45 Years Of Cult Classic film Amar Akabar Anthony; त्या वर्षी आजच्या दिवशी..मसाला सिनेमाचा बाप-अमर अकबर अँथनी

-धनंजय कुलकर्णी

45 Years Of Cult Classic film Amar Akabar Anthony. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सत्तरचं दशक हे मसाला चित्रपटांचे दशक होते. यात अमिताभ बच्चन या सुपरस्टार चे आगमन झाल्यानंतर चित्रपटात ॲक्शन, इमोशन, कॉमेडी आणि ड्रामा  या संगमाने सिनेमा अधिकाधिक मसालापट बनला गेला. १९७७ साली दिग्दर्शक  मनमोहन देसाई यांनी ‘अमर अकबर अँथनी’ (Amar Akbar Anthony) हा चित्रपट प्रदर्शित केला. हा चित्रपट म्हणजे सत्तरच्या दशकातील सिनेमाचा  सार होता! हा सिनेमा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा होता. इतिहासात बॉलिवुडच्या मसाला सिनेमाची ज्या ज्या वेळी नोंद घेतली जाईल त्या त्या वेळी या चित्रपटाचे नाव पहिल्या पाचात निश्चित असेल!  हा चित्रपट आजच्या दिवशी म्हणजेच २७ मे रोजी १९७७ साली  प्रदर्शित झाला होता. याचा अर्थ हा सिनेमा अर्थ आज ४५ वर्षे पूर्ण करीत आहे. आज इतक्या वर्षांनंतर देखील बॉलीवूडच्या प्रेक्षकांवरील या सिनेमाची जादू अबाधित आहे. या सिनेमाच्या निर्मितीची कथा देखील तितकीच रोचक आहे. दिग्दर्शक मनमोहन देसाई (Director Manmohan Desai) या चित्रपटापासून पहिल्यांदा निर्मात्याच्या भूमिकेत आले. या पूर्वीचे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट छलिया , ब्लफ मास्टर, बदतमीज,सच्चा झूठा, राम पूर का लक्ष्मण ,भाई हो तो ऐसा , आगले लग जा, रोटी  हे इतर निर्मात्यांनी निर्मित केले होते. मनमोहन देसाई यांचा दिग्दर्शनातील हा तेरावा चित्रपट होता. त्यांचे  वडील किकुभाई देसाई हे हिंदी सिनेमाच्या चाळीस आणि पन्नासच्या दशकातील हिट निर्माते होते. त्यांच्या मालकीचा Paramount स्टुडीओ (नंतरचा फिल्मालय) होता. त्यांचे मोठे बंधू सुभाष देसाई मुरब्बी सिने निर्माते होते. ‘अमर अकबर अँथनी’ या सिनेमा पासून ते निर्माते बनले. मनमोहन देसाई मसाला सिनेमाचे अनभिषिक्त सम्राट होते . त्यांना इथल्या पब्लिकची टेस्ट कळाली होती. या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रारंभ १९७५ साली झाला.याचा  मुहूर्त धर्मेंद्र यांच्या हस्ते झाला.

या काळात ते अनेक चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त होते. ‘अमर अकबर अँथनी’, परवरिश, धरमवीर आणि चाचा भतीजा. हे त्यांचे सिनेमा यावेळी फ्लोअर वर होते. पैकी पहिल्या दोन सिनेमाचा प्रमुख नायक अमिताभ तर उरलेल्या दोन सिनेमाचा प्रमुख नायक धर्मेंद्र होता. हे सर्व सिनेमे तसे मल्टीस्टारर आणि बिग बजेट होते; त्यामुळे या सर्वांचे दिग्दर्शन करताना देसाई यांची खऱ्या अर्थाने कसरतच होती! याच काळात आपल्या देशात आणीबाणी चे  पर्व सुरू झाल्याने देसाई यांच्या चित्रपटाच्या  प्रदर्शनावर मर्यादा येत गेल्या. परंतु  मार्च १९७७ देशात राजकीय परिवर्तन झाले आणि आणीबाणी समाप्त झाली. या नंतर  त्यांचे सिनेमे लागोपाठ प्रदर्शित होऊ लागले.या वर्षी वरील,चारही सिनेमे प्रदर्शित झाले त्यांचे हे चारही सिनेमे सुपर डुपर हिट झाले! मनमोहन देसाई यांच्या करीता हे वर्ष गोल्डन इयर ठरलं. पैकी ‘अमर अकबर अँथनी’ हा सिनेमा तर १९७७ चा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा ठरला होता. बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये तो एक नंबर वर होता. या सिनेमाचे बजेट दीड कोटी होते आणि या सिनेमाने त्या काळात तब्बल सात कोटीचा धंदा केला. या सिनेमात काय नव्हते? मुख्य म्हणजे सेक्युलॅरिझम अर्थात धर्मनिरपेक्षता हा आपल्या फिल्मी मंडळींचा आवडता फंडा. या सिनेमात तो मस्तपैकी वापरला गेला होता. तीन प्रमुख धर्मांचे नायक दाखवून त्यानी राष्ट्रीय एकात्मतेला ऐरणीवर आणले. (ज्याचे पेटंट मनोजकुमार होते!) मनमोहन देसाई यांचा टिपिकल ‘लास्ट अँड फाउंड’ फार्मूला इथे अगदी फिट्ट बसला होता.

बी आर चोप्रा यांचा ‘वक्त’(१९६५), नासीर हुसैन यांचा ‘यादो की बारात ‘ (१९७३) या सिनेमात देखील तीन भाऊ लहानपणी हरवतात या सूत्राभोवती कथा फिरत होती. ‘अमर अकबर अँथनी’सिनेमाची पटकथा प्रयाग राज यांची तर संवाद कादर खान यांचे होते. या सिनेमाची कथा मनजी यांना वर्तमानपत्रातील एका बातमीवरून सुचली होती. मुंबईत एका व्यक्तीने आपल्या तीन लहानग्या मुलांना एका बागेत सोडून देवून आत्महत्या केली. हि बातमी वाचून त्यांच्या मनात सिनेमाची कथा आकार घेवू लागली. सिनेमाचे कथानक सर्वश्रुत असल्याने ते सांगण्याची गरज नाही. पण पात्राची निवड करताना काही गमती घडल्या. ऋषीकपूर ने त्याच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात आठवण दिलीय. त्या वेळी तो राजस्थानात ‘लैला मजनू’ चे शुटींग करत होता. मनजी यांनी त्याला फोन करून चित्रपटाच्या भूमिकेबाबत विचारले. त्या वेळी फोनवर व्यवस्थित आवाज येत नव्हता. त्याला फक्त ‘अकबर’ हा शब्द ऐकू आला. त्याला वाटले मनजी यांनी त्याला  सम्राट अकबर ची भूमिका ऑफर केलीय! तो म्हणाला “ नाही, या भूमिकेसाठी माझे वय खूप कमी आहे आणि माझ्या आजोबांनी हि भूमिका अजरामर करून ठेवली आहे!” अर्थात लवकरच हा गैरसमज दूर झाला. याच वर्षी शम्मी कपूर यांच्या मुलीचे मनमोहन देसाई यांच्या मुलाशी केतन देसाई शी लग्न झाल्याने ऋषी आणि मनजी नातेवाईक बनले! याच काळात यश चोप्रा यांच्या ‘त्रिशूल’ चे चित्रीकरण चालू होते. सलीम जावेद यांनी ऋषीला या चित्रपटात भूमिका ऑफर केली होती.पण ऋषी ने नकार दिला त्यावर सलीम जावेद नाराज झाले आणि त्यांच्यात वाद देखील झाला. पण या वर्षी सलीम – जावेद यांचा ‘इमान धरम’ हा चित्रपट फ्लॉप झाला त्यावेळी दारूच्या नशेत ऋषी ने सलीम जावेद यांना डिवचले होते.अर्थात यात सत्याचा भाग किती हे माहित नाही!

या सिनेमात शबाना आझमी यांचा प्रवेश सर्वात शेवटी झाला. सुरुवातीला विनोद खन्ना या चित्रपटात नायिका नव्हतीच. मनजी यांना त्यात विनोदला दमदार पोलीस ऑफिसर दाखवायचे होते.पण विनोद ने स्वत:च आग्रह धरल्याने शबाना ला नायिकेची भूमिका दिली गेली. या सिनेमात ऋषी कपूर – नीतू सिंग हि युवा पिढीची हिट पेयर होती. त्या वेळी त्यांची प्रेमकहाणी रंगात होती. एका प्रसंगात ऋषीने चुकून  तिला ‘नितू’ अशीच हाक मारली आहे!एडिटिंग मध्ये देखील हि चूक तशीच राहिली.चित्रपटात प्राण, जीवन, निरुपा रॉय, नादिरा, हेलन,जीवन , नाझीर हुसैन हि बुजुर्ग मंडळी होती. अमिताभ ची नायिका परवीन बॉबी होती. यात या तिन्ही जोडीवर चित्रित  ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’ हे गाणे होते. हे गाणे किशोरकुमार, महंमद रफी, मुकेश आणि लता मंगेशकर या प्रमुख गायकांनी गायले होते. या चौघांनी गायलेले हे एकमेव गीत आहे. किशोर चा स्वर अमिताभ ला रफीचा स्वर ऋषीला तर मुकेश चा स्वर तर तीनही नायिकांसाठी लताचा स्वर होता! हे त्या मुळे खूप ऐतिहासिक गाणे ठरले. यातील ‘माय नेम इज अँथनी गोन्सालवीस’ हे अमिताभवर  चित्रित गाणे इस्टर सॉंग किशोरकुमार याने गायले होते. यातील सुरुवातीचे काही संवाद “You are a sophisticated rhetorician intoxicated with the exuberance of your own verbosity”अमिताभ च्या स्वरात होते. त्याची हि टिपिकल इंग्लिश बडबड त्या काळी खूप लोकप्रिय झाली होती. वस्तुतः इंग्लंड चे प्रधान मंत्रीBenjamin Disraeliयांनी १८७८ साली संसदेत केलेल्या भाषणाच्या काही ओळी होत्या. अँथनी नावाचा एक ख्रिश्चन दारुडा गिरगावात मनजी यांच्या घराजवळ राहत होता. त्याच्यावरूनच हे पात्र त्याना सुचले होते. या गाण्याच्या ओळी सुरुवातीला माय नेम इज अँथनी फर्नांडीस ‘ अशा होत्या. आनंद बक्षी यांनी तसेच गाणे लिहिले होते. पण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना संगीताच्या दुनियेतील मूळचे गोव्याचे सिनियर म्युझिक अरेंजर अँथनी गोन्सालवीस हे नाव आठवले. या जोडीच्या सुरुवातीच्या काळात त्याना अँथनी गोन्सालवीस यांची खूपमदत झाली होती. त्या कृतज्ञतेच्या पोटी त्यानी शब्द रचना बदलायला लावली आणि हे गाणे तयार झाले.

चित्रपटात ऋषी कपूर यांची भूमिका ‘कव्वाली सिंगर’ ची होती. रफीच्या स्वरातील ‘परदा है परदा’ हि कव्वाली जबरा हिट ठरली. या कव्वालीत रेकॉर्ड वर नसणाऱ्या पण पडद्यावर दिसणाऱ्या दोन ओळी होत्या. कव्वाली च्या कडव्याच्या शेवटी अमिताभ उठून ‘ तो तो तो अकबर तेरा नाम नही ‘ म्हणतो. या ओळी कुणी गायल्या या बाबत मत मतांतरे आहेत . काहींच्या मते या ओळी किशोर  कुमार यांनी गायल्या तर काहींच्या मते स्वत: अमिताभने! यातील ‘शिरडीवाले साईबाबा ‘हि कव्वाली पण रसिकांच्या पसंतीस उतरली. याचे चित्रीकरण मनमोहन देसाई यांना शिर्डी ला मंदिरात करवयाचे होते पण त्याची परवानगी नाकारल्याने ते एका स्टुडीओत सेट उभारून चित्रित करण्यात आले. याने गंमतच झाली . रशियातील एक प्रेक्षक खास शिर्डीला येवून गाण्याच्या चित्रीकरणाचा स्पॉट शोधू लागला होता! या सिनेमात मुक्री या विनोदी अभिनेत्याने नीतू च्या अब्बाजान च्या भूमिकेत मझा आणली होती. ‘तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय ‘ हे गाणे तृतीयपंथीया सोबत चित्रित झाले. या सिनेमाचे चित्रीकरण वडाळा येथील डॉन बॉस्को स्कूल तसेच बांद्रा येथील माउंट मेरी चर्च आणि कमलीस्तान, रणजीत  आणि आर के स्टुडीओत झाले. या सिनेमातील डॉयलॉग आजही बॉलीवूड मध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ‘ऐसा तो आदमी लाईफ में दो बारीच भागता है एक तो ऑलिम्पिक का रेस हो या पुलिस का केस हो’ किंवा ‘आपन ने हि एक हि मारा लेकीन सॉलिड मारा ना” ( हा  डॉयलॉग मध्यंतरी राजकीय वर्तुळात खूपच लोकप्रिय ठरला होता!)

समीक्षकांनी या चित्रपटाला भरपूर नावे ठेवली अर्थात मनमोहन देसाई यांचे चित्रपट म्हणजे मेंदू घरी ठेवून सिनेमा पाहावा असे असायचे त्यात लॉजिकला फारसं स्थान नसायचे. सामान्य प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन हा त्यांच्या सिनेमाचा पाया होता.  या चित्रपटातील चमत्कार तर अजिबो गरीब असे होते!  साईबाबाच्या आशीर्वादाने दोन ज्योति येऊन निरुपा राय यांच्या डोळ्यात जातात आणि त्यांना दृष्टी येते !  तसेच चित्रपटाच्या सुरुवातीला अमर अकबर अँथनी हे तिघे  हे रक्तदान करतात आणि ते रक्त थेट पाइपलाइन मधून आईला दिले जाते असे हास्यास्पद प्रसंग देखील या सिनेमात भरपूर होते. अर्थात हा सिनेमा देसाई यांनी नेहमी  प्रमाणे आम आदमी डोळ्यापुढे ठेवून काढल्यामुळे त्यात तसं कुणाला फारसं वावग वाटत नव्हतं! आपल्याकडे मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी ज्या पद्धतीने सामान्य प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून चित्रनिर्मिती केली तसाच काहीसा प्रकार मनमोहन देसाई यांच्या चित्रपटांच्या बाबतीत होता. समीक्षकांनी (नेहमी प्रमाणे)या चित्रपटाला भरपूर नावे ठेवली. टाइम्स ऑफ इंडिया ने तर चित्रपटाला  पाच पैकी केवळ एक स्टार दिला! तर फिल्म फेयर नियतकालिकाने तर  या चित्रपटाची कथा मूर्खपणाचा कळस आहे अशी मल्लीनाथी केली! गंमत म्हणजे याच फिल्म फेयर ने वर्षाअखेरीस दिलेल्या पारितोषिकात या चित्रपटाला भरपूर नामंकन आणि पारितोषिके मिळाली. सामान्य जनता हि समीक्षकांची मते वाचून चित्रपट पाहायला जात नाही. सिनेमाची गरज हि प्रत्येकाची वेगवेगळी असते हेच खरे.

पूर्वी म्हटल्याप्रमाणे या सिनेमाच्या वेळी देशात आणीबाणी चा काळ चालू होता त्यामुळे चित्रपटातील हिंसा ,मारधाड , सेक्स, राजकीत टीका टिप्पणी , मद्यपान यावर सेन्सर बोर्डाची मोठी नजर असायची.मनमोहन  देसाई यांचे चित्रपट या काळात प्रदर्शित झालेच नाहीत.  पण मार्च १९७७ मध्ये  देशात सत्तांतर झाले आणीबाणी संपुष्टात आली. त्यानंतर एका महिन्याच्या अवधीतच २७  मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज इतक्या वर्ष नंतर जेव्हा आपण या चित्रपटाच्या एकूणच कामगिरीबाबत आणि सिनेमाच्या impact बाबत  एकत्रित विचार करतो त्यामुळे असे लक्षात येते की सामान्य व्यक्तीला चित्रपट हे माध्यम त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील सुखदुःख विसरायला लावणारे , त्याला घडीभर त्याच्या चिंता/ काळजी पासून दूर नेणारे माध्यम वाटत त्यामुळे भले ही  समीक्षकांनी या चित्रपटावर जहरी टीका केली असली तरी या चित्रपटाने भारतभर मिळवलेल्या मोठ्या  यशा कडे डोळेझाक करता येत नाही.

या सिनेमाने मनोरंजनाची व्याख्या अधिक व्यापक आणि स्पष्ट केली.  या सिनेमाने मुंबईत अनेक थिएटर मध्ये सुवर्णमहोत्सवी यश संपादन केले. अमेरिकेच्या एका विद्यापीठात तर या सिनेमाच्या सक्सेस स्टोरी चा त्यांच्या अभ्यासक्रमात  समावेश केला गेला. भारतात देखील या सिनेमाला Cult Classic चा दर्जा मिळाला आहे. या सिनेवर काही पुस्तके देखील आली आहेत. अमिताभ बच्चन यांना या सिनेमा साठी पहिले फिल्म फेयर अवार्ड मिळाले. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना देखील फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. अमिताभचा  अँग्री यंग मॅन चा प्रवास या चित्रपटानंतर देखील चालूच राहिला परंतु या चित्रपटानंतर ‘कम्प्लीट इंटरटेनर’ ही त्याची इमेज झाली. मनमोहन देसाई यांच्या पुढील देश प्रेमी, नसीब, कुली, मर्द , गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाचा तोच नायक होता. पुढचे दशक भात्र हि युती गाजत राहिली. अमिताभ बच्चन विनोद खन्ना आणि ऋषी कपूर या तिघांना घेऊन मनमोहन देसाई आणखी एक चित्रपट तयार करायचा आहे परंतु या चित्रपटातील यशाचा आणि यशाच्या शिल्पकाराचा फोकस पूर्णपणे अमिताभ वर राहिल्याने साहजिकच विनोद खन्ना ने नकार दिला. मन जी यांनी कथानकात थोडेफार बदल करून गंगा जमुना सरस्वती हा सिनेमा बनवला पण त्याला यश लाभले नाही.

खैर आज ‘अमर अकबर अँथनी’ हा सिनेमा प्रदर्शित होवून ४५ वर्षे पूर्ण होताहेत त्या निमित्ताने त्याच्या निर्मितीची कहाणी!

 

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment