– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Dharmaveer Movie Review
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी … 
साल २००१. ठाण्यात शहरभर गणेशोत्सवाची धूम चालू असते. दिवसभर विविध कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा घरी परतलेल्या, ठाणेकरांसाठी दैवतासमान असलेल्या, आनंद दिघे साहेबांना ‘अजून एक आरती बाकी आहे आणि आपल्याला तिथे जायलाच हवे’ असं जेंव्हा कार्यकर्ते सांगतात, तेंव्हा साहेबांचा ड्रायव्हर आणि साहेब दोघेही थकलेले असतात. पण आपली कोणी तरी आतुरतेने वाट बघतंय आणि त्याचं मन मोडावं तरी कसं म्हणून  हळव्या मनाचे दिघे साहेब तसेच परत निघतात. जातांना गाडीतल्या टेप रेकॉर्डरवर वरील भातुकलीच्या खेळामधली हे गाणे चालू असते. संगीतप्रेमी दिघे साहेबांचे ते आवडते गाणे असते. साहेब ते गाणं गुणगुणतात. ड्रायव्हर कुतूहलाने विचारतो, ‘साहेब तुम्हाला हे गाणं एवढं का आवडतं ?’ साहेब उत्तर देतात, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अधुरी कहाणी असतेच रे!’ बहुधा नियतीच्या मनात त्या काळरात्री हे गाणं खरं करून दाखवू यात असंच काहीतरी असतं. गाडी कार्यकर्त्याचे घरच्या दिशेने जात असतांना थोड्या अंतरावर ड्रायव्हर ला काही सेकंदाची डुलकी लागते आणि दुर्दैवाने अपघात होतो. पाय फ्रॅक्चर होतो. इलाज सुरु असतात. जगण्याची आशा कायम असते. पण दबा धरून बसलेला काळ पुन्हा घात करतो आणि ह्र्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने साहेबांचा अवघ्या ५० वर्षांचा डाव शब्दशः अर्ध्यावर मोडतो…  

ठाण्याचा वाघ, ठाणेवासीयांच्या देवघरातील देव, धर्मवीर अशा अनेक विशेषणांनी ओळखले जाणारे शिवसेनेचे ८०-९० च्या दशकातील दिग्गज नेते कै आनंद दिघे यांच्या आयुष्याचा वेध घेणारा धर्मवीर हा प्रवीण तरडे दिग्दर्शित चित्रपट आज प्रदर्शित झालाय. नुकत्याच ज्याने दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे अशा अष्टपैलू अभिनेता प्रसाद ओक याने यात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलर बघून माझ्या ३ अपेक्षा होत्या. पहिली टिझर आणि नंतर आलेल्या ट्रेलरमध्ये प्रसादचा गेट-अप, वेशभूषा, त्याचे लुक्स, मॅनेरिझम बघून सिनेमा कसा का असेना पण प्रसादने धमाल केलेली असणार असा अंदाज बांधला होता. दुसरी  प्रवीण तरडे दिग्दर्शित असल्याने व  बायोपिक असला तरी करमणूकप्रधान व्यावसायिक चित्रपट असल्याने, चित्रपटाला मसाल्याचा तडका सुद्धा मारलेला असणार हेही ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसत होते. मनोमन तिसरी अपेक्षा एवढीच होती की या चित्रपटाची निर्मिती टिपिकल राजकीय प्रसार करण्यासाठी केलेली नसावी. माझ्या या ३ अपेक्षांपैकी पहिल्या २ अपेक्षांना चित्रपटाने खरे ठरवले पण तिसऱ्या अपेक्षेवर म्हणजे राजकीय प्रसार नसावा यावर मात्र निराशा झाली. एखाद्या राजकीय व्यक्तीवर असलेल्या बायोपिक कडून १००% अशी अपेक्षा करणे हेही चुकीचेच आहे म्हणा. पण आनंद दिघे याला अपवाद होते म्हणून ती अपेक्षा होती. आनंद दिघे हे जर केवळ राजकारणी असले असते तर आज २० वर्षांनी ठाणेकर त्यांना एव्हाना पूर्ण विसरले असते. पण हा अवलिया माणूस केवळ राजकारणी नव्हता. ठाणेकरांच्या हितासाठी अख्खे आयुष्य वेचणारा असा हा प्रचंड धर्माभिमानी नेता आजही ठाणेकरांच्या हृदयात एखाद्या देवाप्रमाणे कायमचे घर करून बसलेला आहे. असो. चित्रपटाचा हेतू काय आहे याविषयी इथे प्रश्न उपस्थित करणे असेही अपेक्षित नाही. त्यामुळे एक कलाकृती म्हणून त्याचा घेतलेला हा आढावा. 

ठाणे शहरातील शिवसेनेच्या उभारणीपासूनचा एक तरुण कार्यकर्ता ते नंतर सर्वेसर्वा हा आनंद दिघे यांचा प्रवास जवळपास ३ तासांच्या लांबीतून कथा-पटकथा-संवाद व दिग्दर्शन अशा चारही बाजू सांभाळत प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांसमोर मांडला आहे. त्यामुळे चित्रपट बघतांना आजच्या प्रेक्षकांना दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूंचे दर्शन यात होते. दिघे यांच्या विषयी माहिती असलेली त्यांच्या काळची पिढी आज जवळपास सत्तरीच्या घरात पोहोचली असल्याने आजच्या पिढीच्या प्रेक्षकांना (ठाणे शहरातील रहिवाशी वगळता) दिघे साहेबांविषयी फारशी माहिती नसणार हे गृहीत धरून प्रवीण तरडे यांनी पटकथा लेखन केले आहे ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. 

असे असूनही मध्यंतरापर्यंत कथानकाची वाटचाल काहीशी लडखडत, अनिश्चित दिशेने व उरकल्यासारखी झाल्याचा फील येतो. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाने, विचारांनी, भाषणांनी प्रभावित होऊन दिघेंनी शिवसेनेत प्रवेश केला हे वास्तव सुरुवातीच्या रिळात कुठेच आलेले नाही. दिघे साहेबांनी सुरवातीला विद्यार्थी सेनेची जबाबदारी स्वीकारली. त्याचवेळी ‘दि मेरीट’ हे साप्ताहिक ते संपादित करत असत. शिवसेनेचे मोर्चे, बंद, आंदोलने, मेळावे यात ते आग्रेसर भूमिका घेत हे वास्तव अधोरेखित न होता थेट भिवंडी अथवा इतरत्र झालेल्या धार्मिक दंगलीत मुस्लिम समाजात त्यांच्याविषयी असलेल्या धाकाने हिंदू ठाणेकरांना कसे संरक्षण मिळाले यावरच सुरुवातीची बरीचशी रिळे दिग्दर्शकांनी खर्चली आहेत. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत झालेला दगाफटका, त्यातून झालेली शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या, त्यात दिघेंचा सहभाग असल्याचा संशय आणि त्याचा दोन वर्षे चाललेला खटला, त्यांना लावलेला टाडा यात दिग्दर्शकाने नको इतका वेळ खर्च केला आहे. मध्यंतरानंतर मात्र चित्रपट बऱ्यापैकी वेग घेतो आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मात्र मध्यंतरानंतर सुद्धा एका विशिष्ट राजकीय नेत्याभोवती घुटमळणारे कथानक, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात ठाण्यातून कोणाला उमेदवारी द्यायची यावर दिघेंनी आखलेले डावपेच याला पटकथेत अवास्तव महत्व दिले गेले आहे. त्यांच्या राजकीय आयुष्यातील दृश्यांपेक्षा ठाण्यातील एका युवतीवर झालेला बलात्कार आणि नंतर तिने केलेली आत्महत्या या प्रकरणात दिघे साहेबांनी युवतीच्या आई-बापाला मिळवून दिलेला न्याय आणि डान्स-बार प्रकरणात त्यांच्या मदतीने नागरिकांना मिळालेला दिलासा, राखी पौर्णिमेला शेकडो बहिणींनी बांधलेल्या राख्या व  केलेले औक्षण हे प्रसंग बघायला फिल्मी वाटत असले तरी जास्त जवळचे वाटतात. दिघे साहेबांना अटक झाल्यावर ठाण्याच्या रस्त्यांवर शाळकरी मुलांचा प्रचंड मोठा मोर्चा चित्रपटात दाखवलाय पण या शाळकरी मुलांचे दिघे काका इतके जवळचे कसे झाले याबद्दल कुठेच उल्लेख नाही.  टेंभीनाक्यावरील कार्यालयात दिघे साहेबांनी वास्तव्यात सुरवात केली तेव्हा त्यांनी तेथे एक फ्रेम केलेली पाटी लावलेली होती जी चित्रपटात दाखविली आहे. त्यामध्ये ठळकपणे मजकूर आहे.

शाखा हेच माझे घर
रात्रंदिवस साथ देणारे शिवसैनिक
हेच माझे बंधू. 

समस्या घेऊन येणारे नागरिक माझे आप्तेष्ट आणि त्यांची समस्यांची सोडवणूक हेच माझे ऐश्वर्य ! 

दिघेंच्या या ध्येयाला अनुसरून चित्रपटाची पटकथा या पाटीभोवती  जास्त प्रभावीपणे गुंफली असती तर जास्त बरे वाटले असते. प्रसाद ओक यांच्या मेक-अप आणि एकंदरीत गेट-अप मध्ये सर्व काही छान असले तरी एक खटकलेली बाब. आजही तुम्ही गुगल करून बघा, आणि ठाणेकरांच्या तर अजूनही लक्षात असेल, दिघे साहेबांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि सात्विकता दिसायची. इथे चित्रपट सुरु झाल्यापासून ते अखेरपर्यंत प्रसाद ओक कायम चिडलेला, हिंसक व असमाधानी दिसून येतो. यामागे चित्रपटाच्या नायकाला अँग्री यंग मॅन दाखविण्याचा व्यावसायिक हट्ट हे एकमेव कारण दिसते. मला तर तो बऱ्याचदा ‘पुष्पा’ सारखा भासत होता. हे ठरवून केले असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांचे प्रसाद यांच्या व इतर सर्व कलाकारांच्या परफेक्ट गेट-अप साठी विशेष कौतुक. बाकी प्रसादने देहबोली आणि संवादफेकीवर घेतलेली मेहनत याला तोड नाही. हॅट्स ऑफ टू हिम! इतर कलाकारांपैकी मकरंद पाध्ये यांनी रंगविलेले बाळासाहेब ठाकरे, क्षितीश दाते याने रंगविलेले एकनाथ शिंदे, विजय निकम यांनी साकारलेले मो.दा. जोशी हे लक्षात राहतात. कथानकाच्या नॅरेशन साठी म्हणून माध्यम असलेल्या पत्रकार तट्टम च्या भूमिकेत श्रुती मराठे व रिक्षा ड्रायव्हर समीर म्हणून गश्मीर महाजनी यांनी सुद्धा चांगले काम केले आहे. शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख म्हणून बिरजे बाईंच्या भूमिकेत स्नेहल तरडे यांचे कामही छान झाले आहे. संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी व्यवस्थित सांभाळली आहे. गुरुपौर्णिमेचं गाणं आणि चित्रपटाचे शीर्षक गीत छान जमले आहे. छायांकन, पार्श्वसंगीत, ऍक्शन दृश्ये व इतर तांत्रिक याबाबतीत चित्रपट उजवा आहे. चित्रपटाची लांबी कमी करता आली असती तर एकंदरीत चित्रपट जास्त परिणामकारक झाला असता. 

एकंदरीत या चित्रपटाच्या माध्यमातून एखाद्या ठराविक व्यक्तीचा राजकीय प्रचार/प्रसार या बाबीकडे दुर्लक्ष केले तर करमणूक म्हणून धर्मवीर फारशी निराशा करत नाही. शिवाय आनंद दिघे यांच्या बाबतीत काहीच माहिती नसलेल्या आजच्या पिढीला थोडंफार तरी ज्ञान मिळेल या उद्देशाने धर्मवीर एकदा बघण्यास हरकत नाही.  

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.