-अशोक उजळंबकर

 

एस.डी.बर्मन यांचा सहाय्यक म्हणूनच एन.दत्ता येथे ओळखला गेला. खरंतर त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिले होते व काही चित्रपट हिट करून दाखवले होते. परंतु केवळ याच यशावर तुम्हाला या व्यवसायात राहता येत नाही. येथे चालू असलेल्या स्पर्धेत पूर्णपणे उतरून जर तुम्ही कामगिरी करू शकला तरच तुम्हाला येथे नावलौकिक मिळविता येतो. शास्त्रीय संगीताची चांगली जाण असतांना व काही चित्रपटांना दर्जेदार संगीत देऊन सुद्धा या स्पर्धेचं गणित न जमलेला आणची एक संगीतकार म्हणजे एस.एन. त्रिपाठी होय. श्रीनाथ त्रिपाठी हा असाच संगीतकार होता. धार्मिक व स्टटपटांचं सगळं गुत्तं यांच्याकडेच होतं. आपली स्वतंत्र ओळख दाखविण्याचा एस.एन. त्रिपाठी यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना स्पर्धेत टिकता आलं नाही. स्पर्धा चालू असतांना अनेक गाणी न देता केवळ एकच हिट गाणं देऊन स्पर्धेत ते टिकून रहिले, पण आपण नेमके कोठे कमी पडतो हेच त्यांना समजू शकले नाही.

      सरस्वतीदेवी या संगीतकार महिलेकडे सहाय्यक म्हणून ते दाखल झाले होते. गायिका संगीतकार खुर्शिद मिनोचेर होमजी म्हणजेच सरस्वतीदेवी. बॉम्बे टॉकीजच्या स्थापनेपासून हिंमाशू रॉय बरोबर ती येथे दाखल झाली, तेव्हा सरस्वतीदेवी या टोपननावाने तिने संगीत देण्यास सुरूवात केली. एस.एन. त्रिपाठी येथे आधी ओळखले गेले ते गायक कलावंत म्हणूनच. नायक म्हणून येथे वावरत असताना कधी कधी चित्रपटाचे कथानक तयार करणे, दिग्दर्शनाची जबाबदारी घेणे ही कामे देखील त्रिपाठींनी येथे स्वीकारली व काही अंशी यशस्वीही करून दाखवली, पण प्रेक्षकांनी त्रिपाठींना स्वीकारलं ते संगीतकार म्हणूनच! सरस्वतीदेवी यांच्याकडे उमेदवारी केल्यानंतर स्वतंत्र संगीतकार म्हणून त्रिपाठींनी येथे कामगिरी सुरू केली तेव्हा चित्रगुप्त हा संगीतकार काही काळ त्यांचा सहाय्यक होता! ज्यावेळी बिनाका गीतमाला या संगीत मालिकेचं खूप महत्व होते तेव्हा ‘परवर दिगार ए आलम तेरा ही है सहारा’ हे रफीच्या आवाजातील ‘हातीमताई’ या चित्रपटातील गाणं बिनाका गीतमालाच्या टॉपवर होतं, टॉपवरच्या गीतांना रसिकांची खरोखरच मान्यता असायची. नंतरच्या काळात येथे वेगळ्या प्रकारची स्पर्धा सुरू झाली व या गीतमालिकेचा दर्जा पूर्णपणे घसरला हे मी सांगायला नको. एस.एन.त्रिपाठी जेव्हा येथे दाखल झाले तेव्हा गायक-नायक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणारे या क्षेत्रात अनेक जण होते. 1940 च्या सुमारास अभिनेता म्हणून ते येथे दाखल झाले. पण नायक म्हणून त्यांना चमकता आलंच नाही. सहाय्यक कलावंत म्हणून अनेक चित्रपट त्यांच्या वाट्याला आले. बॉम्बे टॉकीजच्या ‘जीवननैय्या’ मध्ये त्यांनी काम केले होते.

      संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली ती 1942 मध्ये. त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होता ‘सेवा’. त्या अगोदर ‘चुडियाँ’ व ‘चंदन’ या दोन चित्रपटात त्यांनी काम केले होते. ‘सेवा’ नंतर ‘पनघट’, ‘शरारत’, ‘अंधेरे’ ‘जीहां’, ‘रामायणी’, ‘मानस सरोवर’, ‘उत्तरा-अभिमन्यू’, ‘वीर घटोत्कच’ ‘सौदामिनी’ हे चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. परंतु यांचे संगीत लोकप्रिय होऊ शकले नाही.

      काही काळानंतर होमी वाडिया हे बॅनर त्यांच्याकडे आले. होमी वाडियाचे खास वैशिष्ट्यं म्हणजे धार्मिक चित्रपटांची निर्मिती करणारी संस्था 1950 च्या सुमारास ‘हनुमान पाताळ विजय’ हा होमी वाडियाचा चित्रपट त्यांनीच संगीतबद्ध केला. एकदा असं झालं की धार्मिक चित्रपटांची शृंखलाच यांच्याकडे आली. धार्मिक चित्रपट म्हटलं की एस.एन. त्रिपाठी यांचं संगीत असायचं. धार्मिक चित्रपटांना संगीत देत असतांना येथे असलेल्या मान्यवर संगीतकारांशी सामना देण्याचं काम एस.एन. त्रिपाठी यांनी केलं. 1956 च्या सुमारास ‘नया दौर’ या ओ.पी. नय्यर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील गाणी गाजत होती. ओ.पी. नय्यर यांच्या चित्रपट कारकीर्दीला ‘नया दौर’ मधील गाण्यांनी लोकप्रियता तर मिळवून दिलीच परंतु त्यांना खरा ब्रेक दिला बिनाका गीतमाला या संगीत स्पर्धेच्या गीतमालेत. ‘नया दौर’ ची गाणी 1957 साली गाजू लागली होत. त्यावेळी बिनाका गीतमालामध्ये टॉपवर येणाऱ्या गाण्याला फारच मह्त्व मिळत असे. अशावेळी एस.एन. त्रिपाठी यांच्या ‘जनम-जनम के फेरे’ या चित्रपटातील एका गाण्याने ओ.पी.नय्यर यांची झोप उडवली होती. ‘जरा सामने तो आओ छलिए, छुप छुप छलने मे क्या राज है।’ या लता-रफीच्या आवाजातील गाण्याने प्रथम क्रमांक मिळवला होता. तर रफीच्या आवाजातील ‘ये हैं जनम जनम के फेरे’ हे गाणं देखील तितकंच लोकप्रिय झालं होतं. एकच गाणं सुपरहिट देऊन त्यात बडे बॅनर मिळाले नाहीत याची मला खंत नाही असंच जणू त्यांना दाखवून दिलं होतं.

      भारतीय चित्रपट संगीत गायकांमध्ये शास्त्रोक्त संगीतातील हिंदी चित्रपट गीत गाण्याकरिता नेहमीच मन्नाडे यांचा आवाज वापरला गेला आहे. शास्त्रोक्त संगिताचा एक वेगळा प्रवाह येथे नौशाद यांनी आणला होता.  परंतु शास्त्रीय संगितात पारंगत असलेल्या मन्नाडेचा वापर शंकर-जयकिशन यांच्या प्रमाणे करण्याची हिम्मत नौशाद यांनी कधीच दाखवली नाही. रफीच्या लोकप्रियतेची कास ते सोडू शकले नाहीत. शंकर-जयकिशन यांनी ‘बसंत-बहार’ सारख्या चित्रपटातून मन्नाडेच्या शास्त्रीय गायनाला वाव दिला. मन्नाडे यांच्या गायन कौशल्याचा भरपूर उपयोग एस.एन. त्रिपाठी यांनी सुद्धा करून घेतला होता. भारत भूषण व निरूपारॉय यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या ‘कवी कालिदास’ या चित्रपटातील बरीच गाणी मन्नादा यांच्या कडूनच एस.एन. त्रिपाठी यांनी गाऊन घेतली होती. ‘दूर देख अलकापूरी, जहाँ मेरी प्रिय नार।’ आणि ‘ओ आषाढ के पहले बादल, ओ नभ के काजल’ ही गाणी लता सोबत मन्नाडे यांनीच गायली होती. तर रफीसोबत लतादीदीच्या आवाजातील ‘उनपर कौन करे जी विश्‍वास’ हे गाणं आजही गुणगुणता येईल इतकं कर्णमधूर होतं. ‘कवी कालिदासा’चा विषय बघून एस.एन. त्रिपाठी यांनी वेगळ्या ढंगातील गाणी या चित्रपटाकरिता दिली होती. “शाम भाई घनश्‍याम आये’’ हे लताच्या आवाजातील गाणं देखील तितकंच लोकप्रिय होतं. कवी कालीदासाची गाणी आज ही गुणगुणता येतील एवढी लोकप्रिय झाली होती.

      धार्मिक चित्रपटांना संगीत देण्याची संधी त्रिपाठी यांना मिळत होती. त्याबरोबरच कांही ऐतिहासिक कथानकाचे चित्रपट त्यांच्याकडे येत होते. कवी कालीदासाप्रमाणे ‘राणी रूपमती’ या चित्रपटाचे संगीत त्यांनीच दिले होते. ‘राणी रूपमती’ हे नाव जरी नुसतं आठवलं तरी “आ लौट के आजा मेरे मीत’’, हे लता मुकेश यांच्या वेगवेगळ्या आवाजातील गाणं हमखास आठवतं. त्यानंतर रफी सोबत लताच्या आवाजातील ‘फुल बगीया मे बुलबुल बोले’ व ‘झनन बाजे पायलिया’ ही द्वंदगीतंही तितकीच गाजली. लताच्या सोलो आवाजातील ‘जीवन की बीना के तार बोले आज राधा के नयनो में शाम डोले’ ची लज्जत काही औरच होती. लताच्या हळुवार आवाजातील ‘रात सुहानी झुमे जवानी’, ‘दिल है दिवाना हारा तेरे लिए’ ची गोडी काय वर्णावी? ‘लौट के आ, आजा मेरे मीत’ हे लताच्या आवाजातील गाणं खासच जमून आलं होतं. ‘राणी रूपमती’ या ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या चित्रपटात शास्त्रोक्त संगिताचा अचूक उपयोग करून लोकप्रिय होतील अशी गाणी देण्यात त्रिपाठी तेवढेच यशस्वी झाले होते.

      एस.एन. त्रिपाठी यांच्या संगीत कारकीर्दीकडे लक्ष दिलं तर एक लक्षात येतं की त्रिपाठी यांनी शास्त्रोक्त संगिताचा भरपूर उपयोग आपल्या संगितात केला आहे. आपल्या समकालीन संगीतकारांपेक्षा वेगळ्या ढंगाचं संगीत देऊन सुद्धा ते येथे दुर्लक्षित राहिले. दुर्लक्षित असं म्हणताना मोठ्या मोठ्या बॅनरच्या निर्माते दिग्दर्शक मंडळींनी त्यांना संधी दिली नाही हे खेदाने सांगावे लागते. संगीतकार एस.एन. त्रिपाठी यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक उतार-चढाव आले परंतु त्यांनी योग्य वाटचाल केली. यशाची धुंदी त्यांच्या डोळ्यावर कधीच चढली नव्हती. फिल्मी दुनियेत खोऱ्यानं पैसा ओढण्याची किमया आज मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. त्यावेळी त्रिपाठी यांना आपल्या कामाचा पूर्ण मोबदला मिळणंही शक्य होत नसे. ऐतिहासिक तसेच धार्मिक चित्रपटांना व्यावसायिक यश फारच कमी वेळा मिळत असे व व्यावसायिक यश मिळत नसल्यामुळे निर्माते मंडळी पैसा देतांना हात आखडता घेत असत. त्रिपाठी महाशयांनी याची कधीच तक्रार केली नाही. लखनौ स्थित त्रिपाठी मनाने खूप मोठा माणूस होता. नौशादची परंपरा चालावी ही त्यांची इच्छा होती. त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले. शास्त्रीय संगिताचा पदर धरून चालल्यामुळे नव्या जमान्यात जिथे नौशादनाही यश पारखं झालं होतं, तिथं त्रिपाठींची काय कथा? काळ बदलत चालला होता.

      शास्त्रीय संगीतामुळेच त्यांना यश मिळालं. स्पर्धेचा विचार त्यांनी केला नाही. कुणालाही काम मागायला ते जात नसत. जे मिळालं त्यावर त्यांनी समाधान मानलं. त्रिपाठी जाऊन अनेक वर्षे झाली पण त्यांची आठवण येताच ‘जरा सामने तो आओ’ या ओळी लगेच ओठांवर येतात. कधी कधी विचार येतो की, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय गायन अशा अनेक क्षेत्रात हात आजमावण्यापेक्षा त्रिपाठींनी केवळ संगिताकडे लक्ष दिलं असतं तर त्यांना जास्त यश मिळालं असतं.

***

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment