-रा.कों. खेडकर

प्रतिभा आणि प्रतिमेचं अभूतपूर्व सौंदर्य, नैसर्गिक अभिनयाची उत्तम जाण, बुद्धिमत्ता आदी जमेच्या गुणवैशिष्ट्यांमुळे १९५५ पासून सुरू झालेला सहा दशकांचा यशस्वी काळ… ‘प्यासा’, ‘ गाईड’,’ अभीजान’, ‘ मुझे जीने दो’,’ तिसरी कसम’, ‘खामोशी’, अशा असंख्य सिनेमातील बहुचर्चित व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनमंदिरात तेवत ठेवणाऱ्या वहिदा रहेमान यांना रसिक प्रेक्षकांनी बेहद प्रेम दिलं. दर्दी रसिकांनी पसंद केलेल्या देखण्या तारकांत त्यांचा पसंदी क्रम अगदी वरचा आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा…….

वहिदा रेहमान तेरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या नंतर घराचा कारभार कसा चालवायचा या विवंचनेत मुमताज बेगम (वहीदांच्या आई) असताना त्यांना चित्रपट निर्माते सी.व्ही. रामकृष्ण यांचा निरोप आला. ते ‘रोजुलु मरायी’ नावाचा तेलगू चित्रपट निर्मितीच्या तयारीत होते. या चित्रपटात वहीदा ने नृत्य करावे. तिला नृत्याची आवड आहे. तिने यापूर्वी नृत्याचे कार्यक्रम केलेले आहेत. तिने नवव्या वर्षापासून भरत नाट्यम चे धडे गिरविले आहेत. तिला पुढे नृत्यात करिअर करायचे असेल तर मी तिला चित्रपटात संधी देतोय,. खरेतर हीच तिच्या यशाची नांदी ठरेल… असे त्यांचे म्हणणे होते. मुमताज बेगम यांची आपल्या मुलीने चित्रपटात काम करावे अशी इच्छा नव्हती. वहिदा चित्रपटात काम करणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला. सी.व्ही. प्रसाद वहिदांचे वडील एम. ए. रहमान यांचे स्नेही होते. खूप सकारात्मकतेनं समजावून त्यांनी मुमताज बेगम यांचे मन वळविले व वहिदा रहेमान यांचा चित्रपट प्रवेश निश्चित झाला. ‘एरुवका सागरो रत्रो चिन्नाना….’ या गाण्यावर वहिदा यांनी अप्रतिम नृत्य केलं नी ते प्रचंड गाजलं. इथनं वहीदांच्या संधीचे असंख्य दरवाजे खुले झाले. त्यांच्यातील कलागुणांना प्लॅटफॉर्म मिळाला. या अभूतपूर्व यशानंतर वहिदा चर्चेचा विषय झाल्या. या झगमगाटाच्या आनंदी दिवसातच त्यांची गुरुदत्त यांच्याशी भेट झाली.

waheeda rehman birthday

उमेदवारीच्या काळातही आपल्या प्रामाणिक मतांशी ठाम असणारी, जे मनाला पटतं तेच करणारी, वेशभूषे बाबत मला स्वातंत्र्य असेल या अन अशा अटींमुळे कमी वयातही आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणारी मुलगी गुरुदत्तजींच्या कायम लक्षात राहिली. या मुलीचा बाणेदारपणा, सडेतोडपणा, निर्णयक्षमता, कामाबद्दलची आस्था गुरुदत्त यांना भावली. या मुलीत काहीतरी अजब रसायन आहे, हे शंभर नंबरी सोनं आहे याची खूणगाठ त्यांच्या मनाने बांधली. गुरुदत्तजी सारख्या रत्नपारख्याने अचूक रत्नाला पारखून त्याला आपण नक्कीच पैलू पाडू याची मनोमन तयारी दर्शविली व वहीदाजींच्या कारकीर्दीची दिशा योग्य मार्गाने प्रवाहीत केली. सुरुवातीच्या काळात वहीदांचे पहिले दिग्दर्शक राज खोसलाशी बरेच खटके उडाले परंतु गुरुदत्तजींच्या मध्यस्थीने सर्व काही व्यवस्थित झाले. ‘सीआयडी’, ‘ प्यासा’, या दोन्ही चित्रपटांची निर्मिती एकाच वेळी सुरू होती. ‘सीआयडी’ देवानंद सोबत ‘प्यासा’ मध्ये गुरुदत्तजी सोबत त्यांनी अभिनयाची छानशी खेळी खेळली. गुरुदत्त फिल्म सोबत वहिदाजींचा तीन वर्षाचा करार झाला होता, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात वहिदाजींना काम मिळणार हे निर्विवाद होतं.’प्यासा’ मधील ‘गुलाबो’ ही व्यक्तिरेखा आजही तितक्याच तन्मयतेनं पाहणारे लाखो प्रेक्षक आहेत ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना… ‘, (सीआयडी), ‘जाने क्या तूने कही…’ (प्यासा) या गाण्यामध्ये वहीदाजींची लाजवाब अदा , नैसर्गिक अनवट अभिनय पाहताना आजही प्रेक्षक संमोहित होतो. जे वाट्याला आलं त्याचं त्यांनी सोनं केलं. ‘प्यासा’ तील साकारलेली ‘गुलाबो’ ही व्यक्तिरेखा, त्यातली गाणी एकूणच सिनेमाचा परिघ बघता हा चित्रपट त्याकाळी तब्बल पंचवीस आठवडे चालला यातून या कलाकृतीची नजाकत, श्रीमंती अधोरेखित होते. प्यासाने त्यांना पैसा,.ग्लॅमर, पहिली मोटारगाडी आदी ऐश्वर्य भरभरून दिलं.

waheeda rehman and guru dutt

आव्हानात्मक भूमिका, व्यक्तिरेखेला दिलेला न्याय, कामाबद्दलची सचोटी याचच हे फलित होतं १९५७ मध्ये प्यासाला रौप्यमहोत्सवी यश मिळालं. त्यानंतर ‘सोलवा साल’, ‘कागज के फूल’ आले. कागज के फूल ने एक वेगळा इतिहास घडविला. भारतात बनवलेला हा पहिला सिनेमास्कोप चित्रपट होता. अभिजात कलाकृती म्हणून याकडे पाहिलं जातं. या समग्र चित्रपटांनी वहीदाजींना आत्मीय सुख दिलं. नावारूपाला आणलं. अशा यश साजरे करण्याच्या आनंदी दिवसात त्यांच्या आईच्या निधनाने त्यांना जबर धक्का बसला. बहिणींचे लग्न होऊन त्या आपल्या संसारी रमल्या होत्या. वहिदा मात्र एकाकी पडल्या. अशा वादळी अशांततेच्या उदासी काळात त्यांना राज खोसला, देव आनंद, गुरुदत्त यांनी खूप मानसिक आधार दिला. दिवस कायमचे थांबत नसतात. हळूहळू आभाळ निरभ्र होत गेलं. अनुभवाच्या विशाल पाठ शाळेतून शिकून वहीदाजी स्वतःच्या मनोबलावर, हिमतीवर उभ्या राहिल्या एकामागून एक चित्रपट मिळत गेले नि त्यांच्या कारकीर्दीला सोनेरी किनार प्राप्त झाली. पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 12 o’clock, कालाबाजार, एक फुल चार काटे, गर्लफ्रेंड, चौदवी का चांद, साहिब बीबी और गुलाम, सत्यजित राय यांचा अभिजन हा चित्रपटांचा आलेख चढता राहिला. अनुभवाच्या भक्कम भांडवलावर त्यांना चित्रपट निर्मितीबाबत अपेक्षित अशी समज येत गेली मग त्यांनी कथासूत्र, कलाकार, भूमिका आदीबाबत सक्षम मापदंड वापरून चित्रपट स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यांनी साकारलेल्या कामिनी, बाणी चौधरी, लाजवंती, शांती, अलका, सुषमा, जमीला, जबा, राधा, गुलाबी, चमेलीजान, आशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायम विराजमान आहेत. ‘भवरा बडा नादान है’,’ रात भी है कुछ भीगी भीगी’,’ आज फिर जीने की तमन्ना है’ ही गाणी काही केल्या मनःपटलावरून पुसल्या जात नाहीत. १९५५ ते २००९  (दिल्ली 6) पर्यंतचा हा प्रदीर्घ प्रवास सिनेरसिकांना कायम सुखावत गेला.

waheeda rehman in guide
Waheeda Rehman in Guide

या प्रवासात लोकाश्रया सोबतच त्यांना राजाश्रय ही उत्तम मिळाला १९६६ मध्ये ‘तिसरी कसम’ मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते रौप्यपदक दिलं गेलं. शेवटच्या इनिंग मधील ‘हिम्मतवाला’, ‘महान’,’ कुली’,’ घुंगरू’,’ सनी’, ‘मशाल’,’ मकसद’,’ सिंहासन’, ‘चांदनी’,’ लम्हे’,’ रंग दे बसंती’ मधील चरित्र नायीकेच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी मनमुराद पसंती दिली. २०११ साली त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मान बहाल करून स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या या महान अभिनेत्रीला मानाचा मुजरा केला.

Waheeda Rehman while receiving PadmaBhushan
Waheeda Rehman while receiving PadmaBhushan

वहिदा रेहमान नाव उच्चारलं की, ‘आज फिर जीने की तमन्ना है…’ म्हणणारी अभिनयाची ‘गाईड’ अभिनेत्री डोळ्यासमोर प्रगटते.

R.K.Khedkar
R.K. Khedkar
+ posts

Leave a comment