– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
“बोलायला बोल का पाहिजे,
सांगायला शब्द का पाहिजे,
डोळ्यातळी खोल बुडवून ही,
घेऊन चल तु जिथे… जिथे पाहिजे…”
Medium Spicy Movie Review. गीतकार जितेंद्र जोशी लिखित एका गीताच्या या सुरुवातीच्या ओळी. हे गीत आहे काल प्रदर्शित झालेल्या ‘मीडियम स्पायसी’ या मराठी चित्रपटातील. मध्यंतरानंतर काही वेळाने येणारे हे गीत चित्रपटाच्या कथेचे, त्याच्या सादरीकरणाचे आणि कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या नायक आणि नायिकेच्या व्यक्तिरेखेचे यथार्थ वर्णन करते. शहरी भागातल्या, त्यातही विशेषत्वाने पुण्या-मुंबईसारख्या, मेट्रो शहरातील प्रेक्षकांना समोर ठेऊन सादर करण्यात आलेल्या व काहीशा क्लिष्ट अथवा गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखां भोवती फिरणाऱ्या कथानकांमध्ये नेहमीच एक प्रकारचा ठहराव, एक प्रकारची अव्यक्त भावना बघायला मिळत असते. ‘मीडियम स्पायसी’ नेमका असाच अव्यक्ततेतून व्यक्त होणारा सिनेमा आहे. सामान्य नायक नायिकेप्रमाणे प्रेमाचा सरळधोपट मार्ग न निवडणारा. प्रेम भावनिक नसेल तेंव्हा ते हमखास शारीरिक तरी असेल हे गृहीतक सुद्धा इथे कथाकार इरावती कर्णिक मोडीत काढतात. नेमका इथेच मीडियम स्पायसी जनरल चित्रपटांची चौकट मोडतो आणि एका क्लास प्रेक्षकांपुरता स्वतःला मर्यादित करून घेतो.
दादर, मुंबईतील टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंबियांचे प्रतिनिधित्व करणारा कथेचा नायक आहे निस्सीम (ललित प्रभाकर). कुटुंब जरी टिपिकल असले तरी निस्सीम मात्र लहानपणापासून एकदम ऑड! शांत, सहनशील, अव्यक्त, संयमी असा हा निस्सीम एका हॉटेलमध्ये शेफ असतो जिथे त्याची बॉस असते गौरी (सई ताम्हणकर). गौरी ही मूळची चेन्नईची. जॉब च्या निमित्ताने मुंबईत एकटी राहते. स्वभावाने फटकळ, बोल्ड, सेल्फ-मेड आणि स्वतःच्या टर्म्स वर आयुष्य जगणारी गौरी जेवढी प्रॅक्टिकल असते तिच्या विरुद्ध निस्सीम असतो. त्याच हॉटेलात फ्रंट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्राजक्ता (पर्ण पेठे) ला निस्सीम आवडत असतो खरा मात्र तिला प्रतीक्षा असते निस्सीम कडून बोलणं सुरु होण्याची. निस्सीम मात्र स्वतः प्राजक्ता बद्दल च्या रिलेशनशिप बद्दल शुअर नसतो. याबद्दल गौरी सुद्धा निस्सीम ला विचारते पण तिलाही तो आमच्यात असे काही नाही असेच सांगतो. गौरी त्याला ‘तुला माझ्याबद्दल काय वाटते? तुला माझ्याबद्दल शारीरिक आकर्षण आहे का?’ हे सुद्धा मोकळेपणाने विचारते पण त्यावरही निस्सीम काहीच बोलत नाही. इथून पुढे गौरी स्वतःला निस्सीम पासून दूर ठेवण्यास सुरुवात करते. दुसरीकडे निस्सीमची वाट बघून कंटाळलेली प्राजक्ता सुद्धा मग एके दिवशी निस्सीम ला ‘आता माझे लग्न इतरत्र ठरले आहे’ हे सांगून मोकळी होते आणि निस्सीमला काहीसा धक्का बसतो. या सर्व घटनाक्रमांमुळे निस्सीम एकटा पडतो. यातून तो स्वतःला कसे बाहेर काढतो हा पुढील कथाभाग.
लेखक इरावती कर्णिक यांनी निस्सीम ही कथेच्या केंद्रस्थानी असलेली नायकाची व्यक्तिरेखा अशी का आहे? किंवा अशी का वागते? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून त्याच्या अवती भोवती असलेल्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात चालू असलेल्या घटनाक्रमांचा संदर्भ दिलाय. या घटनाक्रमात निस्सीम कसा वागतो किंवा काय करतो यावरून प्रेक्षकांना हळू हळू निस्सीम या क्लिष्ट व्यक्तीचा उलगडा होत जातो. त्यात मग निस्सीम चे आई-वडील (नीना कुलकर्णी-रवींद्र मंकणी), त्याची बहीण आणि तिचा नवरा (नेहा जोशी आणि पुष्कराज), निस्सीम चा हॉटेलातील शेफ मित्र (सागर देशमुख) यांचा समावेश आहे. आधी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी असे का हे समजावून सांगण्याच्या भानगडीत ना लेखक पडलाय ना दिग्दर्शक मोहित टाकळकर.
त्यात सादरीकरण सुद्धा टिपिकल नसल्याने बऱ्याच ठिकाणी कथेचा पेस खूपच स्लो झाल्याचा सातत्याने फील येत राहतो. पण असे असूनही चित्रपट खुप कंटाळवाणा होतो असेही म्हणता येणार नाही. त्याला प्रमुख कारण आहे ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर या दोघांचा सुंदर अभिनय. शेफ च्या भाषेत सांगायचे झाल्यास ही दोघे या चित्रपटाचा मेन कोर्स आहेत आणि त्यावर काही खरपूस संवाद, सुंदर छायांकन, क्लास असे पार्श्वसंगीत इत्यादी त्या मेन कोर्स जेवणाला दिलेली चविष्ट फोडणी. ललित प्रभाकर ने अत्यंत क्लिष्ट अशी व गोंधळात असलेली निस्सीम ची भूमिका सुंदर साकारली आहे. सई ने साकारलेली, दाक्षिणात्य उच्चारात मराठी बोलणारी गौरी तिच्याच शेफ च्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘जस्ट यम्मी’! सई तुम्हाला चित्रपटाच्या अंती गौरी या व्यक्तिरेखेच्या अगदी प्रेमात पाडते. पर्ण पेठे ने सुद्धा प्राजक्ताची व्यक्तिरेखा सहजतेने साकारली आहे. निस्सीमच्या मित्राच्या भूमिकेत सागर देशमुख प्रभावी. नीना कुलकर्णी सुद्धा तितक्याच व नेहमीप्रमाणे अगदी सहज.
हे सर्व असूनही पुन्हा एकवार हे सांगणे गरजेचे आहे की दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी कथानकाला दिलेली ओव्हरऑल ट्रीटमेंट ही ‘टू क्लास’ आहे. निस्सीम हे पात्र आणि त्याचे आश्चर्यकारक वागणे याबद्दल पुरेशा प्रमाणात स्पष्टीकरण न दिल्याने प्रेक्षक त्याच्याशी किती कनेक्ट होतील हे सांगणे कठीण. करमणुकीचा शोध घेणाऱ्या सामान्य दर्जाच्या प्रेक्षकांसाठी ना हा सिनेमा बनलाय ना त्यांना तो आवडेल. ह्रिषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत श्रवणीय आहे पण कथानकाला साजेसे असे क्लास या सदरात मोडण्याइतकेच मर्यादित.
हिंदी चित्रपटात अशा गुंतागुंतीच्या, अव्यक्त व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांचा स्वतःच्या आयुष्यातील प्रेमाचा शोध साधारणपणे हा कथानकाचा बाज, आणि त्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑड ट्रीटमेंट हे दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या सिनेमांमधून दिसून येते. ‘मीडियम स्पायसी’ ही तशाच प्रकारच्या सिनेमांची मराठी आवृत्ती आहे. पुस्तके, पेंटिंग्ज, लाईट क्लासिकल म्युझिक, गुलजार, गझल्स हे सर्व तुमच्या फेव्हरेट लिस्ट मधील शब्द असतील आणि समजा एखाद्या दुपारच्या वेळी बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, तुम्ही घरात एकटे आहात तर स्ट्रॉंग कॉफीचा आस्वाद घेत निवांत बघत बसण्याची कलाकृती म्हणजे ‘मीडियम स्पायसी’. ‘चालायला वाट का पाहिजे, सांधायला स्पर्श का पाहिजे’ हे गुणगुणणारी.
हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा
