-© विवेक पुणतांबेकर

संगम सिनेमा प्रदर्शित झाल्याला ५७ वर्षे झाली. हिंदी सिनेमातल्या माईलस्टोन समजल्या गेलेल्या ‘संगम’ च्या आठवणी (Memories of Raj Kapoor’s Superhit Musical Film Sangam) आज मांडतो आहे. ‘जिस देश मे गंगा बहती है’ ला मिळालेल्या यशामुळे राज कपूर सकट सगळी आर.के. फिल्मस ची टीम उत्साहीत झाली. आर.के.काॅटेज मध्ये रोज विचार मंथन सुरु झाले. चार्ली चॅप्लिन च्या लाईमलाईट सिनेमावर आधारलेली एक पटकथा के.ए.अब्बास यांनी लिहीली होती या कथेवरच नंतर मेरा नाम जोकर ची निर्मिती झाली.यावर सिनेमा करायचा हा विचार १९५४ सालापासून राजकपूर करत होते.पण काही कारणाने हा विचार मागे पडला होता. डोक्यात होता.या कथेवर सिनेमा निर्माण करावा असे राजकपूर ना वाटले.कथेचे वाचन आर.के.काॅटेज मध्ये झाले.साल होते १९६१.याच कालखंडात लेखक इंदर राज आनंद राजकपूरना भेटले.त्यांच्या कडे पटकथा होती जी साने गुरुजी यांच्या तीन मुले या कथेवर आधारलेली होती. कथेचे नाव होते ‘घरोंदा’. ही कथा ‘बरसात’ च्या वेळी राज कपूरनी वाचलेली होती. त्याच वेळी राज कपूरनी ठरवले होते की यावर सिनेमा करायचा. याचे पोस्टर तयार केले होते. हे पोस्टर ‘आवारा’ सिनेमात पहायला मिळते.

इंदर राज आनंद यांची पटकथा वाचल्यावर राज कपूर नी ठरवले आधी या सिनेमाची निर्मिती करु. साहजिकच ‘मेरा नाम जोकर’ चा विषय मागे पडला. ‘घरोंदा’च्या निर्मितीची जुळवाजुळव सुरु झाली. सहनायकाच्या भुमिकेसाठी दिलिप कुमार ना विचारले. पण त्यांनी नकार दिला. मग त्या भुमिकेसाठी राजेंद्र कुमार ला निवडले. नायिकेच्या भुमिकेसाठी संबंध बिघडलेले असतानाही एका मध्यस्तां मार्फत नर्गिस ला विचारले. तिने नकार दिला. पद्मिनी ने घरच्या अडचणी ने नकार दिला. मग वैजयंतीमाला चा विचार सुरु झाला. तिने ही आधी खूप आढेवेढे घेतले. ललिता पवार, अचला सचदेव, कर्नल कपूर, इप्तेखार यांची निवड झाली. मधल्या काळात ‘घरोंदा’ ची काही रीळे शूट केली. याच सुमारास ‘जंगली’ सिनेमा रिलीज झाला. या रंगीत सिनेमाला मिळालेले यश पाहिल्यावर राज कपूरनी ठरवले आता रंगीत सिनेमा निर्माण करायचा. ‘घरोंदा’ ची शूट झालेली रिळे स्क्रॅप केली. कोडॅक फिल्म कंपनी भारतात आपला कारखाना सुरु करायच्या विचारात होती. मुंबईला वरळी ला एक मोठी बिल्डींग कोडॅक ने बांधली. इथल्या सिने फोटोग्राफर्स ना टेक्नीकलर फोटोग्राफी चे प्रशिक्षण देण्यासाठी लंडन ला बोलावले. यात राज कपूर चे कॅमेरामन राघू कर्माकार, तसेच नामवंत कॅमेरामन द्वारका दिवेचा (शोले चे कॅमेरामन) यांचा समावेश होता. ट्रेनिंग घेऊन आल्यावर तिथे शूट केलेली टेक्नीकलर फिल्म पाहिल्यावर राजकपूरनी ठरवले टेक्नीकलर प्रिंटस काढायच्या. या साठी परकी चलनाची गरज होती. भारत सरकारकडे राज कपूर नी ३८ हजार रुपयाच्या परकी चलनाची मागणी केली. पण फक्त ८ हजार रुपयेच मंजूर झाले. ही गोष्ट रशियन वकालतीला समजल्यावर त्यांनी टेक्नीकलर प्रिंटस चा खर्च रशियन सरकार करेल असे आश्वासन राज कपूर ना दिले. सिने निर्मिती ची कामे सुरु झाली. शैलेंद्रने लिहीलेल्या ‘बोल राघा बोल’ गाण्यावरुन राजकपूरनी ‘घरोंदा’ चे नाव बदलून ‘संगम’ ठेवले. वैजयंतीमाले कडून बरेच दिवस होकार मिळत नव्हता. राज कपूर नी तिला मद्रास ला तार करुन विचारले ‘बोल राधा बोल संगम होगा के नही’. वैजयंतीमाला ने तार करुन उत्तर दिले ‘होगा होगा होगा.’

