अभिनेता जितेंद्र जोशीचं चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण, गोदावरी”चा टीजर सोशल मिडियावर लाँच

दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला निखिल महाजन दिग्दर्शित “गोदावरी”

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणाऱ्या “गोदावरी”चा टीजर सोशल मिडियावर लाँच

अभिनेता जितेंद्र जोशीनं “गोदावरी” चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून, पुणे ५२ या चित्रपटातून लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक निखिल महाजनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र दिनी (१ मे) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला.

ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी “गोदावरी”ची निर्मिती केली असून पवन मालू, मिताली जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत तर आकाश पेंढारकर, पराग मेहता हे सहनिर्माते आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कथा पटकथा निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख यांची असून संवाद ही प्राजक्त देशमुख याचे आहेत. जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना ए. व्ही. प्रफुलचंद्र याने संगीत दिले आहे.

forthcoming marathi movie Godavari

पदार्पणाच्या चित्रपटातूनच लक्ष वेधून घेणाऱ्या निखिल महाजनचे दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून संवेदनशील चित्रपट निवडणाऱ्या जितेंद्र जोशीची निर्मिती असा योग “गोदावरी”च्या रुपानं जुळून आला आहे. कुटुंबातली नाती आणि वाहती नदी यांची सांगड घालण्यात आलेल्या चित्रपटाचा टीजर अतिशय सुंदर आहे. त्यामुळेच “गोदावरी” हा चित्रपट नक्कीच वेगळा असेल यात शंका नाही.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले की, बऱ्याच काळात उत्तम कौटुंबिक कथा ही मराठी चित्रपटातून मांडण्यात आलेली नाही. नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाच्या आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

पहा टीझर इथे-

Website | + posts

Leave a comment