२४ जून रोजी नेटफ्लिक्स वर अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित बुलबुल रिलीज झाला. अन्विता दत्त या संवाद, गीत व पटकथा लेखिकेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. दोन वर्षाखाली आलेल्या एकता कपूरच्या लैला मजनू द्वारे प्रेक्षकांना ओळख झालेले जोडपे तृप्ती डिमरी व अविनाश तिवारी हे बुलबुलच्या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. सोबतीला राहुल बोस व पाओली डॅम छोट्या पण नकारात्मक भूमिकेत.

कथेचा सारांश थोडक्यात असा —
१८८१ या वर्षात बंगाल प्रेसिडेन्सी (सध्याचे पश्चिम बंगाल) मध्ये घडलेला हा घटनाक्रम. त्या काळातल्या कुप्रथेनुसार एक धनाढ्य जमीनदार इंद्रनील (राहुल बोस) चे लग्न बालवयातच असलेल्या छोट्या बुलबुल (तृप्ती डिमरी) सोबत होते. इंद्रनील ला दोन भाऊ असतात. एक जुळा पण वेडसर महेंद्र (राहुल बोस-डबल रोल) व दुसरा बुलबुलच्या वयाचा सत्या (अविनाश तिवारी). महेंद्रची पत्नी असते बिनोदिनी (पाओली डॅम). बिनोदिनी हवेलीची छोटी बहू असते. अर्थातच काही न कळणाऱ्या वयात लग्न लागलेली बुलबुल व सत्या दोघे लहानपणापासून सोबत खेळत वाढलेले असतात व त्यामुळे दोघे एकमेकांच्या अव्यक्त अशा प्रेमात असतात. कथा २० वर्षे पुढे सरकते तेंव्हा सत्या लंडनहून लॉ शिकून परतला आहे. इंद्रनील काही वर्षांपूर्वी हवेली सोडून गेला आहे व महेंद्रचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद अवस्थेत खून झालेला आहे व बुलबुल हवेलीची ठकूराईन बनून राज्य करीत असते. सत्याला या सर्व घटनाक्रमामागे घातपाताचा संशय आहे. गावात एक चुडैल असल्याच्या पण कथा सांगितल्या जात असतात. इथून पुढे सत्या याखाली दडलेले सत्य शोधण्यास सुरुवात करतो. सत्याच्या हाती लागते ते सत्य मात्र अत्यंत कटू व धक्कादायक असते.

यशराज फिल्म्स, धर्मा प्रोडक्शन या व इतर बऱ्याच बॅनरच्या विविध चित्रपटांसाठी साठी संवाद, गीत व पटकथा लेखनाने स्वतःच्या करिअरची सुरुवात करणारी अन्विता ने बुलबुल साठी दिग्दर्शनसोबतच पटकथा पण लिहिली आहे. स्वतःच्या पहिल्या प्रयत्नाच्या मानाने अन्विता ला बुलबुल च्या दिग्दर्शना साठी १० पैकी ७ मार्क तरी द्यावे लागतील. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांचे शोषण व त्याचा स्त्रीने घेतलेला खुनी बदला हा तसा हिंदी सिनेमासाठी चावून चोथा झालेला विषय पण तरीही अन्विताने कथेला दिलेल्या ऑड ट्रीटमेंटमुळे चित्रपटावरची पकड कुठेही सैल होत नाही. मात्र तसे करताना पटकथेत काही अनुत्तरित प्रश्न निर्माण होतात. इंद्रनील अचानक हवेली का सोडतो व नंतर का परततो? मुळात हे इंद्रनील चे पात्र लिहितांना लेखक प्रचंड गोंधळलेला आहे स्पष्ट दिसते. सत्या हे पात्र पण असेच दुबळे. कथानकात शेवटपर्यंत त्याचे बुलबुलवर असलेले प्रेम कुठेही ठळकपणे दिसूनच येत नाही. दिसते केंव्हा तर क्लायमॅक्सला. पटकथेतल्या या त्रुटींमुळे संवादही बऱ्याच ठिकाणी प्राभावहीन वाटतात. चित्रपटातील बरीच दृश्ये गरजेपेक्षा जास्त लाऊड झाली आहेत. त्यात छायाचित्रणासाठी वापरण्यात आलेली गडद लाल व काळी थीम दृश्यांचा परिणाम जरी वाढवत असली तरी हिंसेला नको इतकी भडक करते.

अभिनयाच्या बाबतीत तृप्ती डिमरी आपल्या सहज अभिनयाने बाजी मारून नेते. तिच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याने येणारी अल्लडता, अव्यक्त प्रेमासाठी असलेली अगतिकता व पाशवी अत्याचाराच्या बदल्यासाठी आसुसलेली क्रूरता हे सर्व भाव तृप्तीने मोठ्या सहजतेने सादर केले आहेत. राहुल बोस यात मात्र अगदीच प्रभावहीन. पाओली ने साकारलेली बिनोदिनी हि नकारात्मक आहे पण तिचाही परिणाम म्हणावा तितका पडत नाही. अविनाश तिवारी अगदीच चुकीची निवड असे म्हणावे लागेल. प्रभावहीन.

‘बुलबुल’ हा एका स्तुत्य हेतूने चांगल्या विषयाला वेगळ्या स्टाईलने सादर करतो खरा पण कथेला दिलेली डिप्रेसिंग ट्रीटमेंट अंती तुम्हाला अपरिपूर्ण व अपरिपक्वतेची फिलिंग देऊन जाते.

बघितला तरी ठीक. पण बघावाच असाही नाही.

– अजिंक्य उजळंबकर

4.6 Score

Review Breakdown

  • Story
  • Cast
  • Music
  • Direction
  • Cinematography
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.