— धनंजय कुलकर्णी
सिनेमाची मोहमयी दुनिया मोठी जालीम असते. इथे रंकाचा राव आणि पुन्हा रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. माया नगरी तला हा जीवघेणा चढ उतार कित्येक कलावंताच्या पदरी येतो. कित्येक जण त्याने खचून जातात, हताश होतात. आयुष्यातली ही खेळी पराभूत झाल्याने काही जण आयुष्यच संपवायला निघतात. पण यातही काही जिंदादिल, ताठ कण्याचे असतात जे पराभवाने विचलित न होता पुन्हा मार्गस्थ होतात आणि पुन्हा नव्याने डाव मांडू लागतात. भारतीय सिनेमाची शताब्दी आता सुरु आहे. आणि कचकड्याच्या दुनियेत तब्बल ६५ वर्षे घालवून रसिकांची मनमुराद करमणूक करणारे कलाकार मा. भगवान यांचा आज स्मृतिदिन आहे. भगवान आबाजी पालव यांचा जन्म १ ऑगस्ट १९१३ चा!
घरची परिस्थिती बेतास बात. वडील गिरणी कामगार. मुलाने सिनेमासारख्या बेभरवश्याच्या धंद्यात जावे हे त्यांच्या सनातनी आणि भोळ्या भाबड्या मनाला पटत नव्हते. पणभगवान तेंव्हा इंडीयन डग्लस मा.विठ्ठल यांच्या सिनेमातील स्टंटवर जाम फिदा होते. त्यांनी मोठेपणी सिनेमात जावून ’स्टंट’ करायचे ठरवूनच टाकले होते. वडलांनी मात्र त्यांना भरपूर व्यायाम करून पैलवान बनायचा सल्ला दिला होता. अखेर दोघांच्याही मनोकामना पूर्ण झाल्या. भगवान दादा हा अस्सल मर्दानी मराठी गडी! १९३० साली प्रदर्शित झालेला ’बेवफा आशिक’ हा त्यांचा पहिला चित्रपट अर्थातच तो मूकपट होता. त्या नंतर मास्टर विठ्ठल, गणपत राव पैलवान, वसंतराव पैलवान या दोस्त मंडळीना घेवून त्यानी भरपूर स्टंट सिनेमे बनविले. पन्नासच्या दशकात त्यानी आपला माईल स्टोन सिनेमा ‘अलबेला’ बनविला. या त्यांच्या सोशल फिल्मला प्रचंड यश मिळाले. पण त्याचं हे यश शापित ठरलं. पुढे यशापयशाचा पाठ शिवणीचा खेळ सुरु झाला पण गडी डगमगला अजिबात नाही. आपली खास भगवानदादा नृत्य शैली द्वारे पुढची पन्नास वर्षे रसिकांचे मनोरंजनकरीत तो नियतीशी टक्कर देत उभा राहिला.
भगवान दादा विनोदी सिनेमाकडेवळले ‘अलबेला’च्या वेळी १९५१ साली. स्टंट पटातून बाहेर पडल्यावर पहिला सोशल सिनेमा निर्मिला तो हाच! पण ते स्टंट पटाला सहजा सहजी सोडायला तयार नव्हते. अण्णा(सी.रामचंद्र) यांनीत्यांना त्या वेडातून बाहेर काढलं. नसता ‘तुझ्यासिनेमांना मी संगीत देणार नाही’ अशी प्रेमळ धमकी देखील दिली. भगवान दादा थोडेसे नाखुशीनेच तयार झाले कारण स्टंटपट हा त्यांचा प्राण होता. अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील सूड नाट्याला जी ‘क्रेझ’ होती किंबहुना त्याहून अधिक ती भगवान दादा यांच्या चाळीसच्या दशकातील सिनेमांना होती. प्रचंड मारधाड असलेले हे सिनेमे तसे बी किंवासी ग्रेड चे असायचे पण अशा सिनेमांना एक प्रकारचा वेगळा प्रेक्षक वर्ग लाभत असे. याचं दुसर कारण असं, त्या काळचे हिंदी सिनेमाचे हिरोहे तसे शामळू प्रवृत्तीचे असायचे (आठवा अशोक कुमार यांचे बॉम्बे टॉकीजचे सुरुवातीचे चित्रपट) एकूणच नायिकेच्या प्रेमात पडायचे, तिच्यासाठी झुरायचेआणि त्यातच आयुष्याचा शेवट करावयाचा अशी ’देवदास” प्रतिमा असलेले पुचाट नायक सर्वाना थोडेच आवडणार होते? त्यामुळे भगवान दादा आणि अन्य कलावंताच्या देमार सिनेमांना चिक्कार गर्दी असायची. बदला, बहाद्दूर, जलन, दोस्ती, शेक हॅंड, मतलबी, जीते रहो, भेदी बंगला, बचके रहना हेसिनेमे म्हणजे चाळीस आणि पन्नासच्या दशकातील एक वेगळा मार्ग चोखाळणाऱ्या प्रवृत्तीचेप्रतिक होते. त्याकाळातील इतर स्टंट पटाशी तुलना करता (फियर लेस नादिया-जोन कावस यांचे चित्रपट) भगवान यांच्या सिनेमात भावना प्रधानता असायची, आईच वात्सल्यमय कॅरेक्टर असायचं! दादाचं नाव आणखी एका घटनेकरिता आठवलं जातं. १९४२ साली एका चित्रपटच्या चित्रिकरणाच्या वेळी त्याना सहकलाकार ललिता पवारच्या श्रीमुखात लगावून द्यायची असते. त्यानी एवढी जोरात थप्पड लगावली की ललिता पवार यांच्या डाव्या डोळ्याला मोठी इजा झाली आणि पुढे आयुष्यभर त्यांचा डावा डोळा फडफडत राहिला. (अर्थात हा डोळा त्यांच्या अभिनयाचाअविभाज्य अंग बनला!)
लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवान यांनी १९४२ साली जागृती पिक्चर्स या बॅनर ची स्थापना केली तसेच स्वतः चा चेंबूर इथे जागृती स्टुडीओ १९४७ साली उभारला. दादाचे हे सारे स्टंट पट मात्र पुढे गोरेगावला त्यांच्या गोडावून ला आग लागली आणि त्यात सर्व जळूनभस्मसात झाले. ज्या सिनेमांनी दादाला वैभवाच्या शिखरावर नेले ते सर्व सिनेमे आगीच्या भक्ष्य स्थानी पडले. रसिकांच भाग्य थोर त्यात’अलबेला’ ची प्रिंटसुखरूप राहिली. त्यामुळे आज भगवान दादाच्या स्टंट सिनेमाची आठवण इतिहास जमा झाली असली तरीत्याच्या कारकिर्दीला ’चार चांद’ लावणारा ‘अलबेला’ शाबूत राहिला. मा.भगवानच्या’अलबेला’ने इतिहास घडविला. नृत्य संगीताचाअभिनव अविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला पहिला डान्सिंग अॅक्टर मिळवून दिला. सोशल फिल्म द्वारे प्रथमच पडद्यावर आलेल्या दादांना प्रेक्षकानी स्वीकारले. पूर्वीच्या त्यांच्या सिनेमात नायिकेला फारस महत्व नसायचा. त्यामुळे कोणतीही मुलगी चालून जायची पण अलबेलाची गोष्टच निराळी होती. दादांनी नायिकेच्या भूमिके करिता १९५० साली गीताबालीला ३५००० रुपये देवून साईन केले. सिनेमाचे कथानक तसे फारसे विशेष असे नव्हते. एक नाट्यवेडा कलंदर घर सोडून परिस्थितीशी झुंजत आपले ध्ये्य साध्य करतो. पण कथानकाकडे प्रेक्षकांचं लक्ष गेलंच कुठे? त्यांना मिळालीएकाहून एक सुपर डुपर हिट गाणी आणि त्यावरील खास भगवान डान्स!
सुरुवातीचेच ‘महफि्ल मेंमेरी कौन ये दिवाना आ गया दिवाना आगया, जब शम्माने पुकारा तो परवानाआ गया’ या गीतावर प्रेक्षकनिहायत खूष होवून दौलतजादा करू लागले. ‘बलमा बडा नादान रे’ या मुजरा गीताला दादांनी चक्क प्रेमगीत बनवून त्या पद्धतीने पिक्चराईज केले. ‘शाम ढले खिडकीतले तुम सिटी बजाना छोड दो ‘ या गीताने तरछेडछाड वाल्या गीतांचा आरंभ केला. ’ओ बेटाजी किस्मतकी हवा कभी नरम कभी गरम’ या गीतातील भाड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः दादाची होती. ‘भोली सूरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन छोटे ‘ आणि ‘ शोला जो भडके दिल मेरा धडके दर्द जवानीका सताये बढ बढ के ‘ या गाण्याने पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. ‘मेरे दिल किघडी करे टिक टिक जब बजे रात के बारा हाय तेरी याद ने मारा’ हे गाणंदेखील मस्त जमून आल होत. सिनेमातील अंगाई गीत सर्वात लोकप्रिय ठरले. ‘धीरेसे आजारे आखीयन में निंदिया धीरेसे आजा’ या लताच्या अंगाई गीताने आजही सर्वोत्कृष्ट अंगाई गीताचे स्थान कायम ठेवले आहे. यातेल ‘शोला जो भडके’ हे गीत सिनेमाच्या अगदी शेवटी येते. खर तर नायक नायिकांचे मिलन झाल्यावर सिनेमा संपायला हवा पण नेमकत्याच क्षणी हे गीत चालू होते. हा जुगार दादा खेळले कारण त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. गाणं सुरु होत आणि आख्ख थिएटर नाचू लागत. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्रयांच्या कारागिरीचा हा सर्वोच्च्य बिंदू ठरला. अण्णांनी संगीतात बोंगो ड्रम , बेंजो, क्लॅरोनेट, ट्रम्पेट , सॅक्सो फोन ही सारी पाश्चात्य वाद्ये वापरली होती. याचाच अर्थ भारतीय सिनेमात खर्या अर्थाने पाश्चात्य संगीत आणि डांस रुजविण्याचे काम अलबेला ने केले. भगवानदादा याचं हे अलबेला च यश मात्र शापित ठरलं.
त्यानंतर त्यानी कितीतरी सिनेमे बनवले. झमेला, कर भला, लाबेला, शोला जो भडके, रंगीला … पण एकालाही यश मिळाले नाही. सिनेमा निर्मिती उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवान दादांनी कालची पावलं ओळखली आणि आपल लक्ष पूर्णपणे ‘डान्स’वर केंद्रित केल. पुढे कित्येक हिन्दी आणि मराठी सिनेमात ते नाचू लागले. आपल्या दादा कोंडके सोबतही छान जोडी जमली होती. (आठवा गंगू तारूण्यतुझं बेफाम..) खर तर डान्स हाच त्यांचा ’प्लस प्वाइंट’ होता. ‘नाचता नाचता हळूवार पणे अलगद खांदे उडविण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी हिच डांस शैली सही सही उचलली. चोरीचोरी, झनक झनक पायल बाजे या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या. चोरीचोरी तर त्यांच्या वर ”तुम अरबोका हेर फेर करनेवाले रामजी सवा लाखकी लॉटरी भेजो अपने भी नामकी ’हे मस्त गाणं चित्रित केलं होतं. दादा सिनेमे बनवत गेले पणत्यांना अलबेला नंतर पुन्हा काही यश मिळाल नाही. वैतागून त्यानी ’अलबेला’चे हक्क रणजित बुधकराना विकून टाकले. आणि काय आश्चर्य पहा १९५१ साली प्रदर्शित झालेला अलबेला पुन्हा १९७५ साली रणजीत बुधकरानी पुन्हा एकदा रिलीज केला आणि तब्बल २४ वर्षानंतरही ‘शोले’ ला टक्कर देत अलबेला पुण्या मुंबईत सुपर हिट ठरला.
आज जन्मशताब्दी च्या निमित्ताने भगवान दादानाआठवताना त्यांचा सारा जीवनालेख नजरेसमोर येतो. दादरच्या ज्या लल्लूभाई मेंशन मध्ये तेरहात होते त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ दादाशिवाय पुरा होत नसे. एके काळी एका स्टुडिओचे मालक असलेले दादा बंगला, गाडी असे सर्व काही ऐश्वर्य उपभोगत होते. पुढे काळ बदलला. दादा डेली पेड आर्टीस्ट म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरूलागले. अहंकाराची अजिबात बाधा नसलेले दादाहोते. ऐश्वर्य आणि गरीबी त्यांनी एकाच मापात मोजली. कित्येक कलाकाराची आयुष्य त्यांनीघडवली. (आनंद बक्षी यांना पहीली संधी त्यांनीच दिली)
भारतीय सिनेमातील त्यांचे ’कॉंन्ट्रिब्युशन’यशाची मोजपट्टी लावली तर त्या अर्थाने कदाचित कमी असेल पण त्यांच्या मुळेच पहिला डांसिगस्टार मिळाला हे कसे विसरता येईल? ज्या लल्लूभाई मेंशन मध्येते रहात होते ते लहानपणापासून रहात होते तिथेच त्यांच्या जीवनाची अख्रेर झाली ४ फ़ेब्रुवारी २००२ रोजी.
एक वर्तुळ वेगळ्या अर्थाने पूर्ण झालं!