गलियों का बादशाह, मेरी जुबान, मिल गई मंझिल मुझे, बीस साल बाद, गुरु, आखरी बदला, हम इंतजार करेंगे, इलाका, प्रेम प्रतिग्या, गरीबो का दाता, मुजरीम, दाता, आखरी गुलाम, हिसाब खून का, दोस्त, दाना पानी, लडाई, भ्रष्टाचार ही केवळ काही चित्रपटांची नावे आहेत असे समजू नका. ही आहेत १९८९ या एकाच वर्षात रिलीज झालेल्या एकाच अभिनेत्याच्या तब्बल १८ चित्रपटांची, ज्याची नोंद घेतली गेली आहे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आणि आजही हा रेकॉर्ड कोणी अभिनेता तोडू शकलेला नाही. हा रेकॉर्ड बनविणारा अभिनेता आहे मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty). एकाच वर्षात तब्बल १८ चित्रपट! आज मिथुनदांचा वाढदिवस. (Happy Birthday Mithun Chakraborty)

चक्रवर्ती यांचा जन्म बंगालमधील बरीशाल येथे गौरांगो चक्रवर्ती म्हणून १६ जून १९५० रोजी  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बसंत कुमार चक्रवर्ती आणि आईचे नाव शांती राणी चक्रवर्ती आहे.  त्यांनी ओरिएंटल सेमिनरीमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर कोलकाता मधील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून बी.एस्सी (रसायनशास्त्र ) ही पदवी घेतली. त्यानंतर ते पुणे येथील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे शिक्षण घेऊन पदवीधर झाले. चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी ते नक्षलवादी होते. 

१९७६ साली ‘मृगया’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातील आदिवासी तरुणाच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे मिथुनदा. हिंदी, बंगाली, ओडिसा, भोजपुरी, तामिळ, तेलगू, कन्नड व पंजाबी या सर्व भाषांमधून तब्बल ३५० चित्रपटात मिथुनदांनी भूमिका साकारल्या आहेत. हा पण एक रेकॉर्डच आहे. १९९२ सालच्या ‘तहदेर कथा’ नामक बंगाली चित्रपटातील स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेसाठी मिथुनदांना दुसरे तर १९९८ च्या ‘स्वामी विवेकानंद’ या चित्रपटातील रामकृष्ण परमहंस या भूमिकेसाठी तिसऱ्यांदा मिथुनदांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

 

‘गरिबांचा अमिताभ’ अशी पण एक ओळख आहे मिथुनदांची. ८० च्या दशकात व्यावसायिक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या जवळपास सर्वच भूमिका या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या एका गरीब नायकाच्या होत्या आणि त्यामुळेच त्यांना या विशेषणाने ओळखले जाते. गरिबांचा अमिताभ बच्चन असे विशेषण मिथुनदांना त्यांच्या चाहत्यांनीच बहाल केले आहे. १९८२ साली आलेल्या ‘डिस्को डान्सर’ने मिथुनदांना पहिले यश व ओळख मिळवून दिली. मिथुनदा हे कमालीचे डान्सर आहेत व त्यांची नाचाची एक विशेष शैली प्रसिद्ध आहे. ८० च्या दशकात त्यांच्या गाजलेल्या चित्रपटात ‘डान्स डान्स’, ‘प्यार झुकता नही’, ‘सुरक्षा’, ‘बॉक्सर’, ‘प्रेम प्रतिग्या’, ‘मुजरीम’ इत्यादी काही चित्रपटांचा समावेश होता. १९८० चे अख्खे दशक मिथुनदांनी गाजविले, या दशकात त्यांच्या नावावर ११० चित्रपटांची नोंद आहे.

१९९० सालच्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील मिथुनदांनी रंगविलेली ‘कृष्णन ऐय्यर एम.ए.’ ही त्यांच्या करिअरमधील अविस्मरणीय भूमिकांपैकी एक भूमिका आहे. यासाठी मिथुनदांनी फिल्मफेअर अवॉर्ड पण प्राप्त झाले होते. १९९५ सालच्या ‘जल्लाद’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायकही तितकाच अविस्मरणीय होता व त्या भूमिकेसाठी सुद्धा मिथुनदांना फिल्मफेअर मिळाले होते.

चरित्र भूमिकांपैकी २००७ सालच्या ‘गुरु’ या मणिरत्नम यांच्या चित्रपटातील, माणिक दासगुप्ता या त्यांच्या एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. अशात ‘गोलमाल-३’ चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिकाही खूप गाजली. चित्रपटात येण्यापूर्वी नक्षलवादी चळवळीचा भाग असलेला तरुण ते राज्यसभेचा खासदार हा मिथुनदांचा प्रवास थक्क करणारा आहे. शिक्षण व मेडिकल क्षेत्रात त्यांचे अविरत समाजकार्य चालू असते. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर लोकांसाठी ते सातत्याने लढत असतात. १९९२ मध्ये त्यांनी दिलीप कुमार आणि सुनील दत्त यांच्यासमवेत सिने अँड टी.व्ही. आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) नावाचा गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला. सिनेमातील कामगारांच्या हिताची काळजी घेणाऱ्या  आणि त्यांच्या मागण्या व समस्या सोडवणार्‍या फिल्म स्टुडिओ सेटींग अँड अलाइड मजदूर युनियनचे ते अध्यक्ष होते.

आज मिथुनदा ७१ वर्षांचे झालेत तरीही त्याच जोशात कार्यरत आहेत. त्यांना सदैव चांगले आरोग्य व दीर्घायु लाभो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.