– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Pathaan Movie Review

कथानक थोडक्यात – भारतीय सैन्यातून काही कारणांनी वेळेआधी निवृत्त झालेल्या सैनिकांचा देशविरोधी शक्तींच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्तचर पद्धतीने ऑपरेशन्स करण्यासाठी म्हणून बनवलेल्या ग्रुपचा एका सदस्य आहे पठाण (शाहरुख खान). काश्मीरमध्ये भारत सरकारने आर्टिकल ३७० हटवल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून पाकिस्तानमधील आयएसआय ही संघटना जिम (जॉन अब्राहम) ला संपर्क करते आणि भारतात दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी देते. जिम ची ओळख कॉन्ट्रॅक्ट घेऊन दहशतवादी कारवाया करणारा अशी जरी असली तरी त्याने याआधी भारतीय गुप्तहेर संघटना रॉ साठी गुप्तहेर म्हणून काम केलं आहे. एका ऑपरेशन्स मध्ये त्याच्या पत्नीचा जीव गेल्याने व भारतीय सरकारने त्याची जबाबदारी नाकारल्याने आता जिम भारताचा बदला घेण्यासाठी आसुसलेला आहे. भारतातर्फे जिम ला थांबविण्याची जबाबदारी अर्थातच पठाण वर येऊन पडते. या ऑपरेशन मध्ये त्याला मदत करीत असते पाकिस्तानच्या आयएसआय ची सदस्य रुबिना खान (दीपिका पदुकोण). मदत करीत असतांना ऐन मोक्याच्या वेळी रुबिना पठाण ला धोका देत जिम कडे परतते. परतते? हो, रुबिना परतते कारण रुबिना ही जिमसाठी सुद्धा काम करत असते. रुबिना असे का करते? ती खरंच जिमला मदत करत असते का तेही नाटक असते ? आणि पठाण पुढे या ऑपरेशन मधून भारताला कसा वाचवतो हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ नंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद चा हा तिसरा ऍक्शन चित्रपट आहे. यशराज फिल्म्स ने या चित्रपटाद्वारे त्यांच्या स्पाय-युनिव्हर्स ची घोषणा केली आहे. म्हणजे वॉर चा कबीर (ह्रितिक रोशन), एक था टायगर चा टायगर (सलमान खान) आणि आता पठाण चा पठाण (शाहरुख खान) या तीन गुप्तहेरांच्या अवतीभोवती फिरणारे कथानक आणि या सर्वांच्या एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ एंट्रीज आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहेत. यातही सलमान खान ची एका ऍक्शन सीन मध्ये पठाण च्या मदतीला धावणारा मित्र म्हणून एंट्री आहे. कथेत नावीन्य अजिबात जरी नसले तरी पटकथा अत्यंत वेगवान पद्धतीने पुढे सरकत जाते त्यामुळे चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही. ऍक्शन दृश्यांचे चित्रीकरण अत्यंत परिणामकारक आहे. एकंदरीत पूर्ण चित्रपटाचे छायांकन नेत्रदीपक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे जे प्रेक्षकांना चित्रपटाला खिळवून ठेवण्याचे एक प्रमुख कारण आहे. सिनेमातील बरीचशी/बहुतांश दृश्ये लॉजिक विरहीत आहेत पण तरीही त्याचे मसालेदार सादरीकरण आणि त्याला दिलेली संवादांची फोडणी खासकरून मास ऑडियन्स ला अनेक ठिकाणी टाळ्या आणि शिट्ट्या मारण्यास उद्युक्त करणारी आहेत. अभिनयाच्या बाबतीत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम या दोघांचीही कामे छान झाली आहेत. दीपिका पदुकोण पण ठीक. डिम्पल कपाडिया यांनी साकारलेली सिक्रेट युनिट हेड ची भूमिका लक्षात राहते. ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे जो पठाण’ ही दोनही गीते ऑलरेडी हिट झाली आहेत पण गीत-संगीताच्या बाबतीत चित्रपट जरा कमीच पडला आहे.

 

नावीन्य काय?- काहीच नाही. कथानकात तोंडी लावण्यापुरते सुद्धा नावीन्य नाही. इतर निर्मात्यांचे सोडा पण यशराज फिल्म्स चेच या आधीचे धूम, एक था टायगर, वॉर या धर्तीवरील हा चित्रपट कथानकात काही एक नावीन्य देत नाही. शिवाय अनेक (खासकरून ऍक्शन दृश्यात) अत्यंत पोरकट व लॉजिकला फाट्यावर मारणारी दृश्ये आहेत. केवळ वेगवान पटकथा, त्याचे मसालेदार सादरीकरण, नेत्रदीपक छायांकन, शाहरुख खानचा स्क्रीन प्रेझेन्स यावर स्टार्ट टू एन्ड चित्रपट तुम्हाला बांधून ठेवतो.

कुठे कमी पडतो? – लॉजिक. अर्थात ही बॉलिवूडसाठी आता नेहमीचीच बाब झाली आहे. अशा प्रकारच्या मसाला चित्रपटात असेही कोणी लॉजिक बघायला जात नाही हेही तितकेच खरे जरी असले तरी इथे कथा एका गुप्तहेराची आहे आणि त्यामुळे पटकथेत असे हास्यास्पद लूप-होल्स असणे अपेक्षित नाही म्हणून.

पहावा का?- एकदा बघायला हरकत नाही. तुम्ही शाहरुख-सलमान मंडळींचे कट्टर चाहते (अजूनही) असाल तर लॉजिकला घरी ठेऊन मगच सिनेमागृहात प्रवेश करा. टाईमपास नक्की होईल.

स्टार रेटींग – ३ स्टार.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment