८० व ९० च्या दशकात दक्षिणेत तिची ओळख लेडी अमिताभ अशी होती. अँग्री यंग वुमन च्या तिच्या एकानंतर एक सुपरहिट भूमिकांनी तिला तामिळ आणि तेलगू सिनेमाचे लेडी सुपरस्टार पद बहाल केले होते. १९६६ साली आजच्या दिवशी चेन्नई येथे जन्मलेल्या विजयाशांती (Actress Vijayashanti) या तशा मूळच्या तेलंगणाच्या. १० वी पर्यंतचे शिक्षण चेन्नईत पूर्ण करून त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. १९८० साली वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने सिनेसृष्टीत पाऊल टाकले व नंतर केवळ १० वर्षातच, म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय सन्मान मिळविला. चित्रपट होता तेलगू भाषेतील कर्तव्यम, ज्याचा ४ वर्षांनी हिंदी रिमेक निघाला ‘तेजस्विनी’. आज त्या तेजस्विनीचा अर्थात प्रतिभासंपन्न अभिनेत्री विजयाशांतीचा वाढदिवस. (Birthday Wishes to Finest South Indian Actress Superstar Vijayashanti)

हिंदी सिनेमात ज्यांच्या नावावर फार कमी सिनेमे आहेत अशा दाक्षिणात्य अभिनेत्रींची आपल्याकडे क्वचितच दखल घेतली जाते. आंध्र प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा नंदी पुरस्कार विजयाशांती यांनी १९८५ साली पहिल्यांदा मिळविला, तो सिनेमा होता प्रतिघातना. दिग्दर्शक एन चंद्रा यांनी ‘प्रतिघात’ नावाने याचा हिंदी रिमेक बनविला ज्यात विजयाशांती यांची भूमिका सुजाता मेहता या अभिनेत्रीने साकारली होती. या सिनेमासाठी विजयाशांती यांना त्यांचे दक्षिणेतील पहिले फिल्मफेअर पारितोषिक सुद्धा मिळाले होते. हा सिनेमा खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला होता.

विजयाशांती यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे राज्य सरकारचे ४ नंदी पुरस्कार तर ६ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ९० च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांचा एवढा दबदबा होता की सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांच्या एवढे मानधन घेणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या. हिंदीत मात्र त्या काही रमल्या नाहीत. ईश्वर (१९८९) या चित्रपटात अनिल कपूर सोबत प्रथम दर्शन दिले. यातील त्यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. मुकद्दर का बादशाह, अपराधी या दोन सिनेमांनंतर हिंदीत त्यांचा एकमेव गाजलेला सिनेमा म्हणजे एन चंद्रा दिग्दर्शित ‘तेजस्विनी’ ज्याच्या मूळ ‘कर्तव्यम’ सिनेमाने त्यांना राष्ट्रीय सन्मान मिळवून दिला होता.

प्रामाणिक व आक्रमक लेडी इन्स्पेक्टर च्या अनेक भूमिका त्यांनी दक्षिणेत केल्या व त्या सर्व रसिकांनी डोक्यावर घेतल्या. ‘कर्तव्यम’ ने तर १९९० साली जवळपास ७ कोटींच्या वर बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती.  दक्षिणेतील त्या अशा दुर्मिळ अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांना त्यांच्या करिअरमध्ये ग्लॅमरस कमी व महिलाप्रधान व त्यांच्या अभिनय प्रतिभेचा कस लागणाऱ्या भूमिका अधिक मिळाल्या. ‘नेती भारतम’ या १९८३ सालच्या चित्रपटाने प्रकाशझोतात आल्यानंतर जवळपास १० ते १२ वर्षे त्यांनी नायिका म्हणून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अक्षरशः राज्य केलं आहे. तामिळ आणि तेलगू सोबत कन्नड व मल्याळम चित्रपटांमधूनही त्या चमकल्या. १९९८ नंतर मात्र त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळविला. 

२००२ साली तामिळनाडू सरकारने त्यांचा कलाईममणी या तामिळ सिनेमातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान केला तसेच २००४ साली फिल्मफेअरने त्यांना लाइफटाईम सन्मान बहाल केला. त्यांच्या अभिनय प्रवासाला आता तब्बल ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२० साली चरित्र भूमिकांच्या माध्यमातून त्या चित्रपटसृष्टीत परतल्या आहेत. त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. हॅप्पी बर्थडे विजयाशांतीजी. 

हेही वाचा- वाढदिवस गरिबांच्या अमिताभचा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment