– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bawaal Movie Review

खरं सांगायचं झालं तर ट्रेलर बघून थोडं आश्चर्य आणि थोडी निराशा अशी काहीशी रिऍक्शन होती माझी. दिग्दर्शक नितेश तिवारी च्या दंगल आणि छिछोरे च्या तुलनेत अगदीच साधारण वाटावा असा ट्रेलर होता बवाल चा म्हणून निराशा झाली होती आणि नितेश चा सिनेमा थिएटरमध्ये ना येता थेट ओटीटी वर का येतोय या विचाराने आश्चर्य निर्माण केलं होतं. असो आज सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर रिलीज झालाय. 

कथानक थोडक्यात – अजय दीक्षित (वरुण धवन) हा एक स्वार्थी, अहंकारी आणि एका खोटारडा तरुण आहे ज्याला काळजी असते फक्त स्वतःच्या इमेजची. स्वतः बिग झिरो असला तरी जगाला मी केवढा मोठा हिरो आहे याची इमेज बिल्डिंग करण्यात अजय चा वेळ जात असतो. म्हणायला अजय लखनौमधील एका शाळेत इतिहासाचा साधारण आणि कामचुकार शिक्षक आहे आणि यापेक्षा अधिक काही करण्यास तो पात्र जरी नसला तरी, लोकांचा असा विश्वास निर्माण करण्यात त्याला यश मिळालेले असते की त्याने आयएएस अधिकारी बनणे सोडले कारण स्वतः आयएएस अधिकारी बनण्या ऐवजी शाळेतील विद्यार्थ्यांना तो आयएएस बनवू इच्छितो. अजयचे लग्न होते निशा सोबत (जान्हवी कपूर). इनफॅक्ट आपल्या इमेज बिल्डिंग करिता निशा छान आहे या हेतूनेच अजय तिच्याशी लग्न करतो. निशा जी अजयच्या एकदम विरुद्ध आहे. म्हणजे दिसायला सुंदर, विनयशील, निस्वार्थ, कुठलाही अहंकार नसणारी आणि अजयपेक्षा खूप चांगल्या आर्थिक परिस्थितीत वाढलेली. निशा चे वडील मोठे बिझनेसमॅन असतात. निशाला लहानपणीपासून फिट्स येण्याचा त्रास असतो ज्यामुळे तिचे लग्न ठरत नसते. पण इमेजसाठी काहीही करायला तयार असलेला अजय निशाच्या या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. नेमका निशाला लग्नाच्या दिवशी फिट्स चा त्रास होतो आणि अजय निशापासून स्वतःला दूर करतो. एकाच घरात राहत असूनही दोघे केवळ म्हणायला नवरा बायको असतात पण लग्नाच्या नऊ महिन्यानंतर दोघांमध्ये अगदी विभक्त होण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली असते. पुढे घटनाक्रम असा काही घडतो की या दोघांना सोबत युरोपला जावे लागते. तेही दुसऱ्या महायुद्धाच्या सर्व जागांना भेट देण्यासाठी. ते का आणि कसे हे इथे सांगणे योग्य नाही. मग या युरोप दौऱ्यात अशा कुठल्या घटना घडतात का ज्याने अजय आणि निशा चे हे दुरावलेले नाते परत जवळ येते हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- दिग्दर्शक नितेश यांच्या पत्नी आणि कथेच्या लेखक अश्विनी अय्यर तिवारी यांची कथा फ्रेश आहे. म्हणजे नवरा बायको च्या नात्यात निर्माण झालेल्या दुराव्याला थेट दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगांशी को-रिलेट करून सांगितलेली कथा तशी हटके आणि युनिक म्हणावी लागेल. कथेला पटकथेत रूपांतरित करण्याचे काम केलंय नितेश तिवारी, पियुष गुप्ता, निखिल मेहरोत्रा आणि श्रेयस जैन यांनी. खूप टाईट आणि फास्ट पेस्ड अशी स्क्रिप्ट जरी नसली तरी प्रचंड कंटाळा येणार नाही इतका वेग असलेली पटकथा आहे. पटकथेला अनुसरून याच चौघांच्या टीमने लिहिलेले संवाद खूपच कमालीचे आहेत. इथे संवाद दिग्दर्शनापेक्षाही भारी आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. उदाहरणार्थ निशा ची होत असलेली मानसिक घुसमट ही कुठल्या दृष्यापेक्षा संवादांमधून अधिक ठळकपणे जाणवते. दुसऱ्या महायुद्धाचे वॉर आणि गॅस चेंबर्स चे बॅकग्रांउड मध्ये वापरलेले ब्लॅक अँड व्हाईट सीन्स परिणामकारक आहेत. मितेश मिरचंदानी यांचे छायांकन आणि डॅनियल जॉर्ज यांचे बॅकग्राउंड म्हणजेच पार्श्वसंगीत सुंदर जमलंय. अभिनयाच्या बाबतीत वरून धवन म्हणावा तसा फॉर्म मध्ये मला वाटला नाही .. बहुधा इथे वरूनपेक्षा अधिक चांगला चॉईस इथे हवा होता. पण अगदीच टाकाऊ असे पण काम नाही म्हणता येणार त्याचे. ठीक आहे. जान्हवी कपूर ने साकारलेली निशा छान जमली आहे. मनोज पाहावा यांनी वरून च्या वडिलांच्या भूमिकेत चांगले काम केले आहे.

नावीन्य काय?- नवरा-बायको मधील दुरावलेले नाते आणि पुरुषी अहंकार या कथा आणि पटकथेला वर्ल्ड वॉर-२ सोबत साधर्म्य दाखवत पुढे सरकत जाणारा घटनाक्रम हे नावीन्य म्हणावे लागेल. 

कुठे कमी पडतो? – निशा अजय सोबत लग्नानंतर खूप एकाकी आहे, डिप्रेशन मध्ये आहे, दुःखी आहे किंवा यांच्या नात्यात खूपच दुरावा निर्माण झालाय हे नाट्यमय रित्या आणि अधिक परिणामकतेने दाखविण्याची आवश्यकता होती जे अजिबात झालेले नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे सर्व काही फास्ट पेस्ड एकदम क्रिस्पी सीन्स आणि डायलॉग्ज द्वारे कम्युनिकेट केलं गेलंय. हे न दाखविले गेल्याने निशा च्या एकटेपणाला, फ्रस्टेशन ला, दुःखाला डायरेक्ट वर्ल्ड वॉर च्या प्रसंगांशी रिलेट करतांना अतिशयोक्ती केल्याची जाणीव होते. म्हणजे कुठे महायुद्धातील क्रूरता आणि कुठे नवरा-बायकोच्या नात्यातील दुरावा .. थोडं जास्तच होतंय अशी भावना बहुतांश प्रेक्षकांमध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सिनेमात वरून च्या तोंडी एक संवाद आहे ज्यात तो आपल्या वडिलांना म्हणतो- आयडिया थोड़ा क्रांतिकारी है, थोड़ा ओपन माइंड से सुनना. हा डायलॉग म्हणजे नितेश तिवारीने प्रेक्षकांना दिलेला सल्ला वाटतो. की काय डोक्यात ठेऊन तुम्ही हा सिनेमा बघा. कथानकाची आयडिया फ्रेश असली तरी नितेश च्या दिग्दर्शनात यावेळी कमाल हा शब्द मिसिंग आहे. सिनेमाचा सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे याचे संगीत. मिथून, तनिष्क बागची आणि आकाशदीप सेनगुप्ता असे तीन संगीतकार असूनही आणि लव्ह स्टोरी हा कथेचा गाभा असूनही श्रवणीय संगीत कंप्लिटली मिसिंग आहे.

पहावा का?- हरकत नाही. वन टाइम वॉच आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून का होईना, फारशा अपेक्षा न ठेवता ऑन केलात तर नक्कीच बरा वाटेल. हो पण ओपन माईंडेड असणं गरजेचं आहे. गुड ऍव्हरेज.

स्टार रेटींग – २. ५ स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment