पुष्पकची ३३ वर्षे!-अजूनही दरवळतोय ज्याचा सुगंध असा- पुष्पक

– ©अजिंक्य उजळंबकर

ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार यांना बॉलिवूडमधील विक्रमी यशस्वी चित्रपटांमुळे ज्युबिली कुमार नावाने ओळखत. पण त्यांचे चिरंजीव कुमार गौरव यांची ओळख मात्र अगदी याच्या विरुद्ध होती. पिता राजेंद्र कुमार यांनी निर्मिती केल्याने  १९८१ साली लव्ह स्टोरी प्रदर्शित झाला खरा पण त्यानंतर कुमारास सिनेसृष्टीत काही गौरव प्राप्त झाला नाही. म्हणून मग पुन्हा १९९३ साली माधुरी दीक्षित चा आधार घेऊन राजेंद्र कुमार यांनी आपल्या या कुमारासाठी ‘फुल’ या चित्रपटाची निर्मिती केली. ज्याचे दिग्दर्शन केले होते दक्षिणेतील सुप्रसिद्ध व दिग्गज नाव ‘सिंगीथम श्रीनिवास राव’ यांनी. तामिळ, तेलगू व कन्नड चित्रपट दिग्दर्शनात व्यस्त असलेले राव हिंदी सिनेमाकडे कधीच फारसे आकर्षित नव्हते. १९८६ साली ‘नाचे मयुरी’ हा एवढा एकच हिंदी चित्रपट त्यांचा गाजला जो मूळ तेलगूच होता. मग असे असतांना या फ्लॉप कुमारासाठी राव यांना हिंदीत  येण्याची काय गरज होती? याचे उत्तर १९८७ सालात दडले आहे. या साली प्रदर्शित दिग्दर्शक राव यांच्या एका तामिळ चित्रपटाचे हिंदीत डबिंग करण्यात आले. आणि हा सिनेमा मुंबई टेरिटरी साठी वितरित केला होता अभिनेते राजेंद्र कुमार यांनी. ‘फुल’ हि राव यांनी राजेंद्र कुमार यांच्या त्या व्यावसायिक फेवरची केलेली परतफेड होती. मग तो राव यांचा १९८७ चा हिंदी डब सिनेमा कोणता? तो होता भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला संवाद विरहित सिनेमा ‘पुष्पक’. म्हणजे पुष्पकची परतफेड पुष्पकनेच अर्थात फुलानेच!

दिग्दर्शक सिंगीथम श्रीनिवास राव हे अत्यंत प्रतिभाशाली व दाक्षिणात्य सिनेमात वेगवेगळ्या प्रायोगिक सिनेमांसाठी आदराने ओळखले जाणारे लेजंडरी व्यक्तिमत्व. तामिळ भाषेतील त्यांच्या पहिल्याच चित्रपटास (दिक्कात्रा पार्वती, १९७४) उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कन्नड भाषेतील त्यांच्या पहिल्याच चित्रपटास (हालू जेनु, १९८२) कर्नाटक राज्याचा उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. आंध्रप्रदेश सरकारतर्फे दिले जाणारे ७ नंदी अवॉर्ड्स राव यांच्या खात्यात जमा आहेत. अर्थातच मग पुष्पक या त्यांच्या जगावेगळ्या प्रयोगासही राष्ट्रीय पुरस्कार मिळावयास हवाच होता आणि तो मिळालाही. सीएनएन च्या भारतातील १०० ग्रेटेस्ट फिल्म्समध्ये स्थान मिळालेल्या या सिनेमाची कल्पना राव यांना अंघोळ करतांना डोक्यात आली. के. व्ही. रेड्डी यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करीत असतांना पासून बरेच वर्षे राव यांना अशा प्रकारचा चित्रपट बनविण्याची इच्छा होती.

मग दोनच आठवड्यात पटकथा लिहून कमल हसन यांना ऐकवली. ते एका पायावर तयार झाले. कथानक तसं फार साधं होतं. बँगलोर येथील एका बेरोजगार युवकास एके दिवशी एक करोडपती दारुडा इसम रस्त्याच्या कडेला पिऊन बेशुद्ध अवस्थेत दिसतो. या करोडपतीच्या खिशात तो ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलेला असतो त्या हॉटेलच्या रूमची किल्ली पण असते. गरिबीला कंटाळलेला हा युवक मग या करोडपती इसमास आपल्या रूमवर आणून बांधून टाकतो व स्वतः करोडपती इसम बनून त्याच्या हॉटेलात रहायला जातो. एका दुकानात आवडलेली एक युवती परत याच हॉटेलमध्ये या युवकास दिसते व दोघांचे प्रेम जुळते. या हॉटेलात जादूचे प्रयोग करणाऱ्या एका सुप्रसिद्ध जादूगाराची ती मुलगी असते. दुसरीकडे या करोडपती इसमाच्या बायकोचे एकाशी विवाहबाह्य प्रेम प्रकरण असते. आता तिच्या या लव्हरने एका किलरला सुपारी दिलेली असते या करोडपतीला मारण्याची. आता जेंव्हा कथेचा नायक अर्थातच हा युवक हॉटेलात त्याच्या जागी असतो तेंव्हा हा किलर त्या युवकास करोडपती समजून मारण्याचा प्रयत्न करत असतो. युवकाला मारण्याच्या नादात एकदा हा किलरच युवकाच्या रूममध्ये एकदा बेशुद्ध होतो. मग हा युवक यामागचे कारण शोधून काढतो. सर्व सत्य समजल्यावर या युवकास आपण केलेल्या चुकीची जाणीव होते. मग हा गोंधळ शेवटी कसा संपतो हा पुढील कथाभाग.

सिंगीथमराव यांनी लिहिलेले हे कथानक ऐकून कुणीच निर्माता हा चित्रपट बनविण्यास तयार नव्हता. मग राव यांनी स्वतःच निर्मितीचा निर्णय घेतला व सुप्रसिद्ध निर्माते रामोजी राव यांचा सल्ला घेतला. “तू सहा लोकांना हि कथा ऐकव व त्यातल्या तिघांना आवडली तर तू याची निर्मिती कर” असा सल्ला रामोजी राव यांनी सिंगीथम यांना दिला. पहिल्या तिन्ही लोकांनी पसंती दिल्यावर लगेच सिंगीथम कामाला लागले. राजकुमार या कन्नड भाषेतील सुपरस्टार अभिनेत्यासोबत राव यांची तेंव्हा गट्टी जमली होती. या अभिनेता दिग्दर्शक जोडीचे तब्बल ७ चित्रपट प्रदर्शित व यशस्वी झालेत. राजकुमार यांचे नातेवाईक असलेले श्रींगार नागराज यांना पुष्पक ची कथा व कल्पना इतकी आवडली कि त्यांनी निर्माता होण्याची तयारी दाखवली. पुष्पक हा त्यांचा निर्माता म्हणून पहिला व शेवटचा चित्रपट.

सिंगीथम राव यांनी घेतलेली जबाबदारी अवघड होती. १९३१ सालच्या ‘आलम आरा’ या पहिल्या बोलपटानंतर भारतीय सिनेमा कधीच असा गप्प बसला नव्हता. उलट १९८७ साल असे होते कि हिंदी सिनेमा असो वा दाक्षिणात्य, जोरजोरात ओरडणारे, हाणामारी व गाण्यांनी भरलेले तद्दन मसाला व्यावसायिक सिनेमांचा जणू पूर आला होता. अशा वेळी संवाद विरहीत सिनेमा काढणे हि प्रचंड मोठी जोखीम होती जी वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असलेल्या सिंगीथम राव यांनी उचलली. कमल हसन यांचा होकार आल्यानंतर इतर कलाकारांचा शोध घेणे सुरु झाले. संवाद विरहित सिनेमा असल्याने अर्थातच सर्व भर चेहऱ्यावरील हावभाव व अभिनयावर असणार होता त्यामुळे कलाकार सुद्धा तितक्याच ताकदीचे असणे आवश्यक होते. पण चित्रपटात संवादच नसल्याने ठराविक भाषेची जाण असलेलेच कलाकार घेण्याचे बंधनही नव्हते. कमल हसन यांना नायिकेच्या भूमिकेत आमला यांनी छान साथ दिली आहे. सिंगीथम राव यांना या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित व नंतर नीलम यांना घेण्याची इच्छा होती. आमला यांना एका पुरस्कार सोहळ्यात संचालन करतांना राव यांनी पहिले व त्वरित तिची निवड करण्यात आली.

त्या काळी दूरदर्शनवर नुक्कड या मालिकेतील समीर खाखर यांनी साकारलेला दारुडा खोपडी खूप गाजला होता. तो पाहून राव यांना समीर यांच्या रूपात त्यांचा दारुडा करोडपती मिळाला होता. जादूगाराच्या रोलसाठी सुप्रसिद्ध जादूगार पी.सी. सरकार यांना घेण्याची राव यांची इच्छा होती पण बँगलोर येथील के.एस. रमेश यांच्या जादूच्या प्रयोगाबद्दल राव ऐकून होते. चित्रपटाचे सर्व शूटिंग बँगलोरलाच होणार असल्याने मग रमेश यांना घेण्यात आले. टिनू आनंद यांनी साकारलेला किलर मिळाला होता कमल हसन यांची पत्नी सारिका हिच्या शिफारशीने. नाहीतर राव यांना या भूमिकेसाठी अमरीश पुरी हवे होते. चित्रपटात केवळ दोनच दृश्यात दिसणारा एक भिकारी आहे. तेलगू चित्रपटात आपल्या सहज सुंदर अभिनयाने विविध चरित्र भूमिका साकारणारे व विविध पुरस्काराने सन्मानित झालेले सुप्रसिद्ध अभिनेते पी. एल. नारायणा यांनी हि भूमिका साकारली आहे.

चित्रपटात दाखविलेले हॉटेल पुष्पक म्हणजे बँगलोर येथील सुप्रसिद्ध हॉटेल विंडसर मॅनॉर. राव यांना हे हॉटेल खूप आवडले होते. पण हॉटेल व्यवस्थापन शूटिंगसाठी हे हॉटेल देण्यास तयार नव्हते. इथेत्यांना मनविण्याचे महत्वाचे काम केले निर्माता श्रींगार नागराज यांनी. या चित्रपटानंतर तुमचे हॉटेल जगभर प्रसिद्ध होईल असा विश्वास हॉटेल मालकांना दिल्यावर शूटिंग सुरु झाले. शूटिंग दरम्यान चित्रपटाशी संबंधित सर्व टीम याच हॉटेलात मुक्कामाला होती.
राव यांनी या चित्रपटात ब्लॅक अथवा डार्क कॉमेडी दाखविली आहे. जाने भी दो यारो प्रमाणे. म्हणजे नायक नायिका यांचे प्रेम जुळते तो क्षण आठवा. पुष्पक हॉटेलच्या मालकाचा मृत्यू झालाय आणि हे दोघे त्यांच्या अंतिम दर्शनाच्या रांगेत एकमेकांचा हात पकडून त्या पार्थिव देहाभोवती फिरत असतात. सत्यजित रे यांनी या दृश्यासाठी राव यांचेविशेष कौतुक केले होते. किंवा कथेचा नायक करोडपती दारुड्याला आपल्या घरात डांबून ठेवतो, नोझलद्वारे दारू पाजतो, एनिमा द्वारे शौच काढून मग त्याचे गिफ्ट पॅकिंग करून बाहेर आणतो असे बरेचसे सीन डार्क कॉमेडीने साकारले आहेत. पुष्पकच्या प्रत्येक दृश्यात राव यांच्या प्रतिभेचा टच जाणवल्याशिवाय राहत नाही. डार्क कॉमेडी असूनही चित्रपटाचा शेवट राव यांनी अतिशय सकारात्मक दाखविला आहे हे विशेष. नायकास आपल्या चुकीची होणारी जाणीव व जीवनात जे काही मिळवायचे आहे ते स्वतःच्या गुणवत्तेवर व मेहनतीने मिळवावे हा बोध घेणारा नायक शेवटच्या दृश्यात नौकरीच्या रांगेत हातात नायिकेने दिलेले गुलाबाचे पुष्पक घेऊन उभा राहतो हा राव यांच्यातील प्रगल्भ कथालेखकाचा परिणाम होता.

मेल ब्रूक्स यांचा १९७६ साली प्रदर्शित हॉलिवूड चित्रपट ‘सायलेंट मुव्ही’ याचा प्रभाव राव यांच्यावर होता. चित्रपटभर संवाद नव्हते म्हणून पार्श्वसंगीताला महत्वाचे स्थान होते. ही जबाबदारी संगीततज्ज्ञ व संगीतकार एल वैद्यनाथन यांनी लीलया पेलली. वैद्यनाथन यांची एका वाक्यात ओळख करून द्यायची झाल्यास ‘मालगुडी डेज’ या मालिकेचे अजरामर संगीत यांचेच. एखाद्या सिनेमाच्या पार्श्वसंगीताला एवढे ऐकले जाण्याची ही भारतीय सिनेमातील पहिली व शेवटची वेळ. जसे पार्श्वसंगीत महत्वाचे तसेच छायचित्रणही. कलाकारांच्या अभिनयाला परफेक्ट कॅमेरा अँगल्स मध्ये बसविण्याचे महत्वाचे काम इथे होते. बँगलोरचे बी. सी. गोवारीशंकर यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यांनी छायाचित्रण केलेल्या तब्बल सहा चित्रपटांना कर्नाटक राज्य सरकारचा उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळालेला आहे.

असा हा पुष्पक. एव्हरग्रीन. सांगावे तेवढे कमीच आणि पहावा तेवढा प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा जास्त आवडणारा. ज्या बँगलोर शहरात शूटिंग झाले तिथे तब्बल ३५ आठवडे पुष्पक चालला. भारतभर सर्वत्र सुपरहिट झाला. राष्ट्रीय पुरस्कारासोबतच इतर विविध श्रेणीत सात पुरस्कार यास मिळाले. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध फिल्म फेस्टिव्हल्स मध्ये याचा सन्मान झाला. अजूनही सिनेमा माध्यम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सिनेमा म्हणजे एक केस स्टडी आहे व यापुढेही नेहमी राहील. एकही संवाद ना म्हणता खूप काही बोलून जाणारा. तोंडी शब्द नसले तरी तितक्याच सहजतेने व्यक्त होणारा. ह्रदयात कायमचे घर करणारा. सुंगंधीत पुष्पक.

थँक्स सिंगीथम श्रीनिवास राव. थँक्स कमल हसन.

( ©- कॉपीराईट कायद्यानुसार हा लेख लेखकाच्या नावाशिवाय अथवा स्वतःचे नाव वापरून फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे)

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment