– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Rocketry Movie Review. खरंतर कोणत्याही शास्त्रज्ञा वरील चरित्रात्मक चित्रपट व्यावसायिक चौकटीत बसवून रसिकांसमोर सादर करणे हे त्या शास्त्रज्ञाने लावलेल्या शोधा इतकेच अवघड काम आहे असे मला वाटते. शास्त्रज्ञ म्हणजे विज्ञान आलं आणि त्यामागे आले त्या विज्ञानातील अनेक सिद्धांत, शोध यांचा उलगडा करणारे तांत्रिक शब्द. हे सर्व तुम्ही जोपर्यंत डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक सारख्या चॅनेलवरील एखाद्या शो मध्ये बघत असाल तोपर्यंत चालते पण जेंव्हा तुम्ही अशा विषयावरील करमणूक प्रधान व्यावसायिक सिनेमा बनवायला जाता तिथे मात्र तुमच्या समोर प्रचंड मोठ्ठे आव्हान उभे राहते कारण व्यावसायिक सिनेमांचा प्रेक्षक वैज्ञानिक ज्ञान मिळवायला कमी आणि स्वतःची करमणूक करवून घेण्यात जास्त रस असलेला असतो. पण असे असले तरी मुळात अशा आशयाच्या चित्रपटाला तेही सिनेमागृहात जाऊन बघणाऱ्या प्रेक्षकांना खूप काही करमणुकीची अशीही अपेक्षा नसते. पण ती अजिबातच नसते असेही म्हणता येणार नाही. 

अभिनेता आर माधवन याने अभिनीत आणि दिग्दर्शित केलेला,इस्रो या  भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेतील एक दिग्गज असे नाव, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित नम्बि नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित ‘रॉकेट्री: दि नम्बि इफेक्ट’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. रॉकेट्री ही खरी कथा आहे. नम्बि सरांच्या संघर्षाची. ‘ओरमाकालुदे भ्रमणपदम’ या नम्बि सरांनी लिहिलेल्या आत्मचरित्रावर आधारित कथेला, पटकथा, संवाद, निर्माता, दिग्दर्शन आणि नम्बि सरांच्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत सादर करणे, अशा पाचही जबाबदाऱ्या एकट्या आर माधवन ने या सिनेमात सांभाळल्या आहेत. लेखन आणि दिग्दर्शन या प्रांतात माधवन याद्वारे आपले पहिले पाऊल टाकत आहे. मुळात ही एका शास्त्रज्ञाची सत्यकथा असल्याने यात दिग्दर्शकाने फारशी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणजे करमणुकीसाठी म्हणून स्वातंत्र्य घेतलेले नाही. 

चित्रपटाची  सुरुवात १९९४ सालच्या त्या घटनेनंतर होते ज्या घटनेने नंबी सरांचे पुढील आयुष्यच बदलून टाकले. नंबी सर इस्रो येथे क्रायोजेनिक्स विभागाचे प्रभारी असतांना अचानक त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती. दोन मालदीव्हियन गुप्तचर अधिकारी मरियम रशीदा आणि फौझिया हसन यांना अत्यंत महत्त्वपूर्ण संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. यानंतर त्यांच्या त्रिवेंद्रम, केरळ येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांवर हल्ले, सामाजिक बहिष्कार मोठ्या प्रमाणात सुरु झाला होता. हे सर्व कसे झाले, नंबी सरांचा रॉकेट्री च्या अंतराळ संशोधन विश्वात प्रवेश कसा आणि केंव्हा झाला, पुढचा एक-एक टप्पा त्यांनी कसा गाठला हे सर्व एका टेलिव्हिजन मुलाखतीच्या माध्यमातून नंबी सर सांगत आहेत या पद्धतीने प्रेक्षकां समोर ठेवण्यात आले आहे. भारताने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या PSLV साठी वापरण्यात आलेले ‘विकास इंजिन’ विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.  नंबी सरांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचा धावता आढावा यात घेण्यात आलाय. मग त्यात मदुराईमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर, नारायणन यांनी 1966 मध्ये इस्रोमध्ये आपली कारकीर्द सुरू केल्यापासून ते  ‘विकास’ नावाच्या पहिल्या इंजिनची 1985 मध्ये यशस्वी चाचणी इथपर्यंतचा तसेच त्यानंतर 1992 मध्ये, भारताने क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यासाठी रशियाशी केलेल्या करारात नंबी सरांचा असलेला सहभाग इथपर्यंत कथानक येऊन पोहोचते. आणि मग ९४ सालच्या देशद्रोहाच्या षडयंत्रात त्यांना कसे अडकवले जाते यामागची कहाणी प्रेक्षकांसमोर येते. 

मध्यंतरापर्यंतची कथानकाची वाटचाल खूप म्हणजे खूपच वैज्ञानिक शब्दांनी आणि तांत्रिक सिद्धांतांनी भरपूर अशी आहे. त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांना हा मध्यंतरापर्यंतचा प्रवास अत्यंत कंटाळवाणा होईल यात शंका नाही. हे असे न होऊ देणे खरंतर एखाद्या अनुभवी आणि प्रगल्भ दिग्दर्शकाला जमले असते पण माधवन चा लेखक, दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न असल्याने पटकथा आणि संवाद लिहितांना या तांत्रिक बाबी प्रेक्षकांना कळणार नाहीत हे त्याच्या अजिबातच लक्षात आलेले नाही आणि ही या चित्रपटाची मोठी निगेटिव्ह बाजू आहे. मध्यंतरानंतर मात्र कथानकात असे काही नसल्याने आणि नाट्यमय व भावनात्मक प्रसंगांची रेलचेल असल्याने प्रेक्षकांची बऱ्यापैकी करमणूक होते. देशद्रोहाच्या आरोपांची चौकशी होत असतांना स्वतः नंबी सर आणि त्यांचे कुटुंबीय कुठल्या प्रकारच्या मानसिक अवस्थेतून जात होते हे बघतांना मन सुन्न होते. खासकरून नंबी सरांचा चौकशी दरम्यान झालेला शारीरिक आणि मानसिक छळ, सरांच्या पत्नीला बसलेला मानसिक धक्का हे सर्व ‘दिग्दर्शक’ माधवनने अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे आणि ‘अभिनेता’ माधवनने सुद्धा तेवढ्याच विलक्षण अभिनय प्रतिभेने ते साकारले आहे. पार्श्वसंगीत, छायांकन याबाबतीत चित्रपट उजवा आहे. कथेच्या मागणीनुसार गीत-संगीताला असेही फारसे महत्व नसल्याने त्याबाबतीत विशेष असे काहीच नाही. पटकथेत अजून एक दिसलेला दोष म्हणजे नंबी सरांना अडकविण्यात आलेल्या या षडयंत्रामागे नेमका हात कोणाचा होता आणि त्यामागे नेमका उद्देश काय होता हे अनुत्तरीत ठेवण्यात आलेले आहे. 

तारुण्य, मध्यमवयीन आणि नंतर प्रौढत्व, हे ट्रान्सफॉर्मेशन माधवनने अत्यंत सहज व सुंदर रित्या पेश केले आहे. रॉकेट्री मधील ही भूमिका माधवन च्या करिअरमधील माईलस्टोन ठरेल यात शंका नाही. नंबी सरांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सिमरन ने अत्यंत सुंदर काम केले आहे. नंबी सरांचा टेलिव्हिजन वरील मुलाखतकार शाहरुख खान (शाहरुख खान म्हणूनच) प्रभावी. 

‘रॉकेट्री’ ही अत्यंत उदात्त आणि स्वच्छ हेतूने बनविण्यात आलेली, मात्र (खासकरून मध्यंतरापर्यंत) डॉक्युमेंट्री स्टाईलने पुढे सरकणारी व्यावसायिक कलाकृती आहे. चित्रपटाचा शेवट हमखास तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आणणारा आहे. भारताच्या अंतराळ संशोधनात सिंहाचा वाटा असलेल्या इतक्या थोर शास्त्रज्ञाच्या जीवनात आलेले एवढे मोठ्ठे वादळ त्याने कसे हिमतीने परतावून लावले हे जाणून घेण्यासाठी ही कलाकृती जरूर बघावी. जिथे जमेल तिथे. थिएटर, ओटीटी किंवा टेलिव्हिजन. चॉईस इज युवर्स. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.