श्याम बेनेगलच्या ‘अंकुर’, नसीरुद्दीन शाह स्टारर ‘जाने भी दो यारो’ अशा अनेक चित्रपटांसाठी प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया (Vanraj Bhatia) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.  भाटिया यांना तमस (१९८८) या दूरदर्शनवरील मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्जनशील व प्रायोगिक संगीतासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९)) आणि भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री (२०१२) प्राप्त झाला होता. (Legendary Music Composer Vanraj Bhatia passes away)

भाटिया यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित अंकुर (१९७४) या सिनेमाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. भाटिया यांनी मुख्यत: त्या काळात भारतीय सिनेमात ज्यांनी समांतर/प्रायोगिक व कलात्मक  सिनेमांची नवीन चळवळ सुरु केली अशा चित्रपट निर्मात्यांसह काम केले, जसे की गोविंद निहलानी (तमस), कुंदन शाह (जाने भी दो यारो), अपर्णा सेन ( 36 चौरंगी लेन), सईद अख्तर मिर्झा (मोहन जोशी हाजीर हो!), कुमार शहानी (तरंग), विधू विनोद चोपडा (खामोश), विजया मेहता (पेस्टोनजी) आणि प्रकाश झा (हिप हिप हुर्रे). शिवाय ९० च्या दशकात बहतीया यांनी  अजुबा, दामिनी आणि परदेस यासारख्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिले होते. भाटिया यांनी खानदान, यात्रा, वागले की दुनिया, बनेगी अपनी बात आणि जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ वर आधारित ‘भारत एक खोज’ सारख्या दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच असंख्य माहितीपट साकारले आहेत.

कच्छी व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या वनराज भाटिया यांनी मुंबईतील न्यू एरा स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि देवधर स्कूल ऑफ म्युझिकमध्ये विद्यार्थी म्हणून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले. १९४९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून एमए (इंग्लिश ऑनर्स) मिळवल्यानंतर भाटिया यांनी लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक येथे संगीताचा  अभ्यास केला, जेथे ते सर मायकेल कोस्टा शिष्यवृत्तीचे पदवीधर होते. १९५९ मध्ये भारतात परत आल्यावर भाटिया हे जाहिरातीसाठी (शक्ती रेशीम साड्यांसाठी) संगीत देणारे पहिले व्यक्ती ठरले आणि  लिरिल, गार्डन वरेली आणि ड्युलक्स सारख्या एकूण ७००० जिंगल्सची रचना त्यांनी केली आहे. 

Website | + posts

Leave a comment