– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bheed Movie Review

कथानक थोडक्यात – मार्च-२०२० मध्ये २१ दिवसांचे कोवीड लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीहून आसपासच्या प्रदेशात राहणारे हजारो कामगार आपल्या कुटुंबियांसह आपापल्या गावी परतण्यासाठी मिळेल त्या वाहनाने अथवा पायी निघतात. राज्यांची सीमाबंदी घोषित झालेली असल्याने या सर्व कामगारांना पोलीस सीमेवर थांबवितात. यातील एका चेकपोस्टवरील जबाबदारी पोलीस इन्स्पेक्टर सूर्या कुमार सिंग टिकास (राजकुमार राव) याच्यावर त्याचे वरिष्ठ अधिकारी यादव (आशुतोष राणा) सोपवितात. सूर्या चे प्रेम असते रेणू (भूमी पेडणेकर) वर जी स्वतः एक मेडिकल ची विद्यार्थिनी असून कोवीड मध्ये हेल्थ वर्कर म्हणून काम पहात असते. गावाकडे निघालेल्या कामगारांची संख्या खूप मोठी असल्याने आणि सर्वत्र गोंधळाची परिस्थिती असल्याने या चेकपोस्टवर पोलीस, डॉक्टर्स आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण आलेला असतो. या गर्दीत एक असतो त्रिवेदी (पंकज कपूर) जो दिल्लीत सेक्युरिटी गार्ड म्हणून नौकरी करीत असतो. त्रिवेदी आपल्या कुटुंबियांना घेऊन गावी परत निघालेला असतांना सर्वांसोबत त्याच्या गाडीला सुद्धा पोलीस या चेकपोस्टवर अडवतात. काही वेळाने परिस्थिती हाताबाहेर जाते आणि त्रिवेदी कायदा आपल्या हातात घेतो. तो नेमके काय करतो आणि यातून सूर्या कसा मार्ग काढतो हा पुढील भाग.

काय विशेष?- कथानक कोवीड लॉक डाऊन विस्थापितांपुरते मर्यादित न राहता, लेखक आणि दिग्दर्शकांनी त्यात प्रामुख्याने उत्तर भारतातील जातीय समीकरणे आणि त्यांच्यातील आजही अस्तित्वात असलेला भेदभाव यावरही भाष्य केले आहे. कथेचा नायक सूर्या हा खालची समजल्या जाणाऱ्या जातीचा दाखवला गेलाय तर त्याची प्रेयसी रेणू, सेक्युरिटी गार्ड त्रिवेदी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यादव हे सर्वच वरच्या समजल्या जाणाऱ्या जातीचे दाखवले आहेत. समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देतांना या पात्रांमधील भेदभाव लेखक सौम्या तिवारी, सोनाली जैन व दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अधोरेखित केलाय. अशा वेळी अनुभव च्याच ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल-१५’ या सिनेमांची आठवण होते. कलाकारांची निवड अतिशय योग्य अशी म्हणता येईल. विशेषतः पंकज कपूर आणि राजकुमार राव या दोघांची. दोघांनी कमालीचा अभिनय केलाय. लॉक डाऊन काळात विस्थापितांवर ओढवलेल्या क्लेशदायक परिस्थितीची जाणीव ठेऊन चित्रपट ‘ब्लॅक अँड व्हाईट’ मध्ये चित्रित करण्यात आलाय.

नावीन्य काय?- यापूर्वीही लॉक डाऊन डायरीज वर बऱ्याच वेब-सिरीज, डॉक्युमेंटरीज, चित्रपट आलेले असल्याने आणि विस्थापितांच्या या दुःखदायक कहाण्या प्रेक्षकांनी माध्यमातून, बातम्यांमधून, इंटरनेट वर वैगरे पाहिलेल्या असल्याने त्यात नावीन्य असे काही नाही. शिवाय हे सर्व गेल्या दोन-तीन वर्षांपुर्वीचेच असल्याने त्याच्या आठवणी अजूनही लोकांच्या डोक्यातून गेलेल्या नाहीत.

कुठे कमी पडतो? – खूप ठिकाणी. सर्वात मुख्य कथा-पटकथा. संपूर्णतः भरकटलेली. ना विस्थापितांचे दुःख हृदयाला जाऊन भिडते ना प्रशासकीय यंत्रणेवर चीड निर्माण होते. कथाकार आणि दिग्दर्शकाला यातून नेमके काय दाखवायचे आहे हेच कळत नाही. म्हणजे विस्थापितांचे दुःख दाखवायचे आहे की समाजातील जातींमधील भेदभाव यावर जास्त फोकस ठेवायचाय यात लेखक कमालीचा गोंधळलेला दिसून येतो. परिणाम हा कि विस्थापितांचे दुःख तर सोडाच पण अखेरीस प्रेक्षकांवर कुठल्याच घटनेचा अपेक्षित परिणाम होत नाही. अनुभव सिन्हा यांचा दिग्दर्शक म्हणून सुद्धा हा अनेक नंतर एक निराशाजनक प्रयोग ठरावा. त्यांचा गेल्या वर्षी आलेला आयुषमान खुराणा अभिनीत ‘अनेक’ हा चित्रपट सुद्धा असाच भरकटला होता. छायांकन, संवाद, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतीत चित्रपट अतिशय ऍव्हरेज आहे. भीड च्या ट्रेलर मध्ये चित्रपट निर्मात्यांनी या कथानकाची अथवा लॉक डाऊन च्या वेळची तुलना अतिशय हास्यास्पद रित्या थेट भारताच्या फाळणीच्या वेळच्या काळाशी केली होती. भीड बनविण्याआधी फाळणी वर आधारित निदान एक-दोन चित्रपट जरी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी व्यवस्थित पहिले असते तर निदान कोवीड विस्थापितांचे दुःख तरी ते व्यवस्थित चित्रित करू शकले असते. 

पहावा का?- अजिबात नाही. तुम्ही अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटांचे चाहते असाल तरीदेखील नाही. ‘सिन्हा’ यांचा ‘अनेक’ नंतर आणखी एक परिणामशून्य ‘अनुभव’.

स्टार रेटींग – २ स्टार. (केवळ पंकज कपूर आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाखातर)

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment