औरंगाबाद- कृष्णनाथ गणपती नेरळकर उर्फ पंडित नाथराव नेरळकर यांचे आज दुपारी (२८ मार्च २०२१) औरंगाबादच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.त्यांच्या मागे दोन मुले जयंत व हेमंत नेरळकर व मुलगी हेमा उपासनी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याच्या संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

नाथराव नेरळकर यांचा जन्म नांदेड येथे २० नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. मराठवाड्यात संगीताचा प्रसार मोठ्या प्रमाणात करणारे नाथराव यांचे वडील गणपतीशास्त्री हे पौरोहित्य करत होते. नाथरावांचे काका धोंडोपंत यांना असलेल्या संगीताच्या आवडीमुळे नाथरावांचा संगीत क्षेत्रात प्रवेश झाला. धोंडोपंत हे मराठवाड्यातील गायनाचार्य अशी ओळख असलेल्या पंडित अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य होते. धोंडोपंत यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कृष्णनाथ सुद्धा १९४७ पासून गुंजकरांच्या संगीत शाळेत गायन शिकू लागले. लवकरच त्यांनी गायनात प्राविण्य मिळवले. १९५७ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत विशारद’ ही पदवी त्यांना ‘विष्णू दिगंबर पारितोषिका’ सह मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’ व ‘साक्षरता अभियान’ या ध्वनिफीत संचांचे संगीत दिग्दर्शन नाथरावांनी केले होते.

सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक संगीत नाटकांमधून भूमिका व गायन केले. मराठी अभंग, भावगीते व गझलांचे कार्यक्रम केले. प्रचलित रागांसह कृष्णकल्याण सारख्या अप्रचलित रागांत व पंचमसवारी सारख्या अनवट तालात त्यांनी बंदिशी बांधल्या आहेत. या बंदिशींचा मितवा हा संग्रह प्रसिद्ध आहे. ते एक कुशल संघटक होते. १९६४ पासून पुढे १० वर्षे नांदेड येथे त्यांनी संगीतसभांचे आयोजन केले. औरंगाबादेत युवक महोत्सव सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठवाडा सांगीतिक प्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली. संगीत दिग्दर्शक, संगीतनट, मैफिलीचे गायक, बंदिशकार व संघटक अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. नांदेडच्या प्रतिभा निकेतन विद्यालयात १९५२ ते १९७३ दरम्यान संगीत शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. १९७३ नंतर ते औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयात संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्य पाहिले.

मराठवाडा विद्यापीठात संगीत विभाग सुरु झाला तो केवळ नाथरावांनी घेतलेल्या पुढाकारामुळे. नांदेड येथे अनंत संगीत विद्यालय व औरंगाबाद येथे हिंदुस्थानी संगीत विद्यालय त्यांनी सुरु केले व गुरुकुल पद्धतीने विद्यादान करीत शिष्यांचा सांभाळ केला. त्यांचे असंख्य शिष्य आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आहेत. नाथराव नेरळकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार-२०१४, श्रेष्ठ गायक-अभिनेता पुरस्कार (राज्य नाट्य महोत्सव-१९५७), कलादान पुरस्कार (महाराष्ट्र शासन-१९९८), उत्कृष्टता पुरस्कार (रोटरी क्लब-२००१), औरंगाबाद भूषण पुरस्कार (२००२) इत्यादी काही मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

पंडित नाथराव नेरळकर यांना भावपूर्ण श्रद्धान्जली.

Website | + posts

Leave a comment