अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Vikram Vedha Movie Review. २००७ साली लेखक-दिग्दर्शक म्हणून तामिळ सिनेमात प्रवेश करणारी नवरा-बायकोची जोडी म्हणजे पुष्कर-गायत्री. सिनेमाचे नाव होते ‘ओरम पो’ जो एक विनोदी सिनेमा होता. २०१० साली आलेल्या त्यांच्या ‘वा क्वार्टर कटिंग’  या ब्लॅक कॉमेडी सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळवले पण त्यानंतर ही जोडी त्यांच्या पुढील सिनेमाच्या पटकथेवर तब्बल ५ वर्षे काम करीत होती. या पटकथेवर त्यांनीच दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आणखी दोन वर्षे गेली व अखेर २०१७ च्या जुलै महिन्यात आर माधवन व विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘विक्रम वेधा’ हा तामिळ सिनेमा प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही या सिनेमाने अक्षरशः वेड लावले. तामिळ सिने-इंडस्ट्रीत फिल्मफेअर सह जेवढे काही पुरस्कार दिले जातात, त्या सर्व पुरस्कारांमध्ये मिळून, विविध श्रेणीत तब्बल ४४ नामांकनं विक्रम वेधा ला मिळाली होती त्यापैकी २० एक पुरस्कार या चित्रपटाने खिशात घातले होते. आज या सिनेमाची गिनती तामिळ सिनेमाच्या कल्ट क्लासिक सिनेमामध्ये होते. तर अशा या विक्रम वेधा ची अधिकृत हिंदी आवृत्ती, ह्रितिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिकेत आज प्रदर्शित झाली आहे जिचे दिग्दर्शन स्वतः पुष्कर-गायत्री यांनीच केले आहे.

विक्रम वेताळ च्या सुप्रसिद्ध कथांना आधार मानून विक्रम वेधाचे कथानक रचण्यात आले आहे हे आता मूळ तामिळ सिनेमाची हिंदी डब आवृत्ती बघितलेल्या बहुतांश सिने-रसिकांना  माहीत आहेच. इथे विक्रम राजाच्या ऐवजी एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे विक्रम (सैफ अली खान) आणि वेताळ च्या जागी आहे लखनौ येथील एक कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड  गँगस्टर वेधा (ह्रितिक रोशन) ज्याच्या खात्यावर आतापर्यंत शेकडो हत्या जमा आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांची टीम एके दिवशी वेधाला पकडण्यासाठी निघालेले असतांना अचानकपणे वेधा स्वतः पोलीस मुख्यालयात येऊन आत्मसमर्पण करतो. चौकशीत इतर अधिकाऱ्यांसमोर काहीही न बोलणारा वेधा विक्रम ला मात्र एका १४ वर्षांपूर्वी घडलेली एक सत्य कथा सांगतो आणि त्यावरून चूक कोण बरोबर कोण अशा आशयाचे प्रश्न विचारतो. याचवेळी विक्रम ची पत्नी प्रिया (राधिका आपटे) जी स्वतः एक वकील आहे ती वेधा च्या जामिनाचा आदेश घेऊन हजर होते जो विक्रमासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्का असतो. यावरून प्रिया आणि विक्रम मध्ये दुरावा निर्माण होतो. काही दिवसानंतर वेधा परत एकदा विक्रम च्या हाती लागतो आणि विक्रम त्याचे एन्काउंटर करणार तितक्यात वेधा त्याला आणखी एक तीन वर्षांपूर्वीची सत्यकथा ऐकवतो जी ऐकून विक्रमला पुन्हा एक मोठा धक्का बसतो आणि त्याचवेळी वेधा पुन्हा त्याच्या तावडीतून निसटतो. कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात आल्यावर वेधा त्याला अखेरचे सत्य सांगतो ज्याने विक्रमला त्याच्याच सोबत असलेल्या सहकाऱ्यांबाबतीत अत्यंत धक्कादायक सत्य कळते आणि वेधा ने विचारलेल्या सर्व प्रश्नांचा रोख कुठल्या दिशेने होता हे सुद्धा समजते. त्या कथा कुठल्या हे सिनेमा पाहिलेल्या बहुतांश रसिकांना माहित आहेच पण ज्यांनी पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हे रहस्य इथे उलगडून सांगणे योग्य नाही.

आता एक साहजिक असा प्रश्न कोणाच्याही मनात येणार. मूळ तामिळ सिनेमा हिंदीत डब करून ओटीटी, यु-ट्यूब अथवा टीव्ही वर पाहिलेला असेल तर मग हा हिंदीतला रिमेक असलेला सिनेमा का बघावा? तेही त्याच दिग्दर्शक जोडीने बनविलेला आणि मूळ कथानकात कुठेही काहीही बदल ना करता अगदी जसाच्या तसा असलेला.अगदी आज जेंव्हा हा हिंदी सिनेमा प्रदर्शित झालाय अगदी त्याच दिवशी स्टार गोल्ड या वाहिनीवर हा हिंदी डब सिनेमा सुरु आहे. या साहजिक प्रश्नाचे उत्तर बघावा असे असेल तर नक्कीच हा हिंदी रिमेक त्याच्या तोडीचा किंवा त्यापेक्षा सरस असणे आवश्यक ठरते. तर तो तसा आहे का असे विचाराल तर मी म्हणेल हो, आहे त्याच्या तोडीचा. काही सीन्स मध्ये तर याचे मेकींग त्याहीपेक्षा लॅव्हिश आणि ग्रँड आहे. निर्मिती मूल्ये नक्कीच आज प्रदर्शित हिंदी रिमेकची जास्त आहेत. दिग्दर्शक जोडी तीच असल्याने चित्रपट सीन टू सीन अगदी कॉपी-पेस्ट आहे.

पटकथा अत्यंत वेगवान असून पहिल्या फ्रेमपासून ते अगदी अखेरच्या फ्रेमपर्यंत ती तुम्हाला अगदी बांधून ठेवते. त्यात पुष्कर-गायत्री यांचे अफलातून दिग्दर्शन, सॅम सी एस यांचे जबरदस्त पार्श्वसंगीत (खासकरून ह्रितिक म्हणजेच वेधा स्क्रीनवर असतानाचे), पी एस विनोद यांचे सुंदर छायांकन आणि परवेझ शेख यांनी दिग्दर्शित केलेले ऍक्शन सीन्स म्हणजे सोने पे सुहागा आहेत. मनोज मुंतशीर आणि बेनझीर अली फिदा यांनी लिहिलेल्या खरपूस संवांदांचा इथे विशेष उल्लेख आणि मनापासून कौतुक करावे लागेल. आवश्यकता नसताना घातलेले अल्कोहोलिया हे गाणे मात्र काही जमलेले नाही.  सिनेमाच्या अंती कथानकाचे पुनरावलोकन केल्यावर लक्षात येते की कथेत तसे काही फारसे नावीन्य नाही मात्र लेखक-दिग्दर्शकाची कथानक सांगण्याची शैली मात्र खूपच वेगळी, नावीन्यपूर्ण, रोमांचक आणि विलक्षण आहे ज्यात अखेरच्या दृष्यापर्यंत एकानंतर एक गौप्यस्फोट होतच राहतात आणि हाच विक्रम वेधा चा यूएसपी (युनिक सेलिंग पॉईंट) आहे.

अशा वेगळ्या धाटणीच्या कथनशैलीला ह्रितिक आणि सैफ या दोघांच्याही अभिनयाने अत्यंत सुंदर सजवले आहे. मूळ सिनेमातील आर माधवन आणि विजय सेतुपती हे तर अफलातून आहेतच पण ह्रितिक आणि सैफ यांनी सुद्धा झकास काम केले आहे. ह्रितिकसाठी हा सिनेमा त्याच्या करिअरमधील माईलस्टोन ठरावा इतका त्याने रंगतदार केला आहे. त्यामानाने सैफ काहीसा संयमित वाटतो. राधिका आपटे ने सुद्धा लहानशी का होईना पण तिची भूमिका तिच्या नेहमीच्या शैलीत अगदी सहजतेने साकारली आहे. इतर कलाकारांमध्ये ह्रितिकच्या भावाच्या भूमिकेत रोहित सराफ आणि बबलू च्या भूमिकेत शारीब हाश्मी दोघेही छान.

विक्रम वेधा चा आत्मा त्याची दमदार पटकथा आणि नावीन्यपूर्ण कथनशैली आहे. दिग्दर्शक जोडी तीच असल्याने या आत्म्याला अजिबात धक्का लागलेला नाही. त्यामुळे मूळ तामिळ आवृत्ती आवडणाऱ्यांना सुद्धा हा हिंदी रिमेक निराश करणार नाही याची खात्री वाटते. बाकी कोक चांगला कि पेप्सी किंवा पेप्सी चांगली की थम्स अप अशा चर्चांना अंत नसतो. नक्की आनंद घ्यावा असा विक्रम वेधा नक्कीच आहे. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment