंग्रजी चित्रपट २०१६ साली आणला. ज्यात ‘एमिली ब्लण्ट’ या ब्रिटिश अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती व त्यासाठी तिचे मोठे कौतुक झाले होते, अनेक नामांकनं व पुरस्कारही मिळाले होते. आता त्याच नावाने त्याचा हिंदी चित्रपट अवतार आलाय ज्यात एमिलीची जागा घेतली आहे परिणीती चोप्राने. दिग्दर्शक आहेत रिभू दासगुप्ता. आता हे रिभू दासगुप्ता कोण? अमिताभ बच्चन व नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिकेतील २०१६ सालचा ‘तीन’ नावाचा सिनेमा लक्षात आहे का? त्याचे दिग्दर्शक म्हणजे रिभू दासगुप्ता. एमिली ब्लण्ट च्या इंग्रजी सिनेमाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यात जी एक होती ती म्हणजे ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’ व त्यांनीच आता या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे… जी आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.
चित्रपटाची थोडक्यात कथा अशी. लंडनस्थित मीरा कपूर (परिणीती चोप्रा) ही एक व्यवसायाने वकील आहे जिचा नवरा आहे शेखर (अविनाश तिवारी). मीरा सहा महिन्यांची गरोदर असतांना या दोघांच्या कारला गंभीर अपघात होतो ज्यात मीराचे बाळ दगावते. यानंतर शेखर आणि मीरामध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेली मीरा पुरती दारूच्या आहारी जाते. तिच्या या परिस्थितीमुळे तिच्या हातात काही कामही नसते. नैराश्याने ग्रस्त मीरा अधिकाधिक दारूच्या आहारी जाते व तिला घटना विसरण्याचा आजारही जडतो. यादरम्यान तिला तिच्या रोजच्या ट्रेनच्या प्रवासात एक अनोळखी मुलगी दिसत असते. एके दिवशी त्या अनोळख्या मुलीसोबत तिचा नवरा ना दिसता एक अनोळखी इसम मीराला दिसतो. आपल्याला प्रेमात जसा धोका झाला तसाच धोका ही मुलगी आपल्या नवऱ्यासोबत करते आहे की काय याचा शोध लावण्यासाठी रागात व दारूच्या नशेत मीरा त्या मुलीचे घर गाठते. दोघींमध्ये पाठलाग होतो व मीरा तिला हाताने मारते …एवढेच मीरा ला आठवत असते. कारण नंतर तिला कळते की त्या अनोळख्या मुलीचा खून झालाय. सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांमुळे संशयाची सुई मीरावर असते. यातून मीरा कशी सुटते हा सस्पेन्स स्वतः अनुभवानेच उत्तम.
हो उत्तम शब्द एवढ्याकरिता की केवळ दोनच तासांची लांबी असलेला दि गर्ल व दि ट्रेन हा उत्तम जमलाय असं म्हणण्यास वाव आहे. पहिल्या एक तासाच्या काहीशा रटाळ भागानंतर उत्तरार्धात ही ट्रेन स्पीड घेते. आधीच लोकप्रिय झालेले पुस्तक व इंग्रजी सिनेमा असे असल्यावर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात व तुलना सुद्धा टाळता येणे शक्य नसते. ज्यांनी पुस्तक वाचले आहे किंवा इंग्रजी सिनेमा पाहिलाय (मी पाहिलेला नाही) त्यांना बहुधा परिणितीने साकारलेली ही गर्ल त्यामानाने फिकी सुद्धा वाटू शकेल. तुलना केल्यास. पण ज्या प्रेक्षकांनी हे दोन्ही अनुभव घेतले नसतील त्यांच्यासाठी हा सिनेमा एक छान अनुभव घेऊन येतो. अगदी खिळवून ठेवणारा. त्याचे श्रेय दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांना जाते. परिणितीचा अभिनय अफलातून झालाय. तिच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमधील ही मीरा कपूर सर्वोत्तम ठरावी. इतर कलाकारांमध्ये कीर्ती कुल्हारी व आदिती राव हैदरी यांच्या भूमिकाही परिणामकारक झाल्या आहेत. अविनाश तिवारी ने सुद्धा शेखर छान सादर केलाय. कुठल्याही सस्पेन्स चित्रपटात नेहमीच दोन अदृश्य पात्र महत्वाची जबाबदारी पार पाडतात. ती पात्रे म्हणजे पार्श्वसंगीत व कॅमेरा अँगल्स. इथेही या दोघांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. गरज नसतांना घातलेली गाणी (जरी बॅकग्राउंड मध्ये असली तरी) मात्र प्रचंड बोर करतात. अशा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात गाणी हा नेहमीच एक मोठा अडथळा असतो.
एकुणात ‘दि गर्ल ऑन दि ट्रेन’ हा अनुभव एकदा तरी घेण्यासारखा नक्कीच आहे.