-अजिंक्य उजळंबकर 

ओटीटी या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर आतासातत्याने काहीतरी अजीब बघण्याची हौस असलेला नवा प्रेक्षक निर्माण झाला आहे. किंबहुना तो जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. सेन्सॉरशिप नसल्याने (आता आली असली तरी तिचा परिणाम दिसायला अजून काळ लोटावा लागेल) डार्क जॉनर नावाखाली कुठलीच नीतिमत्ता न जुमानणारा हिंसक, स्वैराचारी व व्याभिचारी समाज व त्याच्याशी निगडीत कथा यांची प्रचंड मोठी लाट आता नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिस्ने हॉटस्टार, अल्ट बालाजी, एमएक्स प्लेयर व इतर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या किनाऱ्यावर रोजाना धडकत असते. अशाच चार वेगवेगळ्या अजीब कथांचे दर्शन घडविणारा अजीब दास्तान्स (Ajeeb Daastaans ) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला आहे. 

अजीब दास्तान्स मधील मजनू (Majnu), खिलौना (Khilauna), गिली पुच्ची (Geeli Pucchi) व अनकही (Ankahi) या चार कथांचे दिग्दर्शन अनुक्रमे शशांक खेतान (Shashank Khaitan), राज मेहता (Raj Mehta), नीरज घेवान (Neeraj Ghaywan) व कायोझे इराणी (Kayoze Irani) यांनी केले आहे. चारही कथांबद्दल सविस्तर लिहायला गेल्यास माझे शब्द व तुमचा वेळ खूप जाईल. त्यामुळे थोडक्यात विवेचन केलेलं उत्तम. 

‘बद्रीनाथ कि दुल्हनिया’ व ‘हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया’ या सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक शशांक खेतान यांनी ‘मजनू’ या कथेचे दिग्दर्शन केले आहे. ही पहिलीच कथा चार कथांमध्ये सर्वात दुबळी असलेली कथा आहे. फातिमा सना शेख व जयदीप अहलावात या दोघांचाही अभिनय अत्यंत सुमार दर्जाचा आहे. एखाद्या सी ग्रेड सिनेमाला शोभतील असे संवाद व शिवीगाळ या कथेत आहे. 

‘गुड न्यूज’ (अक्षय कुमार, करीना कपूर) सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेली दुसरी कथा आहे ‘खिलौना’. नुश्रत भरुचा व अभिषेक बॅनर्जी यांचा प्रभावी अभिनय असूनही कथेचा शेवट अतिशय अनाकलनीय रीतीने व धक्कादायक पद्धतीने केल्याने चार कथांमध्ये सर्वात ‘अजीब-ओ-गरीब’ अशी ही कथा आहे. 

चारपैकी सर्वात जास्त प्रभावी म्हणजे तिसरी कथा ‘गिली पुच्ची’. कोंकणा सेन व आदिती राव हैदरी (Konkona Sen and Aditi Rao Hydari) यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या कथेचे दिग्दर्शन नीरज घेवान (२०१५ चा विकी कौशल-रिचा चड्ढा अभिनीत ‘मसान’ साठी ओळखला जाणारा) ने केले आहे. यात नीरज ने दोन समलैंगिक मैत्रिणीची कथानक दाखवितांना, समाजातील व खासकरून कामाच्या ठिकाणी असलेली जाती व्यवस्थेवरही कटाक्ष टाकला आहे. उत्तम कथा/पटकथा, कोंकणा व आदितीने केलेला उत्कृष्ट अभिनय व नीरज चे उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे ही दास्तान अजीब वाटत असली तरी सत्याच्या जवळ जाणारी वाटते..प्रभावी वाटते. 

चौथी कथा शॉर्ट आणि सिम्पल आहे. ‘अनकही’. नावाप्रमाणेच काही न बोलता बरेच काही बोलून जाणारी छोटीसी प्रेमकथा. अभिनेते बोमन इराणी यांचे सुपुत्र कायोझे इराणी ने याचे दिग्दर्शन केले आहे. शेफाली शाह व मानव कौल यांनी रंगविलेल्या पात्रांमध्ये अचानक निर्माण होणारे आकर्षण, प्रेम व जवळीक हे दाखवितांना आवश्यक असलेली संवेदना कायोझे च्या दिग्दर्शनात स्पष्टपणे दिसून आली आहे. कथेचा शेवट अतिशय प्रभावी आहे. 

ajeeb daastaans

इथे मी जाणूनबुजून कुठल्याही कथेची पुसटशी कल्पनाही रसिकांना देत नाहीए. त्या प्रत्यक्ष बघणे जास्त परिणामकारक ठरेल. चार कथांची मिळून एकूण लांबी २ तास २२ मिनिटांची आहे. त्यातही सुरुवातीच्या दोन कथा प्रभावी नसल्या तरी तुम्हाला पहिल्यांदा बघतांना खिळवून ठेवतील इतक्या फास्ट पेस्ड आहेत. निर्माता कारण जोहरच्या निर्मिती संस्थेद्वारे निर्मित या कथा म्हणजे आपल्या जुन्या सुपरहिट गाण्याला तंतोतंत खऱ्या ठरवितात हे नक्की… ते गाणे  म्हणजे…   

“अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ ख़तम,

ये मंजिले है कौनसी, न वो समझ सके ना हम …” 

खात्री करून घ्यायची असेल तर एकदा पहा आणि मग हे गाणे गुणगुणा. खात्री पटेल. 

Ajeeb Daastaans Trailer- 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment