– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bhool Bhulaiyaa 2 Movie Review. आजच्या दिवशी ११ वर्षांपूर्वी, म्हणजेच २० मे २०११ रोजी हिंदी सिनेरसिकांनी कार्तिक आर्यन हे नाव रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा वाचले होते. हो, आजच्या दिवशी प्यार का पंचनामा रिलीज झाला होता. कार्तिकच्या पदार्पणाचा सिनेमा ज्याने तरुणाईला भुरळ पाडली होती. गेल्या ११ वर्षात कार्तिक चे अगदीच मोजके म्हणजे मोजून ११ सिनेमे प्रदर्शित झाले आहेत आणि तरीही या नावाने आजच्या तरुणाईमध्ये कमालीची हवा निर्माण केली आहे हे विशेष. आज बरोबर ११ वर्षांनी कार्तिक चा १२ वा सिनेमा प्रदर्शित झालाय. भूल भुलैय्या-२. १५ वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या व आजही टेलिव्हिजन माध्यमावर सर्वात जास्त रिपीट ऑडियन्स खेचणारा एव्हरग्रीन भूल भुलैय्या चा हा दुसरा भाग. कॉमिक सस्पेन्स हॉरर या जॉनर मध्ये मोडणाऱ्या पहिल्या भूल भुलैय्या चे दिग्दर्शन प्रियदर्शन यांचे होते तर आज प्रदर्शित दुसऱ्या भागाचे दिग्दर्शक आहेत अनिस बाझमी. अर्थातच पहिल्या भागात कमाल केलेल्या अक्षय कुमार सोबत आता कार्तिक ची तुलना होणार. पण असे जरी झाले आणि अक्षय च्या तुलनेत कोणाला कमी जरी वाटला तरी कार्तिक या दुसऱ्या भागात बऱ्यापैकी भाव खाऊन गेलाय हेही तितकेच खरे. 

सस्पेन्स चा उलगडा न करता कथानक थोडक्यात. रुहान रंधावा (कार्तिक आर्यन) आणि रीत ठाकूर (कियारा अडवाणी) या दोघांची मनाली हुन आपल्या गावी राजस्थान मध्ये परत येत असतांना प्रवासात ओळख होते. दोघांची चांगली मैत्री होते. रीत चे लग्न ठरले आहे आणि त्यासाठी तिला घरी परत यायचे आहे. रुहान च्या आग्रहाखातर मनाली येथील एका म्युझिक फेस्टिव्हल साठी रीत आपली परतीची बस चुकवते व नेमका त्याच बस चा अपघात होऊन सारे प्रवासी मृत्युमुखी पडतात. मी मेलेली नाही, जिवंत आहे हे सांगण्यासाठी रीत जेंव्हा घरी आपल्या बहिणीला फोन करते तेंव्हा रीत चा आवाज तिच्या बहिणीपर्यंत काही पोहोचत नाही पण एक सत्य ऐकून रीत ला धक्का बसतो. ते सत्य म्हणजे ज्या मुलासोबत रीत चे लग्न ठरलेले असते त्याचे आणि रीत च्या बहिणीचे एकमेकांवर प्रेम असते. बहिणीला तिचे प्रेम मिळावे म्हणून रीत रुहान च्या मदतीने आपण जिवंत आहोत हे घरच्यांपासून लपवून ठेवते. रीत रुहान ला सोबत घेऊन स्वतःच्या गावी परतते खरी पण घरी न जाता त्यांच्या गावी त्यांचीच एक जुनी हवेली असते तिथे येऊन थांबते. या हवेलीत मंजुलिका नामक एका प्रेत आत्म्याचा वावर असल्याने ही हवेली कित्येक वर्षांपासून बंद असते. हवेलीत कोणीतरी आत गेलं आहे हे कळल्यावर रीत च्या घराचे सर्व तिथे पोहोचतात तेंव्हा त्यांची भेट रुहान सोबत होते जो त्यांना हे सांगतो की ‘मी रीत चा मित्र आहे आणि रीत चा मृत्यू झालाय आणि आता या हवेलीत माझ्या सोबत रीत चा आत्मा पण आलाय.’ असे सांगण्यामागे रीत आणि रुहान चा काय प्लॅन असतो? हवेली मध्ये असलेली मंजुलिका ची आत्मा कोणाची असते? अखेरीस या सर्वातून सर्वांची सुटका कशी होते हे सर्व पडद्यावर पाहिलेले उत्तम. 

कथा-पटकथा आहे आकाश कौशिक यांची. आकाश कौशिक यांच्यासोबत संवादांचे श-लेखन केले आहे फरहाद सामजी यांनी. सुरुवातीलाच यांचे नाव घेण्याचे कारण म्हणजे आकाश कौशिक यांनी लिहिलेली फास्ट पेस्ड कथा-पटकथा आणि त्याला भन्नाट साथ देणारे विनोदी संवाद हे या सिनेमाचे खरे हिरो आहेत. मध्यंतरापर्यंत कमालीच्या वेगाने कथानक धावते. इंटरव्हल पॉईंट ला आणलेला ट्विस्ट परफेक्ट. मध्यंतरानंतर काही ठिकाणी पटकथेत कच्चे दुवे आहेत, काही ठिकाणी पेस पण स्लो होतो पण असे असले तरीही सिनेमा तुम्हाला एंटरटेनमेंट मध्ये कमतरता भासू देत नाही. मध्यंतरानंतर राजपाल यादव, संजय मिश्रा आणि अश्विनी काळसेकर यांचा कॉमेडी ट्रॅक तुम्हाला फुल्ल्टू हसवतो. अनिस बाझमी यांचे दिग्दर्शन फर्स्ट रेट. कॉमेडी हा अनिस बाझमी यांचा गेल्या १७ वर्षांपासूनचा हक्काचा प्रांत आहेच पण त्यांनी यावेळी जोडीला आणि प्रथमच सस्पेन्स हॉरर हा जॉनर हाताळला आहे. त्यातही ते डिस्टिंक्शन मार्काने पास झाले आहेत असे म्हणावे लागेल. चित्रपटाची एकूण लांबी केवळ २ तास २० मिनिटांची आहे हा सर्वात मोठा प्लस पॉईंट. प्रीतम आणि तनिष्क बागची यांचे संगीत आजच्या तरुणाईला आवडेल असे आहे. खासकरून रिमिक्स टायटल ट्रॅक आणि मेरे ढोलना हे मंजुलिका चं गाणं. संदीप शिरोडकर यांचे बीजीएम म्हणजेच पार्श्वसंगीत तुम्हाला खूप ठिकाणी घाबरवते. छायांकन, संकलन, ऍक्शन, स्पेशल इफेक्टस आणि इतर तांत्रिक बाबतीत चित्रपट खूपच उजवा आहे. 

आता अभिनयाच्या बाबतीत. कार्तिक आर्यन एकदम झक्कास. अक्षय कुमार सोबत त्याची चालना करणे हे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे होईल पण तसे झाले तरी कार्तिक तुम्हाला प्रेमात पाडतोच. एकदम नैसर्गिक. या चित्रपटानंतर आधीच खूप मोठ्ठी असलेली कार्तिक ची फॅन फॉलोविंग अजून दुपटीने वाढेल. कार्तिक नंतर किंवा त्याच्याही आधी जिचे नाव घ्यावे लागेल ती म्हणजे हिंदी सिनेमाची कमालीची अभिनेत्री तब्बू. भूल भुलैय्या-२ चे सरप्राईज पॅकेज. काय बोलावे तिच्या अभिनयाबद्दल. खाल्ला आहे तिने सिनेमा. मला तर बऱ्याच ठिकाणी तब्बूचा अभिनय बघतांना आणि पुरुषी आवाज ऐकतांना अभिनयसम्राज्ञी रेखा ची आठवण येत होती. जबरदस्त. कियारा चा अभिनय ठीक पण ती दिसली आहे खूप सुंदर. इतर कलाकारांमध्ये कमाल केली आहे राजपाल यादव, संजय मिश्रा आणि अश्विनी काळसेकर यांच्या धम्माल विनोदी अभिनयाने. मस्तच. राजेश शर्मा यांनी रंगविलेले चाचा जी पण छान जमलेत. मिलिंद गुणाजी व गोविंद नामदेव ठीक.  समर्थ चव्हाण नावाच्या बाल कलाकाराने मजा आणली आहे. 

असं फार कमी वेळा होतं की पहिल्या भागाकडून अपेक्षा वाढलेल्या असल्यावर आलेला दुसरा भाग पण तुमची छान करमणूक करून जातो. पण इथे ते शक्य झालंय ज्याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत कथा-पटकथाकार आकाश कौशिक, दिग्दर्शक अनिस बाझमी, कार्तिक आर्यन आणि तब्बू. या सर्वांसाठी आणि उन्हाळ्या सुट्टीतील छान करमणुकीसाठी एकदा नक्की बघावा असा भूल भुलैय्या-२. एन्जॉय. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment