अभिनेते महेश कोठारे यांचा कलायात्री पुरस्काराने गौरव

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे बोट धरून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि पुढे कलापूर कोल्हापूर हीच माझी कर्मभूमी झाली. कलापूरनेच घडवले आणि भरभरून प्रेमही दिले ’ अशा शब्दांत आज प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी कोल्हापूरप्रती कृतज्ञता व्यक्त केली. निमित्त होते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या ११ व्या कलायात्री पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे. कार्यक्रमात दानवे परिवारातर्फे त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कोठारे म्हणाले, ‘ प्रीत तुझी माझी’ हा माझा नायक म्हणून पहिला चित्रपट होता. याच चित्रपटात खलनायक म्हणून जयशंकर दानवे होते. त्यांच्या अभिनयाचे अनेक पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने मला पहायला मिळाले. चित्रपट व नाट्य क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा होता. त्यांच्याच कुटुंबियांकडून पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. फिल्मफेअरहून या पुरस्काराचे मोल अधिक आहे. अभिनेते जयशंकर दानवे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार हा माझ्या कला क्षेत्रातील कार्याची पोचपावती आहे.’ 

यानंतर डॉ.सुजय पाटील यांनी महेश कोठारे यांच्याशी संवाद साधला. त्यातून श्री.कोठारे यांचा बालकलाकार ते निर्माता-दिग्दर्शक असा आजवरचा प्रवास उलगडला. स्वागत व प्रास्ताविक जयश्री दानवे यांनी केले. जाई भागवत यांनी मानपत्राचे वाचन केले. अनुपमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले.        

Website | + posts

Leave a comment