आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Amrita Khanvilkar to play ‘Lalita Shivaji Babar’. जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘ललिता बाबर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ”एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” साताऱ्यातील एका लहान गावात, शेतकरी कुटुंबात ललिता बाबर यांचा जन्म झाला. ललिता बाबर यांच्या प्रवासाला त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात झाली. त्या रोज शाळेत धावत जात असत आणि तिथूनच त्यांनी आपला धावण्याचा सराव सुरु केला. त्यांच्या या मार्गात अनेक अडथळे आले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. आज संपूर्ण जगात त्या ‘माणदेशी एक्सप्रेस’ या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकालाच नवीन ऊर्जा देणारा आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर झळकवून आम्ही त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत आहोत.’’ 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment