– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Ram Setu Movie Review. दोन वर्षांपूर्वीची दिवाळी आणि यंदाची दिवाळी यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे तर आपल्या सर्वांनाच दिसतेय. कोवीड लॉक-डाऊन मध्ये अंशतः सूट मिळाल्यानंतरही मनात धाकधूक, भीती कायम असतांना आलेली २०२० ची दिवाळी म्हणावी तशी एंजॉय करता आली नव्हती. लॉक-डाऊनने बॉलिवूडचे पार कंबरडे मोडल्यानंतर आलेल्या त्या दिवाळीत दोन घटना घडल्या होत्या ज्या एकाच व्यक्तीशी संबंधित होत्या. तो व्यक्ती होता अभिषेक शर्मा. एक घटना होती ५०% आसनक्षमतेने परवानगी मिळाल्यानंतर प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा ‘सुरज पे मंगल भारी’. आणि दुसरी घटना म्हणजे ‘राम-सेतू’ नामक आगामी सिनेमाची घोषणा. या घटनांशी अभिषेक शर्मा चा संबंध म्हणजे ‘सुरज पे मंगल भारी’ चा दिग्दर्शक अभिषेक होता आणि घोषित ‘राम-सेतू’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा अभिषेकाच्याच खांद्यावर टाकण्यात आली होती. चित्रपट छान बनलेला असूनही त्या दिवाळीत प्रेक्षक सिनेमागृहात येण्याच्या मानसिकतेत नव्हता त्यामुळे ‘सुरज पे मंगल भारी’ दुर्लक्षिला गेला. ‘राम सेतू’ चा विवाद सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर साधारण २००७ सालापासून अभिषेक च्या डोक्यात या विषयाला घेऊन एक कथानक होते ज्यावर त्याचे काम चालू होते. पटकथा पूर्ण झाल्यावर ती घेऊन अभिषेक निर्माता अक्षय कुमार ला भेटला. ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘परमाणू’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून अभिषेक मध्ये असलेले चांगल्या दिग्दर्शकासोबतच चांगल्या पटकथा लेखकाचे गुण निर्माता म्हणून अक्षय कुमारने ओळखले होते. अक्षयला ‘राम सेतू’ ची पटकथा आवडली आणि त्याने या प्रोजेक्टला नुसताच निर्माता म्हणून होकार नाही दिला तर स्वतः पुरातत्व विभागातील शास्त्रज्ञ डॉ आर्यन कुलश्रेष्ठ या कथेच्या नायकाच्या भूमिकेसाठी सुद्धा त्याने स्वीकृती दिली. मध्यंतरी दुसऱ्या लाटेत या प्रोजेक्टचे काम रखडले होते पण आज बिनधास्त मोकळा श्वास घेत सिनेमा बघायला तयार असलेल्या दिवाळीत अखेर अक्षय-अभिषेक जोडीचा ‘राम सेतू’ प्रदर्शित झालाय. 

कथानक थोडक्यात. डॉ आर्यन कुलश्रेष्ठ (अक्षय कुमार) हा भारतीय पुरातत्व विभागात काम करणारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ/संशोधक. देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक आर्यनची बायको प्रोफेसर गायत्री (नुसरत भरुचा) मात्र आस्तिक असते आणि आर्यनची देवाबद्दल असणारी सडेतोड मते तिला आवडत नसतात ज्याबद्दल अनेकदा ती आर्यनला बोलतही असते. अफगाणिस्तान दौऱ्यावरून परतलेल्या आर्यनवर भारत सरकार राम-सेतू प्रोजेक्टची जबाबदारी टाकते. भारताच्या दक्षिण समुद्रातील व्यापारी दळणवळणासाठी अडचणींचा ठरत असलेला राम-सेतूचा काही भाग तोडण्याच्या सरकारी निर्णयाच्या विरोधात काही संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली असते. राम-सेतू हा मानवनिर्मित नाही आणि त्याचे अस्तित्व रामायण कालखंडाच्याही आधीचे आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण्याची जबाबदारी आर्यन वर येऊन पडते. हे सिद्ध करतांना आर्यन रामायण एक केवळ साहित्य आहे आणि त्याचा सत्यतेतशी काही संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा सरकारच्या वतीने  सुप्रीम कोर्टात सादर करतो. या दाव्याने सरकारविरोधात आणि सोबतच आर्यन च्या विरोधात मोठा जनक्षोभ उसळतो. याची दाखल घेत सरकार आपला दावा मागे घेऊन माफी मागते आणि आर्यनला सुद्धा सेवेवरून निलंबित करते. याच दरम्यान आर्यन च्या कुटुंबियांनाही या सर्व घटनांमुळे मोठ्या रोषाला सामोरे जावे लागते. स्वतःचा दावा खरा सिद्ध कसा करावा या विवंचनेत आर्यन असतो. याचवेळी पुष्पक शिपिंग कॉर्पोरेशन च्या नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसायातील मोठा उद्योगपती (नासेर) आर्यन ला संपर्क करतो आणि राम सेतू हा मानव निर्मित नाही या आर्यन च्या दाव्याला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्याची खुली ऑफर देतो. इथून पुढे आर्यन चा प्रवास सुरु होतो तो सत्याच्या शोधात. या प्रवासात त्याची साथीदार असते डॉ सॅन्ड्रा ( जॅकवेलीन फर्नांडिस). राम सेतू हा खरोखर रामायणाच्या कालखंडात निर्माण झालाय की त्याच्याही आधी हे शोधण्यास निघालेल्या आर्यन च्या प्रवासात अनेक आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटना घडतात त्या कोणत्या आणि अंती आर्यन आपल्या दावा सिद्ध करतो की काही वेगळेच सत्य त्याच्या समोर येते हा कथेचा पुढील प्रवास जो इथे विस्ताराने सांगणे अयोग्य ठरेल. 

‘चाणक्य’ या मालिकेसाठी लोकप्रिय असलेले डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कथा-पटकथा अभिषेक शर्माची आहे पण अभिषेकने संवादलेखनासाठी डॉ चंद्रप्रकाश यांना सोबत घेतले आहे. २ तास २० मिनिटांची व्यवस्थित लांबी असलेली ही पटकथा लिहितांना  अभिषेकने प्रेक्षकांना विचार करायला अजिबात वेळ कसा मिळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. सर्वात महत्वाची आणि विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे कथानक पडद्यावर सादर करतांना दाखविण्यात आलेले गांभीर्य, प्रगल्भता आणि परिपक्वता. ‘कथानक काल्पनिक आहे आणि सत्याशी याचा संबंध नाही आणि असल्यास तो योगायोग समजावा’ असे डिस्क्लेमर आपण प्रत्येक चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटाच्या सुरुवातीला वाचतो. पण राम सेतू च्या कथानकाचा प्रवास आणि त्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला राम नावाच्या भारतीयांच्या सर्वात मोठ्या आस्थेच्या अधिक जवळ घेऊन जाणारा आहे. कथानक काल्पनिक भलेही असेल, त्याच्या सादरीकरणात असलेली प्रामाणिकता आणि लेखकाचा असलेला विषयाचा अभ्यास तुम्हाला खूप प्रभावित करतो. राम सेतू या विषयाला वाहिलेला हिंदी सिनेमातील हा पहिलाच प्रयोग असल्याने कथेत आणि त्यायोगे पटकथेत एक वेगळेपण, एक फ्रेशनेस चित्रपट बघतांना  सातत्याने जाणवतो. आणि ही चित्रपटासाठी अत्यंत जमेची बाजू आहे. एक नास्तिक असा इतिहास संशोधक वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे सत्य स्वीकारत आस्तिक कसा होतो हे लेखक दिग्दर्शक अभिषेकने खात्री पटेल अशा पद्धतीने दाखवले आहे. यात रामायणात उल्लेख असलेल्या बाबींचा/घटनांचा/पात्रांचा थोडक्यात अशा सर्व आस्थांशी निगडीत पुराव्यांचा प्रवास राम सेतू बघतांना होतो. असा प्रयोग खरंतर खूप कठीण असतो. परंतु हा प्रयोग कुठेही हास्यास्पद न होता टिपिकल फिल्मी मसाला एंटरटेनमेंट च्या ढोबळ मार्गाने जात नाही हे विशेष. थोडक्यात राम सेतू हा जसा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्या श्रद्धेला लेखक दिग्दर्शक अभिषेक शर्माने या चित्रपटात तितक्याच संवेदनशीलतेने हाताळले आहे. डॉ चंद्रप्रकाश यांच्या सोबतीने त्याने  लिहिलेले संवाद सुद्धा अत्यंत परिणामकारक आहेत. या संवादातून स्वतः अभिषेक चा आणि डॉ चंद्रप्रकाश यांचा विषयावरील अभ्यास दिसून येतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये ठेवलेले सरप्राईज तर झक्कास आहे. मला वैयक्तिक या सरप्राईज ची कुणकुण सिनेमा बघतांना लागली होती, इतरांनाही लागू शकते पण असे असूनही ते सरप्राईज प्रेक्षकांना अखेरीस एक वेगळाच आनंद मिळवून देते. 

असीम मिश्रा यांचे छायांकन खूपच सुंदर. व्हीएएफएक्स च्या मदतीने असीम मिश्रा यांनी चित्रित केलेली, पाण्याखालची राम-सेतू दाखविणारी रोमांचकारी दृश्ये तर मस्तच जमली आहेत. संगीत आणि पार्श्वसंगीत या दोन्ही विभागात मात्र चित्रपट कमी पडला आहे. कथेत गाण्यांची तशी आवश्यकता भासत नाही आणि दिग्दर्शकाने त्यात वेळही घालवला नाही पण डॅनियल जॉर्ज यांचे  पार्श्वसंगीत मात्र काहीसे नाराज करते. अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमार संशोधकाच्या गेट-अप मध्ये दिसलाय छान आणि वावरलाय पण सुंदर. अक्षयला या प्रवासात मार्गदर्शन करणारा एपी या प्रमुख भूमिकेत अभिनेता सत्यदेव याचा सुंदर आणि सहज अभिनय लक्षवेधी आहे. इतर कलाकारांमध्ये जॅकवेलीन आणि नुसरत दोघींचेही काम ठीक आहे. दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते नासीर आणि अभिनेता प्रवेश राणा यांच्या पात्राला असलेली खलनायकाची धार थोडी कमी पडली आहे असे वाटते. 

बॉलिवूड वेगळे विषय आणत नाही अशी नेहमीच ओरड असते. राम सेतू हे त्यावर असलेले उत्तर आहे. लॉक-डाऊनमध्ये पुनश्च प्रसारित रामायण मालिकेने पुन्हा एकवार लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. प्रभू श्रीरामावर असलेल्या आपल्या सर्वांच्या श्रद्धेला अधोरेखित करणारा राम सेतू हा त्याच लॉकडाऊनमध्ये घोषित झाला होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सहपरिवार आनंद घेण्यालायक हा प्रयोग निश्चित आहे. नक्की बघा. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.