आऊट डोअर शूटींग साठी राज कपूरनी पुणे निवडले. हवाई दलाच्या लोहगाव विमानतळ वर शूटींग करायची परवानगी आणि हवाई दलाचे काही स्टाॅक शाॅटस वापरायची परवानगी भारत सरकार ने दिली होती. तसेच पुणे स्टेशनवर काही सीन्स शूट झाले. बंड गार्डन परीसरात तसेच कॅम्प भागातही काही सीन्स शूट केले गेले. ‘बोल राधा बोल’ हे गाणे लोणावळा परिसरात मळवली येथे असलेल्या एका तळ्यांत केले गेले. शैलेंद्र, हसरत, शंकर जयकिशन या चौकटीने अतिशय बहारदार श्रवणीय गाणी ‘संगम’ साठी तयार केली. राधा नावाच्या हिंदु प्रेयसीला उद्देशून हसरत नी ४० च्या दशकात लिहीलेले एक प्रेमगीत ( ये मेरा प्रेमपत्र पढकर) ‘संगम’ मध्ये वापरले गेले.

निर्माता/दिग्दर्शक किकूभाई देसाई च्या मुलीच्या लग्नात ऐकलेले एक लोकगीत राज कपूरना आवडले होते. हसरतकडून त्या गीतात सुधार करुन वापरले. हे गाणे होते ‘मै क्या करु राम मुझे बुढ्ढा मिल गया’. शंकर जयकिशननी त्याला बॅगपाईप इफेक्ट देऊन धुंद गाणे तयार केले. (या गाण्यात आणि ‘बोल राधा बोल’ गाण्यात बॅगपाईप चा इफेक्ट तोटा नावाच्या वाद्यावर काढलेला आहे).

भारत चीन युध्दात चीन ने केलेल्या दगाबाजी च्या पार्श्वभुमीवर शैलेंद्र ला सुचले ‘दोस्त दोस्त ना रहा’. मुळातले पाच अंतरे असलेले हे गाणे रेकाॅर्ड करताना तीन अंतरेच वापरले आणि प्रत्यक्ष सिनेमात दोनच अंतरे वापरले. ( एल.पी. रेकाॅर्ड वर तिसरा अंतरा ऐकायला मिळतो ) या गाण्यात पियानो वाजवला होता राॅबर्ट कोरीया ने. महेंद्र कपूर चा आवाज ‘हरदिल जो प्यार करेगा’ गाण्यात मुकेश आणि लता यांच्याबरोबर वापरला होता. संगीतकार जयकिशन चे आवडते हाॅटेल चर्चगेट स्टेशनसमोर चे गेलाॅर्ड. तिथे एक पाॅप सिंगर होता विवीयन लोबो. तो नेहमी जयकिशनला सिनेमात गायची संधी द्यावी म्हणून विनंती करायचा. त्याचा आवाज राज कपूरना पसंत पडला. ‘इश बलिये आय लव यू’ हे पाॅप गाणे त्याच्या आवाजात रेकाॅर्ड केले. शंकर जयकिशन च्या संगीतात नेहमी पार्श्वसंगीत जयकिशन तयार करायचे. पण संगम च्या वेळी जयकिशन आजारी असल्याने सगळे पार्श्वसंगीत शंकरजींनीं फक्त चार दिवसात केल्याचा उल्लेख राज कपूरचे प्रसिध्दी अधिकारी वसंत साठे यांच्या पुस्तकात आहे.

‘संगम’ ची निर्मिती सुरु झाली तेव्हा हा सिनेमा चार तासांचा करायचा राज कपूर यांचा विचार अजिबात नव्हता. वैजयंतीमाला ला कार्लेव्ही वॅली येथल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवाला जायचे होते. शूटींग थांबले. राजेंद्र कुमार, शंकर जयकिशन पण युरोप दौर्‍यावर निघून गेले. त्यावेळी मेकअपमन सरोश मोदी नी राज कपूरना सुचवले तुम्ही पण युरोप दौर्‍यावर जा. राज कपूरना ही संकल्पना आवडली आणि युरोप मध्ये आऊट डोअर शूटींग करायचे त्यांनी ठरवले आणि दोन मध्यंतराचा संगम तयार झाला.

राज कपूर स्वतः उत्कृष्ट संकलक होते. पण तरीही ते संकलन जी.जी. मयेकर यांच्याकडूनच करुन घेत. ‘जिस देश मे गंगा बहती है’ च्या वेळी मयेकर आजारी असल्याने राज कपूरनी संकलन करुनही एडिटर गिल्ड ने मान्यता न दिल्यामुळे टायटल्स मध्ये याचे श्रेय मयेकरांना दिले होते. ही गोष्ट रशियन लोकांना माहिती होती. त्यांनी आग्रह धरला की ‘संगम’ च्या टायटल्स मध्ये आधी राज कपूर यांचे नाव संकलक म्हणून आणि सह संकलक म्हणून मयेकर यांचे नाव टाका. मयेकरांना अपमान वाटला आणि ते आर.के. फिल्मस मधून बाहेर पडले. जवळ जवळ पंधरा दिवस रोज त्यांच्या घरी जाऊन राज कपूर त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करत होते. पण ते ऐकेनात. शेवटी राज कपूर नी स्वतः संकलन केले. एडिटर गिल्ड ने मान्यता दिल्यामुळे राज कपूर यांचे नाव संकलक म्हणून द्यायला सुरुवात झाली ‘संगम’ पासूनच.

राजकपूर ना सफेद साडीतली नर्गिस नेहमी आवडायची. ‘संगम’ मध्ये पण वैजयंतीमाला सफेद साडीत दाखवली आहे. राज कपूर यांच्या व्यक्तिगत जीवनातले अनेक प्रसंग त्यांच्या सिनेमात डोकावतात. यातला वैजयंतीमाला चिठ्ठी फाडते हा प्रसंग प्रत्यक्षात घडला होता. आधीच्या काळात नर्गिस च्या आयुष्यात आलेल्या कॅप्टन अंसारी ने नर्गिस ला पाठवलेली चिठ्ठी राज कपूरना सापडल्यावर नर्गिस ने ती फाडून टाकली होती. हा प्रसंग जशाचा तसा राज कपूरनी दाखवला होता.

‘संगम’ चा वर्ल्ड प्रिमीयर रशियात ताश्कंद च्या स्टेडियम थिएटर मध्ये झाला.शून्याखाली गेलेल्या तपमानातसुध्दा प्रेक्षकांची अफाट गर्दी जमली होती. ‘हर दिल जो प्यार करेगा’ गाणे संपल्यावर अभिनयाचे दर्शन घडवत राज कपूर एक धून अकाॅर्डियनवर वाजवतात. आर.के. फिल्म ची ही सिग्नेचर ट्यून रुमानियन बंडखोर संगीतकार इवानिच यानी तयार केलेली होती. हा संगीतकार रशियन राज्यक्रांतीत मारला गेला. ही धुन ऐकताक्षणी रशियन लोक इतके बेभान झाले की या गाण्याचे रीळ दहा वेळा परत दाखवावे लागले.

मुंबईत नुतनीकरण केलेल्या अप्सरा सिनेमा गृहात (आधीचा लॅमिंग्टन सिनेमा) ‘संगम’ चा प्रिमीयर शो सकाळी दहा वाजता झाला. यानंतर पत्रकारांना दिलेल्या मेजवानीत राज कपूरनी महाराष्ट्रीयन पध्दतीचे श्रीखंड पुरी चे जेवण दिल्याची आठवण बुजुर्ग पत्रकार सांगत. अप्रतिम संगीत, सुरेख दिग्दर्शन आणि संकलन, अप्रतिम छायाचित्रण यामुळे ‘संगम’ देशात आणि विदेशात तुफान लोकप्रिय झाला. त्या वर्षी पहिल्यांदा सिनेसृष्टीवर आयकर विभागाचे छापे पडले. राज कपूर यांच्याकडे बेहिशोबी ४० लाख रुपये सापडले. (१९६४ साली). पण त्या वर्षी भारतातल्या दहा करोडपतींची यादी जाहीर झाली. त्यात राज कपूर यांचा नंबर सहावा होता इतके अफाट उत्पन्न ‘संगम’ ने दिले. त्याच वर्षी त्यांनी पुण्याजवळ लोणी काळभोर येथे ११० एकर जमीन विकत घेतली आणि तिथे आपले फार्म हाऊस राजबाग उभारले.

भारत आणि इराण यांच्या राजनैतिक संबंधांची सुरुवात ‘संगम’ च्या इराणी भाषेतल्या प्रिमीयर शो ने झाली. ‘संगम’ चे संगीत अप्रतिम असुनही फिल्मफेअर च्या घाणेरड्या राजकारणाने ‘संगम’ ला सर्वोत्तम संगीताचा पुरस्कार डावलला गेला. लतादिदींचा अपवाद वगळता या सिनेमाशी संबंधीत कोणीच या जगात नाही. स्टुडिओ पण इतिहासजमा झाला. पण डिजीटल स्वरुपात हा सिनेमा जतन केला आहे. टिव्हीच्या चॅनेलवरुन दाखवला जातो आणि नविन पिढी पण तितकाच आनंद लुटते जितका आमच्या पिढीने लुटला होता.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.