ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे  निधन

ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे व सून प्रिया मराठे असा परिवार आहे श्रीकांत मोघे यांनी ६० हून अधिक नाटकांत आणि ५० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. मोघे यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं होतं. शाळेत असतानाच ते अभिनयाकडे वळले. मुंबईत त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपली अभिनय क्षमता सिद्ध केली होती.  

shrikant moghe

वसंत कानेटकर यांचे  ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर तसेच  पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी या त्यांच्या नाट्य कारकिर्दीतील महत्वाच्या भूमिका मानल्या जातात. श्रीकांत मोघे यांना २००५-०६ सालचा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार तसेच काशीनाथ घाणेकर पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार, गदिमा पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा २०१४ चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार आदी काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.  

२०१२ साली सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Website | + posts

Leave a comment