भारतीय सिनेविश्वात बोलपटाचे आगमन झाल्यावर आपला खास ठसा उठवणार्या काही चित्रपट संस्था होत्या. यातूनच अनेक कलावंत, तंत्रज्ञ, संगीतकार लाभले त्यातल्या काही जणांनी ती परंपरा पुढे चालवली. पुण्याची प्रभात फिल्म कंपनी, सोहराब मोदींची मिनर्व्हा मुवीटोन, कलकत्त्याची न्यू थिएटर्स या काही नामवंत सस्था अस्तित्वात होत्या. कलेची जोपासना करण्यात बंगालचा फार मोठा वाटा होता. विज्ञानाची पदवी घेऊन न्यू थिएटर्स मध्ये सहाय्यक कॅमेरामन म्हणून सुरुवात करणारे आणि नंतर यशस्वी निर्माता दिग्दर्शक झालेले बिमल राॅय यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या काही आठवणी उलगडण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
सधन जमीनदार घराण्यात सुत्रपूर ढाका येथे १२ जुलै १९०९ साली बिमल राॅय यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर ते कलकत्याला आले. न्यू थिएटर्स मध्ये पी.सी. बारुआ यांच्याकडे सहाय्यक कॅमेरामन म्हणून दाखल झाले. १९४८ नंतर न्यू थिएटर्स बंद पडले. या आधीच शशधर मुखर्जी, हिमांशू राॅय यांच्या बाॅम्बे टाॅकिज मध्ये भागीदार बनले होते. त्यांनी अशोक कुमारांना मुंबईत बोलावून घेतले. अशोककुमारांची अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु झाली होती. अशोककुमारांनी बिमल राॅय, ऋषिकेश मुखर्जी, नबेंद्रु घोष, असित सेन, कमल बोस, सलिल चौधरी यांना मुंबईत बोलावले. मुंबईत आल्यावर बिमल राॅय नी बाॅम्बे टाॅकीज साठि दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता मां. बाॅम्बे टाॅकिज बंद झाल्यावर अशोककुमारांनी चालवायला घेतली आणि चित्रनिर्मिती सुरु केली. अशोककुमार प्राॅडक्शन्स साठी बिमल राॅय नी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता विराज बहू. यानंतर दिग्दर्शित केला परिणिता. याच सुमारास त्यांनी स्वतःची बिमल राॅय प्राॅडक्शन्स ही चित्रसंस्था सुरु केली. कलकत्याला असताना संगीतकार सलिल चौधरी यांच्या कथेवर तांगेवाला सिनेमा बिमल राॅय नी दिग्दर्शित केला होता. याचाच हिंदी रिमेक दो बीघा जमीन नावाने करायचे ठरवले. दो बीघा जमीन आधी अपयशी झाला तरी आंतरराष्ट्रीय बक्षिस मिळाल्यावर यशस्वी झाला. बिमल राॅय यांचे नाव हिंदी सिनेविश्वात आदराने घेतले जाऊ लागले.
Bimal Roy, Suchitra Sen and Dilip Kumar on the set of Devdas
वास्तववादी नवसिनेमा ‘दो बीघा जमीन’ पासून सुरु झाला. बलराज सहानी यांनी यात साकारलेला शंभू महंतो भारतीय सामान्य शेतकर्यांचा प्रतिनिधी होता. आंतरराष्ट्रीय महोत्सवात हा सिनेमा पहाताना राजकपूर ही हळहळले होते. हा सिनेमा आपण निर्माण करायला हवा होता अशी खंत त्यांना वाटली. १९५४ साली त्यांनी निर्माण केलेल्या नौकरी सिनेमात बेकार तरुणाची दैना किशोरकुमार ने आपल्य अभिनयाने साकारली. याच साली बाप बेटी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रदर्शित झाला. न्यू थिएटर्स मध्ये असताना देवदास सिनेमाची निर्मिती सुरु असताना बिमल राॅय कॅमेरामन होते, याचा रीमेक १९५५ साली त्यांनी निर्माण केला. संगीतकार सचिन देव बर्मन आणि बिमल राॅय पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र आले. अतिशय समर्पक संगीत त्यांनी देवदास ला दिले. दिलिपकुमार, सुचित्रा सेन, वैजयंतीमाला आणि मोतिलाल यांचा दमदार अभिनय, बिमलदांचे अप्रतिम दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा मूळ देवदास पेक्षा सरस झाला.
still from the movie Kabuliwala
१९५८ ला त्यांनी मधुमती ची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. जन्मजन्मांची कहाणी सांगणारा, सलिल चौधरी यांच्या मधुर संगीताने नटलेला, दिलिपकुमार, वैजयंतीमाला, प्राण या दिग्गज कलावंताच्या भुमिकेने हा सिनेमा त्या वर्षीचा सर्वात यशस्वी सिनेमा होता. नऊ फिल्मफेअर बक्षीसे या सिनेमाला मिळाली. (हा उच्चांक ३७ वर्षे टिकला) याच वर्षी यहुदी हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा रिलिज झाला. तो पण यशस्वी झाला. १९५९ साली त्यांचा अस्पृश्योद्धार विषयावरचा सुजाता सिनेमा रिलिज झाला.नूतन,सुनिल दत्त अभिनित या सिनेमाला परत एकदा सचिनदांचे मधुर संगीत लाभले. सर्वोकृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. १९६० सालच्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या परख ला पण हा सन्मान लाभला. १९६२ सालचा प्रेमपत्र सिनेमा फारसा धंदा करु शकला नाही. मात्र त्यांचा सर्वात उल्लेखनीय सिनेमा म्हणजे १९६३ साल चा बंदिनी. नूतन, अशोककुमार धर्मेंद्र अभिनीत या सिनेमाला सचिनदांनी अविस्मरणीय संगीत दिले. सहा फिल्मफेअर बक्षीसे मिळवणारा हा सिनेमा नूतनच्या अभिनयाचा महत्वाचा टप्पा मानला जातो.
बिमल राॅय नी सामाजिक ,कौटुंबिक सिनेमे निर्माण करताना व्यावसायिक तडजोड कधीही केली नाही. दर्जेदार सिनेमा देणारे बिमल राॅय मीतभाषी होते. कलावंतांकडून काम करुन घेताना कधीही रागवत नसत. कलावंताची निगा राखत. मात्र त्यांचे फाजिल लाड सहन करत नसत. बंदिनी च्या वेळी नूतन गर्भवती होती. तिला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेऊन शक्य तितक्या लवकर सिनेमा पुरा केला. ऋषिकेश मुखर्जी, गुलझार हे त्यांच्याच पठडीत तयार झाले. सामाजिक, दर्जेदार कौटुंबिक सिनेमांची त्यांची परंपरा या दोघांनी पुढे चालवली. त्यांनी निर्माण केलेले उसने कहा था, काबुलीवाला, अपराधी कौन, बेनझीर, परिवार, अमानत हे सिनेमे अपयशी झाले. एकमेव रंगीत सिनेमा चैताली ची निर्मिती सुरु केली पण त्यांच्या हयातीत हा सिनेमा पुरा झाला नाही. चेन स्मोकर बिमल राॅय ना कॅन्सर झाला. तशाही अवस्थेत त्यांनी अमृतकुंभ की खोज या सिनेमाची निर्मिती सुरु केली.
कुंभमेळ्यातल्या दुर्धटनेवर आधारीत या सिनेमाचे पहिल्या सत्राचे चित्रण आटोपून परतलेले बिमल राॅय ८ जानेवारी १९६६ ला झोपेतच गेले. अलिकडे त्यांच्या या अर्धवट राहीलेल्या सिनेमाची रीळे त्यांच्या मुलाला सापडली. अतिशय सुस्थितीत असलेले कुंभ मेळ्याचे हे चित्रण यू ट्युबवर उपलब्ध आहे. नवनवीन चित्रनिर्मिती होत जाईल. नवनवे दिग्दर्शक येतच रहातील. पण बिमल राॅय सारखा सृजनशील दिग्दर्शकाला रसिक कधीही विसरु शकणार नाहीत.