– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Ghar Banduk Biryani Movie Review

कथानक थोडक्यात – राया पाटील (नागराज मंजुळे) हा एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, निर्भीड आणि समाजातील खल प्रवृत्तींना आळा घालणारा ‘सिंघम’ स्टाईल पोलीस अधिकारी. एका मोठ्या राजकारण्याच्या मुलांना हाण की बडीव केल्यामुळे त्याची ट्रान्स्फर पुण्याहून थेट कोलागड या नक्षलग्रस्त भागात होते. राया पाटील च्या सततच्या बदलण्यांना आणि प्रामाणिक वागणुकीला कंटाळलेली त्याची बायको (दीप्ती देवी) त्याला घटस्फोट देण्याच्या तयारीत असते. कोलागड च्या नक्षली जंगलाचा कमांडर आहे पल्लम (सयाजी शिंदे). पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याची प्रेयसी मारिया (श्वेतांबरी घुटे) हिचा मृत्यू होतो. याच नक्षली भागात एका ढाब्यावर काम करणारा राजू (आकाश ठोसर) हा एक उत्तम आचारी आहे आणि त्याच्या हातची बिरयानी खूपच फेमस असते. राजुचे प्रेम असते लक्ष्मी (सायली पाटील) वर परंतु राजू कडे राहायला घर सुद्धा नसल्याने लक्ष्मीच्या वडिलांचा या दोघांच्या लग्नाला नकार असतो. शासनाने आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी काही पैसे आणि मोफत घर योजना आणलेली असते. एकदा योगायोगाने पल्लम आणि त्याची गॅंग राजुने बनवलेली आणि अगदी मारियाच्या हातची चव असलेली बिरयानी खातात आणि सरळ राजुला उचलून आपल्या कॅम्पवर नेतात. राजू ला स्वतःचे घर हवे आहे, राया पाटील ला स्वतःचे घर वाचवायचे आहे, पल्लम ला राजुच्या हातची बिरयानी हवी आहे आणि या सर्वांमध्ये पोलिसांची आणि नक्षल्यांची बंदूक आहे. यातून ही सर्व पात्रे कशी मार्ग काढतात हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- नागराज अण्णा आल्यापासून मराठी सिनेमांमध्ये एका नवा जॉनर आला आहे. तो म्हणजे अर्थातच नागराज जॉनर. जमिनीशी घट्ट नाते सांगणारी सामान्य पात्रे, त्या पात्रांची रांगडी ग्रामीण व काहीशी विनोदी देहबोली, पात्रांप्रमाणेच त्वरित कनेक्ट होणारे तितक्याच ग्राउंड लेव्हल चे संगीत, उत्तम संवाद हे सर्व नागराज जॉनर सिनेमांची विशेषता असते. ‘घर बंदूक बिरयानी’ सुद्धा याला अपवाद नाही. पोलीस किंवा सिस्टम विरुद्ध नक्षली या आशयाचे अनेक कथानक हिंदी आणि मराठी सिनेमातूनही येऊन गेलीत पण इथे अत्यंत साधे कथानकही एका वेगळ्या ढंगात सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक हेमंत अवताडे आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केला आहे. कथा-पटकथा सुद्धा या दोघांनी मिळून लिहिली आहे. विक्रम अमलाडी यांचा जंगलात भन्नाट फिरणारा कॅमेरा (छायांकन), खासकरून एरियल शॉट्स व ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे झक्कास असे पार्श्वसंगीत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात मोठा हातभार लावतात. त्यानंतर नंबर लागतो तो ऍक्शन चा. रॉ ऍक्शन सोबतच पोलीस आणि नक्षल्यांच्या चकमकीत दाखवलेली गनफाईट सुद्धा तितक्याच प्रभावीरीत्या दाखविण्यात ऍक्शन डायरेक्टर के गणेश यांना यश आले आहे. नागराज यांच्या वाट्याला आलेली सिंघम स्टाईल हाणामारी तर मस्तच जमली आहे. ऍक्शन सोबतच नागराज यांचा अभिनय सुद्धा छान झाला आहे. सयाजी शिंदे यांनी रंगविलेला काहीसा कॉमिक असा पल्लम सुद्धा जमून आला आहे.

नावीन्य काय?- गंभीर विषयाची हलक्याफुलक्या मनोरंजक मार्गाने केलेली हाताळणी. एरवी सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या नागराज अण्णांचा हा क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून का होईना पण काहीसा फिल्मी वाटणारा हा पहिलाच प्रयत्न आहे. पण असे असले तरीही राजकारणी, आणि यंत्रणे मधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नक्षली लोकांवर कसा अन्याय झाला आहे आणि त्यांनी हत्यारे का उचलली आहेत हे ‘बिटवीन दि लाईन्स’ नागराज मांडतात. पण ते यावेळी ठळकपणे आलेले नाही.

कुठे कमी पडतो? – चित्रपटातील दोन प्रमुख पात्रे म्हणजे नागराज आणि सयाजी केवळ एकदाच तेही थेट क्लायमॅक्स मध्येच एकमेकांसमोर येतात ही सर्वात जास्त खटकणारी बाब. शिवाय चित्रपटाची २ तास ४१ मिनिटांची अतिरिक्त लांबी सुद्धा आटोक्यात आणता आली असती. काही गाणी बरी जमली आहेत तर काही अगदीच टाकाऊ आहेत. पटकथेत अनेक ठिकाणी तोच तोच पणा आल्याने मध्यंतरानंतर चित्रपटाची पकड सैल होते. पल्लम च्या गॅंगमधील गुर्या (प्रवीण डाळिंबकर ) हे एकमेव पात्र वगळता इतर पात्रे तितकीशी प्रभावी नाहीत. आकाश ठोसर आणि त्याची प्रेमकथा हा ट्रॅक तितकासा कनेक्ट होत नाही. पल्लम या पात्राची भीती कमी आणि हसू जास्त येते ही बाब एका दृष्टीने चित्रपटाच्या विरुद्ध जाणारी.

पहावा का?- नागराज जॉनर सिनेमांचे चाहते असाल तर हरकत नाही. पण अगदीच काही ग्रेट बघायला मिळेल ही आशा घरी ठेऊन जा. यावेळी नागराज अण्णा सामाजिक ढंगात नाही तर फिल्मी सिंघम अंदाजात आहे. शिवाय नेहमीच्याच बघण्यात असलेल्या कथानकाची अनावश्यक लांबी सुद्धा तुमचा हिरमोड करू शकते.

स्टार रेटींग – २. ५ स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment