– अजिंक्य उजळंबकर 

ट्रेलर बघून उत्सुकता निर्माण झाली होती परंतु २६ मार्च २०२१ रोजी जेंव्हा ‘सायना’ (Saina film) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेंव्हा कोरोना व्हायरसच्या धाकाने थिएटरमध्ये प्रवेश करणे टाळले होते. अखेर  एका महिन्याने काल अमेझॉन प्राईम व्हिडिओवर सायना प्रदर्शित झाल्यावर वर्क फ्रॉम होम अंतर्गत सायना नेहवालची ची जीवनगाथा छोट्या पडद्यावर का होईना पण पाहिली. ‘मार दूंगी’ ही सिनेमाची टॅगलाईन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंच्या जीवनगाथा रुपेरी पडद्यावर दाखवितांना त्यात मनोरंजकता आणणे यासाठी चित्रपटाचा पटकथाकार व दिग्दर्शक हे दोघेही सिनेमा माध्यमातील कसलेले खेळाडू हवे हेही तितकेच खरे. दंगल, मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, पान सिंग तोमर, साला खडूस, बुधिया सिंग या सिनेमांचे पटकथाकार व दिग्दर्शक हे व्यावसायिक सिनेमा माध्यमातील कसलेले खेळाडू म्हणावे लागतील. अझहर अथवा सचिन च्या दिग्दर्शकांना ते जमले नाही. (Saina Movie Review)

१४ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ साली आलेल्या ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) या सिनेमाच्या कथेसाठी अमोल गुप्ते (Amol Gupte) यांचे खूप कौतुक झाले व त्यांना बरेचसे पुरस्कारही मिळाले. सुरुवातीला तारे चे दिग्दर्शनही अमोल च करणार होते परंतु मि. परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) यांना काही त्यांच्यावर विश्वास बसेना म्हणून मग तारे ची धुरा आमिरने स्वतःच्या हातात घेतली. तारे नंतर अमोल यांनी स्टॅनली का डब्बा, हवा हवाई आणि स्निफ हे तीन चित्रपट दिग्दर्शित केले त्यापैकी स्टॅनली ला समीक्षकांचे कौतुक लाभले परंतु तीनही चित्रपटांना व्यावसायिक यश लाभले नाही. हे सर्व इथे सांगायचे कारण असे की सायना बघतांना परत एकदा अमोल च्या दिग्दर्शनात असलेला व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो. मुळात सायनाच्या वर्ल्ड नं. १ बनण्याच्या प्रवासात म्हणजे लहानपणापासून ते २०१५ पर्यंत खूप काही नाट्यमय घटनांचा समावेश नाही ज्याचा चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात उपयोग होईल. वर उल्लेख केलेल्या सिनेमांमधील खेळाडूंच्या आयुष्यात ज्या बऱ्यापैकी होत्या. सायना चा खेळाडू म्हणून संघर्ष हा सुद्धा खूप मोठा व प्रेरकच आहे परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिला खूप आर्थिक, सामाजिक अथवा मुलगी म्हणून लैंगिक विषमतेला सामोरे जावे लागलेले नाही. म्हणून सायना बघतांना काहीच नाटकीय अथवा फिल्मी दृश्ये दिसत नाहीत. मग अशा वेळेस काही ठिकाणी थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते जेणेकरून कथानक बघतांना प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल. परंतु कथा-पटकथा लिहितांना अमोल ने ती घेतलेली दिसत नाही. परंतु असे असूनही सायना हा सिनेमा छानच जमला आहे त्यात वाद नाही. पण म्हणतात ना चांगल्या स्वयंपाकाला वरची फोडणी चव आणते. ती फोडणी इथे नाही. 

 

saina movie review

 

“माँ की कोख” पासून सुरु झालेला सायना चा बॅडमिंटन (Badminton) प्रवास यात आपणास बघायला मिळतो. आठ वर्षाची शाळकरी मुलगी कशी स्टेट लेव्हल जिंकत, नॅशनल पर्यंत पोहोचते व नंतर वयाच्या १६ व्या वर्षी फिलिपिन्स ओपन ही ४ स्टार बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला व आशियातील सर्वात तरुण खेळाडू कशी बनते हा रंजक असा प्रवास बघतांना अभिमान वाटतो.  तिच्या यशात आई-वडिलांचा असलेला वाटा, मित्रांनी दिलेली खंबीर साथ, तिचे कोच, त्यांच्या अंडर झालेली ट्रेनिंग, नंतर खेळात झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे करिअरमध्ये आलेला ब्रेक परंतु त्यावर मात करून तिचे परत एकवार भरारी घेणे व ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास हे सर्व अमोल गुप्ते यांनी व्यवस्थितपणे मांडले आहे. पटकथेत नाट्यमयता नसली तरी परिणीती चोप्रा चा प्रभावी अभिनय व प्रभावी संवाद (अमितोश नागपाल) यामुळे कथेची पकड फारशी सैल होत नाही. सोबतीला मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) या प्रतिभावान गीतकाराने लिहिलेल्या ‘चल वही चले’ व ‘परिंदा’ या दोन अर्थपूर्ण गीतांनी व त्या गीतांना अमाल मलिक (Amaal Malik) च्या सुरेल संगीताने सायना चा हा प्रवास अधिक प्रेरणादायी वाटतो. 

saina movie review

सायना ची सर्वात जमेची बाजू आहे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) चा सर्वांगसुंदर अभिनय. बॅडमिंटन च्या भाषेत अशा अभिनयासाठी एकच शब्द आहे…स्मॅशिंग. सायनाची जीव की प्राण असलेली आई हॉस्पिटलमध्ये गंभीर असतांना तिने खेळलेली आंतरराष्ट्रीय मॅच व त्यानंतर ती मॅच खास आईसाठी जिंकणाऱ्या सायनाला जेंव्हा आई बरी आहे हा फोन येतो तेंव्हाचा परिणितीचा अभिनय बघा. कमाल. नुसताच अभिनय नाही तर या भूमिकेसाठी तिने घेतलेली शारीरिक मेहनतही जबरदस्त आहे. सिनेमाच्या पूर्वार्धात नैसर्गिक अशा जाडजूड सायनासाठी तिने वाढवलेले वजन व नंतर तिच्या प्रशिक्षकांनी सांगितल्यानंतर कमी केलेले वजन हे सर्व परिणितीने खूप मेहनतीने साकारले आहे. सायनाच्या रोलसाठी परिणितीची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्यास आश्चर्य नाही. आधी या भूमिकेसाठी श्रद्धा कपूर फायनल झाली होती व शुटिंगही सुरु झाले होते परंतु काही तांत्रिक कारणांमुळे श्रद्धाने हा चित्रपट सोडला. ‘ना आना इस देस लाडो’ या टीव्ही मालिकेतील अम्माजी च्या भूमिकेसाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री मेघना मलिकने (Meghana Malik) सायना च्या आईच्या भूमिकेत जान ओतली आहे. सायनाचे कोच पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेत मानव कौल (Manav Kaul) ने सुद्धा अतिशय संयमित अभिनय केला आहे. सायनाचा लहानपणापासूनचा प्रिय मित्र कश्यप च्या भूमिकेत ईशान नक्वी चा अभिनय सुद्धा प्रशंसनीय आहे. 

उत्सुकता, रंजकता, नाट्यमयता, फिल्मी अंदाज या सर्व आघाड्यांवर बॅक फुटवर असलेला सायना हा चित्रपट भारताचा गौरव असलेल्या सायना नेहवाल च्या यशस्वी व प्रेरणादायी प्रवासासाठी व परिणितीच्या कमाल अभिनयासाठी एकदा तरी बघावाच.

Saina Movie Trailer:- 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment