– नारायण फडके
ललिता पवार या भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री. या मायावी नगरीतील त्यांचा वावर तब्बल 70 वर्षे होता. या प्रचंड मोठ्या कालखंडात त्यांनी अनेक भूमिका साकार केल्या. त्याचं कौतुक याकरिता की, घरात कुठेही अभिनयाचा वारसा नसताना अभिनयाचं जाऊ द्या; पण फारसं शालेय शिक्षणदेखील फारसे नसताना एक मोठी इनिंग खेळली!
जन्म 16 एप्रिल 1916 साली इंदूर येथे झाला. पूर्वाश्रमीचे नाव अंबिका सगुण. शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत 1928 साली ‘आर्यमहिला’ या मूकपटात सर्वप्रथम भूमिका केली. त्यानंतर ‘गनिमी कावा’ (1928), जी. पी. पवार दिग्दर्शित ठकसेन ‘राजपुत्र’ (1929), ‘समशेर बहादूर’ (1930), ‘चतुर सुंदरी’ (1930), ‘पृथ्वीराज संयोगिता’ (1930), ‘दिलेर जिक्षर’ (1931) इ. मूकपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. मुंबईच्या चंद्र आर्टस्च्या ‘हिम्मत ए मर्दा’ (1935) या बोलपटात त्या नायिका होत्या. हाच त्यांचा पहिला बोलपट पुढे 1938 मध्ये टॉलस्टॉयच्या रेसरेकशन या कादंबरीवरून ‘दुनिया क्या है’ (1938) हा चित्रपट त्यांनी निर्मिला आणि त्यात भूमिकाही केली. त्यातील गाणी त्यांनी स्वत:च म्हटली होती. भालजी पेंढारकरलिखित-दिग्दर्शित अरुण पिक्चर्सच्या ‘नेताजी पालकर’ (1939) या चित्रपटात काशी या नायिकेची भूमिका त्यांनी प्रभावीपणे वठविली. हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. दिग्दर्शक जी. पी. पवारांबरोबर त्यांचा पहिला विवाह झाला आणि अंबूची ललिता पवार झाली. पवारांबरोबर अंबूने सात-आठ चित्रपटही केले. दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर अंबूने अंबिका स्टुडिओचे मालक निर्माते रामप्रकाश गुप्ता यांच्याबरोबर विवाह केला.
ललिताबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्या गरीब भूमिकांत गरीब वाटायच्या तर श्रीमंत भूमिकांत श्रीमंत वाटायच्या. भूमिका साकारताना त्यांच्या अभिनयातील हा नैसर्गिक ताजेपणा रसिकांना भावून जायचा. प्रभातच्या ‘रामशास्त्री’ (1944) मध्ये तिने आनंदीबाईची रघुनाथरावांच्या महत्त्वाकांक्षी, करारी आणि निष्ठुर स्वभावाच्या पत्नीची भूमिका केली होती. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे धाकट्या नारायणाला गादीवर बसवले जाते. राजदरबाराच्या रीतिरिवाजाप्रमाणे, रामशास्त्रींच्या आग्रहास्तव रघुनाथ पेशव्यांच्या गादीला मानाचा मुजरा करतात. ते दृश्य पाहून आनंदीबाईंचा नुसता जळफळाट होतो. हिरमोड झाल्याने शालूचा पदर सावरत फणकार्याने ती उठून निघून जाते. त्या पदराने नकळत नारायणरावाच्या पत्नीच्या भाळीचे कुंकू पुसले जाते. पुढे घडणार्या घटनांची ती नांदी असते. सुमेरसिंग गारद्याला (सप्रू) ती निग्रहाने हळूज बजावते अगदी तुकडे तुकडे झाले पाहिजेत. काका मला वाचवा, असा टाहो फोडत नारायण प्राणदानाची भीक मागतो तेव्हा ही आनंदीबाई रघुनाथरावाला त्याला प्राणदान देण्यापासून परावृत्त करते. नारायणरावाच्या वधचा प्रसंग पाहताना अंगावर भीतीने काटा येतो. आनंदीबाईच्या भूमिकेमुळे ललिताचे संपूर्ण भारतात नाव झाले.

एकदा 1942 साली मा. भगवान यांच्या स्टंटपटात काम करत असताना भगवान हे ललिता पवार यांना थोबाडीत मारतात असं दृश्य होतं. ती थोबाडीत इतक्या जोरात बसली की, त्यांच्या कानातून रक्त येऊ लागलेव त्यांच्या चेहर्याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला. यातून त्या बर्या झाल्या; पण दुखणे त्यांच्या डोळ्यावर गेलं. बोलता बोलता डोळा आपोआपच उघडला मिटला जाऊ लागला. त्यामुळे त्यांना नायिकेच्या भूमिका करायला त्रास होऊ लागला; पण याच डोळ्याचा उपयोग त्यांनी आपला अभिनय परिणामकारक करण्यासाठी करून घेतला.
ललिता पवारांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब होता. त्यांच्या आवाजात हुकमी लय होती आणि चेहर्यावरील भाव प्रकटनात चपळता होती. त्यामुळे खानदारी, तडफदार भूमिका तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या. त्यांनी जवळपास चारशेहून अधिक चित्रपटांतून विविध भूमका केल्या आहेत. त्यामध्ये मराठमोळ्या तरुणीपासून ‘जय मल्हार’ (1947) व ‘मानाचं पान’ (1950) तर वृद्धेपर्यंतच्या ‘अमर भूपाळी’ (1951) व ‘परछाई’ (1952) अशा अनेक भूमिका आहेत. ‘दहेज’ (1950), ‘सतीचे वाण’ (1970) मधील सुहृदय ख्रिश्चन परिचारिका यांसारख्या परस्परविरोधी व्यक्तिरेखा ललिताबाईंनी प्रभावीपणे उभ्या केल्या.
मंगल पिक्चर्सचा ‘जय मल्हार’ (1947) हा मराठीतील पहिला ग्रामीण चित्रपट! ललिता यामध्ये मुरळी झाली होती. डोळ्यंत व्यंग निर्माण झाल्यावर तिने भूमिका केलेला पहिला चित्रपट होता ‘गृहस्थी’! यामध्ये ललिता व याकुब अशी खलनायिका व खलनायक अशी जोडी होती. चेहर्यावरील रागीट भाव दर्शविण्यासाठी ती या व्यंगाचा उपयोग करत असे. ते तिच्यासाठी वरदानच ठरले होते. ‘अमर भूपाळी’मध्ये (1951) ती होनाजीची आई झाली होती. वेश्यांच्या वस्तीतून मार्गक्रमण करीत असताना, तेथील गणिकांचा आवाज कानी पडू नये म्हणून ती प्रेमळ माता होनाजीला घनश्यात सुंदरा ही भूपाळी म्हणण्यास सांगते. ‘छत्रपती शिवाजी’ (1952) मध्ये ती विजापूरच्या आदिलशाहाची बेगम साहिबा झाली होती. राजकमलच्या ‘दहेज’मध्ये तिने रंगवलेली जाँबाज सासू मला नाही वाटत दुसर्या कुणाला तशी परत रंगवता आली असती.
अमिया चक्रवर्तीच्या ‘दाग’मध्ये ती दारुड्या मुलाची (दिलीपकुमारची) प्रेमळ माता झाली होती. आजार पडून ती अंथरुणाला खिळते आणि शेवटची इच्छा म्हणून ती निम्मीला आपल्या मुलाचे आवडते गाणे ‘ऐ मेरे दिल कहीं और चल’ म्हणायला सांगते. त्यावेळेचा तो तिचा नि:शब्द अभिनय पाहण्यासारखा आहे. निरागसपणा, भाबडेपणा दर्शविण्यात राज कपूर निपुण होता; पण ‘श्री 420’ मध्ये ललित पवारनी साकार केलेली भोळीभाबडी केळेवाली क्षणभर राज कपूरचाही विसर पाडते. ‘दिल का हाल सुने जो दिलवाला’ गाण्यात राजूची (राज कपूर) ही मानलेली आई गंगामाई केळेवाली, गुडघा पोटाशी धरून ऐटीत लाकडी बाजेवर बसून अधूनमधून पान चघळत अशा काही कौतुकाने, प्रेमळ नजरेने राजूकडे पाहते की, बस्स! शेवटी गरिबांसाठी शंभर रुपयांत घर देण्याची योजना जाहीर केली जाते. गंगामाई गाठोड्यात ठेवलेल 95 रुपये व काही सुटे पैसे काढून राजूच्या हातावर ठेवत म्हणते, इस में पाच रुपये कम है, भले एक खिडकी कम लगा देना, लेकिन घर जरूर बना देना बेटे! हा उत्कट प्रसंग पाहताना डोळ्यांतून खळकन पाणी येते.

दात काढून हसणे हे वाह्यातपणाचे लक्षण आहे असे मानणारी ‘जंगली’मधील शम्मी कपूर व शशीकलाची खानदानी माता, राजेश खन्नाला बरे वाटावे म्हणून जीझसकडे करुणा भाकणारी ‘आनंद’मधील मेट्रन, ‘प्रोफेसर’मध्ये वयाला न शोभणारी विनोदी भूमिा साकार करणारी म्हातारी. अशा ललिताबाईंची कितीतरी रुपे आठवली जातात. गुजराती, भोजपुरी चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांत व्यस्त असूनही मराठी चित्रपटात काम करणे त्यांनी सोडले नाही. ‘घरचा भेदी’, ‘सतीचं वाण’, ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय झाले. सुनेला छळणारी कजाग सूस, त्यांनी काही मराठी चित्रपटांतून इतक्या सुरेखरीत्या साकारली की, चित्रपट पाहतानाही बायका त्यांचा धसका घेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेत तिने साकार केलेली मंथरा ही त्यांची शेवटची अविस्मरणीय भूमिका! ललिता पवार ही खरी हाडाची कलावंत! अभिनयाचे कसलेही प्रशिक्षण न घेता तिने केवळ सूक्ष्म निरीक्षणशक्तीच्या आणि अभिनयसामर्थ्याच्या जोरावर शेकडो व्यक्तिरेखा रंगविल्या, तहह्यात रंगदेवतेची सेवा केली. ललिता पवार या मराठी चित्रपटांपेक्ष हिंदी चित्रपटांमधून अधिक चमकल्या. हिंदीत त्या काळातील राज कपूर, जयराज, दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्ना, शम्मी कपूर, नूतन, मीनाकुमारी अशा आघाडीच्या सर्वच नामवंत कलाकारांसह त्यांनी कामे केली.
‘दाग’, ‘श्री 420’, ‘परवरीश’, ‘सुजाता’, ‘अनाडी’, ‘ससुराल’, ‘जंगली’, ‘सेहरा’, ‘लव इन टोकियो’, ‘सूरज’ आदी हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात सदैव राहणार्या आहेत. त्यांना 1961 सालचे संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक व 1977 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून ‘गृहस्थी’, ‘सजनी’, ‘अनाडी’, ‘घर बसा के देखो’ या चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. मूकपटापासून बोलपटापर्यंतच्या सात दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात चित्रपटसृष्टीत टिकून राहिलेल्या ललिता पवार हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असावं; पण दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचा कधी विचारच झाला नाही, हे त्यांच्यापेक्षा आम्हा रसिकांचे मोठे दुर्दैव आहे. हा पुरस्कार तर त्यांना तीस-चाळीस वर्षांपूर्वीच मिळायला हवा होती. त्यामुळे त्या पुरस्काराचीच शान कदाचित वाढली असती.
वयाची सत्तर उलटल्यावर ललिता पवार एकाकी झाल्या व त्यांनी मुंबई सोडून पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पुण्यात एकाकी जीवन जगत असताना त्यांनी एक-दोन मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 24 फेब्रुवारी 98 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. दुर्दैवाने त्यांच्या मृत्युसमयी त्यांच्या जवळपास कुणीही नव्हते. मृत्यूनंतर एक-दोन दिवसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांचा निष्प्राण देह आढळला. चारशेहून अधिक चित्रपटांत आपल्या कामाचा दरारा निर्माण करणारी अभिनेत्री, काळाच्या पडद्याआड अगदी शांतपणे गेली.
हिंदी चित्रपटाच्या साम्राज्यातील एक मराठी पताका फडकवत गेली.

2 Comments
Purushottam Amin
Lalita Pawar article was great
admin
Thanks for your feedback.