– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Ved’ Marathi Movie Review

कथानक थोडक्यात – सत्या (रितेश देशमुख) याला दोन गोष्टींचं वेड आहे. एक आहे क्रिकेट आणि दुसरं आहे त्याचं प्रेम निशा (जिया शंकर). सत्या इतकंच निशाचं सुद्धा सत्यावर जीवापाड प्रेम असतं पण नियतीला हे मंजूर नसतं. घटनाक्रम असा काही घडतो की निशा सत्यापासून दुरावते आणि तिच्या आठवणीत सत्या दारूच्या आहारी जातो. वर्षामागून वर्षे जातात पण सत्या काही केल्या निशाच्या आठवणीतून बाहेर येत नसतो आणि त्याचे व्यसनही वाढत जाते. अशा वेळी सत्या च्या आयुष्यात येते श्रावणी( जेनेलिया देशमुख). ज्या प्रमाणे सत्या ला निशा चे वेड असते त्याचप्रमाणे श्रावणीला सत्याचे. सत्या च्या शेजारी राहणाऱ्या श्रावणीला सत्या आणि निशा बद्दल सर्व काही माहित असूनही ती सत्याशी लग्न करते. श्रावणी रेल्वे विभागात कामाला असते आणि सत्याचे दारूचे व्यसन आणि या दोघांचा श्रावणीचा संसार हा श्रावणीच्या कमाईतून चालू असतो. सत्याचे पूर्वीचे क्रिकेट कोच त्याला दिल्ली येथे अंडर-१४ च्या टीमच्या ट्रेनिंग साठी खूप दिवसांपासून बोलावत असतात. एके दिवशी अचानक सत्या दिल्ली ला जाण्याचा निर्णय घेतो पण दिल्लीत पोहोचल्यावर त्याच्यासमोर एक धक्कादायक वास्तव उभे राहते. ते काय? आणि अय सर्व परिस्थितीतून सत्या बाहेर कसा येतो हा पुढील कथाभाग.

 

काय विशेष?- २०१९ साली तेलगू भाषेत प्रदर्शित ‘मजिली’ या सिनेमाचा ‘वेड’ हा अधिकृत रिमेक आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनाचा मुलगा नागा चैतन्य त्यात प्रमुख भूमिकेत होता. अभिनेत्री सामंथा प्रभू ने त्यात त्याच्या बायकोचा व व दिव्यांशा कौशिक ने त्याच्या प्रेयसीचा रोल साकारला होता. मजिली हा २०१९ च्या सुपरहिट तेलगू सिनेमांच्या यादीत आहे. रितेशने ‘वेड’ मध्ये प्रमुख भूमिकेसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन (पहिल्यांदाच) सुद्धा केले आहे व तो (म्हणजे जेनेलिया) निर्माता सुद्धा आहे. जेनेलिया चा हा अभिनेत्री म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची सर्वात उजवी अथवा जमेची बाजू आहे अजय-अतुल यांचे बहारदार संगीत जे की प्रदर्शनाच्या आधीच हिट झालंय. ‘वेड लागलंय’ आणि ‘वेड तुझा विरह वणवा’ ही दोन्ही शीर्षक गीते अफलातून जमून आली आहेत. शिवाय ‘बेसुरी मी’ आणि ‘सुख कळले’ ही गाणी सुद्धा तितकीच श्रवणीय आहेत. पार्श्वसंगीत, छायांकन, ऍक्शन दृश्ये याबाबतीत सुद्धा चित्रपट उजवा आहे. मध्यंतरापूर्वी आणि नंतर कुठेही चित्रपटाची गती फारशी मंदावत नाही. पटकथा आणि संवाद सुद्धा प्रभावी आहेत. रितेश, जेनेलिया आणि जिया शंकर या तिघांनी काम छान केले आहे. रितेश च्या वडिलांच्या भूमिकेत अशोक सराफ आणि मित्राच्या भूमिकेत शुभांकर तावडे यांचा अभिनय सुद्धा मस्तच जमलाय. रितेशने पहिल्या चित्रपटाच्या मानाने उत्तम दिग्दर्शन केलंय आणि संदीप पाटील व ऋषिकेश तुरई यांच्यासोबत लिहिलेल्या पटकथेमध्ये मराठी पार्श्वभूमी देत केलेले बदल सुद्धा छान आहेत.

 

नावीन्य काय?- रिमेक असल्यामुळे कथेत नावीन्य आहे असे नाही म्हणता येणार. पण हो, (मी मूळ सिनेमा पहिला असल्याने हे सांगू शकतो) मूळ सिनेमाच्या पटकथेत थोडेफार स्वागतार्ह बदल केले आहेत, मराठी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेऊन. चित्रपटाची निर्मिती मूल्ये चांगली असल्याने तांत्रिक दृष्ट्या सुद्धा चित्रपटाची प्रत्येक फ्रेम भव्य आणि कलरफुल आहे.

कुठे कमी पडतो? – फारसा कुठे नाही. जेनेलिया चे असहज मराठी बोलणे खटकते. पण तिच्या सुंदर दिसण्याने आणि तितक्याच गोड अभिनयामुळे त्याकडे फारसे लक्ष जात नाही. मूळ सिनेमाशी तुलना केल्यास सामंथा प्रभू उजवी वाटते. मध्यंतरानंतर काही ठिकाणी गती मंदावते. अशा वेळी सलमान खान व रितेश वर चित्रीत वेड लावलंय हे गाणं चित्रपट संपल्यावर दाखवल्यापेक्षा आधी घेतले असते तर अजून बरे झाले असते.

पहावा का?- हो. अवश्य पहावा. जरूर पहावा. आणि हो सिनेमागृहात जाऊन पहावा. खूप दिवसांनी क्लास आणि मास अशा दोन्ही प्रेक्षकांना आनंद देणारा मराठी सिनेमा आलाय. वर्षाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीसाठी आलेली ही आनंदाची आणि खूप मोठा दिलासा देणारी घटना आहे. त्याला उत्तम प्रतिसाद देणे आता आपले काम आहे.

स्टार रेटींग – ३ स्टार. आणि वर अजून फोडणीला अर्धा स्टार देतो खास रितेशला. चांगल्या चित्रपटाचा तितकाच उत्तम रिमेक बनवला म्हणून. थँक्स भाऊ.

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment