– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bholaa Movie Review

कथानक थोडक्यात – १० वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या भोला (अजय देवगण) या खतरनाक कैद्यावर जेलच्या बाहेर आल्यावर अचानकपणे एक वेगळीच जबाबदारी येऊन पडते. भोला खरंतर आपल्या कधीही न भेटलेल्या मुलीला अनाथालयात भेटण्यास निघालेला असतो परंतु मध्येच एसीपी डायना जोसेफ (तब्बू) या भोलावर एक जीवघेणी जबाबदारी टाकतात. आयजी (किरण कुमार) यांच्या रिटायरमेंट च्या पार्टीत, ड्रग्ज डीलर अश्वत्थामा (दीपक डोब्रियाल) हा नार्कोटिक्स डिपार्टमेंट मधील अधिकारी देवराज (गजराज राव) व एका फितूर पोलिसाच्या मदतीने ३०/४० पोलिसांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करवतो. या सर्व पोलिसांना काही वेळात वाचवले गेले नाही तर सर्वांच्या जीवाला धोका असतो. एसीपी डायनाच्या मदतीला कोणीच नसते आणि त्यावेळी तिला भोला ची मदत घेण्यावाचून पर्याय नसतो. भोला ही मदत का करतो? अश्वत्थामा हा सापळा का रचतो? प्रदेशातील गुंडांच्या सर्वच्या सर्व गँग्ज या एसीपी डायना आणि भोला च्या मागावर का असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत सिनेमा पुढे सरकत जातो. सर्व कथानक संपल्यावर सुद्धा एका अनपेक्षित धक्क्याने आणि पुढील भागाच्या घोषणेने चित्रपटाचा शेवट होतो. हे सर्व इथे अर्थातच विस्ताराने सांगणे योग्य होणार नाही.

काय विशेष?- ‘विक्रम’ आणि ‘मास्टर’ या दाक्षिणात्य सिनेमांच्या आधी ज्या सिनेमाने दिग्दर्शक लोकेश कनगराज ला मोठ्या प्रमाणात ओळख मिळवून दिली त्या ‘कैथी’ या २०१९ साली प्रदर्शित तामिळ सिनेमाचा ‘भोला’ हा अधिकृत रिमेक आहे. २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कैथी’ ने १०० कोटींच्यावर गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड कमाई केली होती शिवाय सिनेमाला आणि हिरो कार्थी ला तामिळ इंडस्ट्रीतील अनेक अवॉर्ड्स सुद्धा मिळाले होते. ऍक्शन, छायांकन, पटकथा आणि दिग्दर्शन हे ‘कैथी’ चे प्लस पॉईंट्स होते. अजय देवगणने (निर्माता व दिग्दर्शक या नात्याने) रिमेक बनवितांना या सर्व डिपार्टमेंट्स मध्ये तितक्याच मेहनतीने काम केले आहे. ‘कैथी’ च्या कट्टर चाहत्यांना सुद्धा हा सिनेमा निराश करणार नाही याची अजयने खूप काळजी घेतली आहे हे विशेष. ‘कैथी’ च्या मानाने इथे ‘भोला’ आणि त्याच्या मुली मधील इमोशनल बॉण्ड हा ट्रॅक काहीसा बॅक सीट वर आहे. फ्रंट सीटवर आहे ऍक्शन दृश्ये आणि स्पेशल व्हिज्युअल इफेक्टस. व्हिज्युअल इफेक्टस मधील मेरिट काहीसे कमी दर्जाचे असल्याचे बघतांना जाणवते परंतु ऍक्शन मध्ये असलेला पंच इतका जोरदार आहे की प्रेक्षक अगदी सहजतेने त्या दर्जाकडे दुर्लक्ष करतो. अत्यंत वेगवान पटकथा आणि प्रभावी दिग्दर्शन या दोन्ही जमेच्या बाजू आहेत. केजीएफ फेम रवी बसरूर यांचे पार्श्वसंगीत प्रभावी आहे पण काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त लाऊड झाले आहे. अजय देवगण चा कमालीचा अभिनय आणि त्याने नेहमीप्रमाणे घेतलेली ऍक्शन साठीची मेहनत अगदी दिसून येते. तब्बू ने पोलीस अधिकारी डायना चा रोल तितक्याच सहजतेने साकारला आहे. हवालदार यादव च्या भूमिकेत अभिनेता संजय मिश्रा ने कमाल केली आहे. खलनायक अश्वत्थामा च्या भूमिकेत दीपक डोब्रियाल ने चार चांद लावले आहेत.

नावीन्य काय?- रिमेक असल्याने कथानकात काही नावीन्य नाही परंतु ओरिजिनल कैथी पेक्षा काही ऍक्शन दृश्यात भोला बाजी मारून जातो. यातील काही ऍक्शन दृश्ये अत्यंत पाशवी व क्रूरतेकडे झुकणारी आहेत.

कुठे कमी पडतो? – संवाद. भोला हा ‘आउट अँड आउट’ मासेस साठी बनवलेला सिनेमा आहे. त्यामुळे मासेसने ज्यावर टाळ्या आणि शिट्ट्या माराव्यात असे फायरी डायलॉग्ज सिनेमात खूपच कमी आहेत. पटकथेत अनेक ठिकाणी अशा संवादांना जागा असूनही अंकुश सिंग, आमिल खान, श्रीधर दुबे आणि संदीप केवलानी या चौघा पटकथाकारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ‘नजर लग जायेगी’ हे इर्शाद कामील लिखित गीत सुश्राव्य आहे पण हिट नाही. भोला चे शीर्षक गीत सुद्धा फारसा प्रभाव टाकू शकत नाही. बॅकग्राउंड मध्ये वापरलेला ट्रॅक ‘आज फिर जिनेकी तमन्ना है’ मात्र ऐकायला छान वाटतो. प्रभाव ना पाडू शकणारे संवाद आणि सुपरहिट म्युझिक चा अभाव हा भोला ला मासेस साठी एक संपूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज बनविण्यापासून रोखतात. छायांकन आणि ऍक्शन दृश्यांसाठी म्हणून चित्रपट ३डी मध्ये असला तरी चित्रपटभर या ३डी चा अतिरिक्त प्रभाव जाणवत नाही. 

पहावा का?- हो. निश्चितपणे. नाही थिएटरमध्ये जमलं तर ओटीटी वर येईल तेंव्हा. अगदी कैथी च्या कट्टर चाहत्यांना सुद्धा निराशा पदरी पडणार नाही इतकी काळजी अजयने घेतली आहे.

स्टार रेटींग – ३ स्टार आणि वर अर्धा ‘कैथी’ चा आत्मा कायम ठेवल्याबद्दल.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment