आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
After the Success of the Movie ‘Maherchi Sadi’, Director Vijay Kondke is coming with New Movie ‘Lek Asavi Ter Ashi’
ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.
विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली माहीत असलेले विजय कोंडके ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या रंजनासाठी घेऊन सज्ज झाले आहेत.
निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याच्या इच्छेतून आणि दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले. यशापलीकडे या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी २६ एप्रिलला घेऊन येतोय.