– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The Kerala Story Movie Review

कथानक थोडक्यात – शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा), गीतांजली (सिद्धी इदनानी) आणि निमा (योगिता बिहानी) आणि आसिफा (सोनिया बालाणी) या कासारगोड, केरळ येथील नर्सिंग कॉलजेमध्ये प्रवेश घेतल्यावर पहिल्यांदा एकमेकांना भेटतात आणि कालांतराने जवळच्या मैत्रिणी बनतात. आसिफा या तिघींची जवळची मैत्रीण बनण्याचे नाटक करून त्यांना हळुवारपणे आधी कट्टर शरिया मानणारी इस्लामी विचारधारा कशी योग्य आहे हे पटवून देते आणि त्यानंतर इराक-सीरिया स्थित इसिस या दहशतवादी संघटनेला लागणाऱ्या जिहादी महिला म्हणून त्यांना तयार करण्यापर्यंत तिला दिलेला जॉब पूर्ण करते. या षडयंत्राची जाणीव या तिघीना होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. गीतांजली आणि निमा सुद्धा या जाळ्यात अडकतात पण इसिस पर्यंत पोहोचण्याआधीच त्यांना हे सर्व षडयंत्र आहे हे कळून चुकते. परंतु शालिनी तिच्या मुस्लिम प्रियकराच्या जाळ्यात अडकून गर्भवती होते, तो प्रियकर तिला सोडून देतो आणि यातून मार्ग म्हणून तिचे लग्न एका अनोळखी इसमाशी लावून दिले जाते जो तिने केलेल्या गुन्ह्यांचे प्रायश्चित्त म्हणून तिला सीरियाला घेऊन जातो. या षडयंत्राची जाणीव झाल्यावर शालिनी इसिस च्या तावडीतून कशी सुटते आणि नेमक्या कशा पद्धतीने ती या मोठ्या जाळ्यात अडकते हा कथाभाग.

काय विशेष?- केरळ मधील हिंदू मुलींना स्थानिक मुस्लिम लोकांच्या मदतीने इसिस ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना कशी लव्ह जिहाद च्या नावाने आपल्या जाळ्यात ओढते आहे हे दर्शविणारे कथानक अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. सूर्यपाल सिंग, विपुल अमृतलाल शाह आणि सुदिप्तो सेन (ज्यांनी दिग्दर्शन सुद्धा केले आहे) यांनी लिहिलेली पटकथा असंख्य सत्यकथांचा अभ्यास करून लिहिण्यात आली आहे हा कथाकारांचा दावा चित्रपट बघतांना अगदी सत्य असल्याचे जाणवते. ते कसे? तर याला उत्तर आहे आसिफा आणि इतर २ हिंदू आणि १ ख्रिश्चन मैत्रिणी यांच्यामधील मध्यंतरापूर्वीचे सर्व सीन्स ज्यात आसिफा आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आणि तुमचा देव कसा खोटा हे या तिघींना अगदी सराईतपणे पटवून देते. बरं नुसतेच पटवून न देता कथाकाराने यात इतर तिघींना आपल्या धर्माबद्दल असलेले अज्ञान, नसलेली श्रद्धा, त्यांच्यावर संस्कार करण्यात कमी पडलेले आई-बाप यावरही भाष्य केल्याने पटकथेवर व्यवस्थित अभ्यास झाल्याचे जाणवते. अर्थातच हा अभ्यास करतांना गेल्या दशकात समोर आलेल्या केरळमधील असंख्य सत्यकथांना प्रमाण मानलेले असणार हे ओघाने आलेच.

इसिसची क्रूरता दाखवणारे सीन्स विचलित करणारे आहेत. पटकथेची एकूण लांबी केवळ २ तास २० मिनिटांची आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती बऱ्यापैकी बांधून ठेवते. विषयाचे आणि कथेचे गांभीर्य जपत दिग्दर्शकाने कुठल्याही दृश्याला नाट्यमय अथवा फिल्मी न बनविता ते सत्यतेच्या जवळ जाणारे कसे वाटेल याची काळजी घेतली आहे. सुदिप्तो सेन यांचे दिग्दर्शन प्रभावी. प्रसंतनु मोहपात्रा यांचे केरळ आणि अफगाण-सीरिया या प्रदेशातील छायांकन, बिशाख ज्योती यांचे पार्श्वसंगीत आणि संजय शर्मा यांचे क्रिस्पी एडिटिंग म्हणजेच संकलन या सुद्धा विषयाच्या गांभीर्याला जपणाऱ्या व चित्रपटासाठी जमेच्या बाबी आहेत. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अदा शर्माने कमालीचा परिणामकारक अभिनय केला आहे. पटकथेतील एकमेव महत्वाचे पात्र तीच असल्याने कॅमेरा बहुतांश तिच्याभोवतीच फिरतांना दिसतो. केरळ स्टोरी हा अदा च्या करिअरमधील एक माईलस्टोन चित्रपट ठरेल यात शंका नाही. अदा सोबतच आसिफा बनलेली सोनिया बालाणी हिची भूमिका सुद्धा लक्षवेधी ठरली आहे. शालिनीच्या इतर दोन मैत्रिणी म्हणून गीतांजली आणि निमा च्या भूमिकेत सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्याकडूनही दिग्दर्शकाने बखुबी काम काढून घेतले आहे.

नावीन्य काय?- इसिस या दहशतवादी संघटनेला काही कट्टर व धर्मांध स्थानिक नागरिक कसे मदत करीत आहेत आणि इसिस ने पुकारलेल्या लव्ह जिहादच्या या जाळ्यात हिंदू मुली कशा अलगद अडकत आहेत हे निडरपणे आणि बेधडकपणे दाखविणारा अशा प्रकारचा हा दुर्मिळ प्रयत्न आहे आणि हेच या चित्रपटाचे नावीन्य आहे असे म्हणता येईल.

कुठे कमी पडतो? – संवादांमध्ये आवश्यक असणारी धार काहीशी कमी पडली आहे. मध्यंतरानंतर गती कमी झाल्याने काही ठिकाणी पकड सुटते. बॅकग्राउंड मध्ये वाजणारी गाणी अर्थपूर्ण असली तरी ती आणखी चांगली हवी होती. काही दृश्ये अंगावर येणारी आहेत उदाहरणार्थ इसिस कॅम्प मधील हिंसेची. आणि काही दृश्यांमुळे चित्रपट सहकुटुंब म्हणजे खासकरून लहान मुलांना सोबत घेऊन बघावा असा नाहीये. चित्रपटात नाट्यमय प्रसंगांना वास्तविकतेच्या जवळ ठेवल्याने करमणुकीची अपेक्षा ठेऊन आलेल्या प्रेक्षकांची निराशा होऊ शकते.

पहावा का?- अर्थातच. आपल्या देशाच्या अखंडतेला आणि एकतेला आव्हान देणारा शत्रू कुठल्या पातळीचे षडयंत्र रचतोय हे बेधडकपणे सांगणाऱ्या या प्रयोगाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणे गरजेचे आहे. निदान पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी तरी.

स्टार रेटींग – ३.५ स्टार. File:Star rating 3.5 of 5.png - Wikimedia Commons

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment